कोरोनामुक्तीसाठी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहीम; आयुक्तांकडून नियमावली जाहीर

विक्रांत मते
Sunday, 13 September 2020

मुंबई, पुणे, नागपूर व औरंगाबादनंतर नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळत आहेत. कोरोनाला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने ट्रेस, ट्रॅक व ट्रीट या त्रिसूत्रीचा वापर करण्याच्या सूचना दिल्या.

नाशिक :  शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आळा घालण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्या अनुषंगाने आयुक्त कैलास जाधव यांनी नियमावली जाहीर केली आहे. त्यात मोहीम कालावधीत घरांना भेटी देण्यापासून ते कोमॉर्बिड व कोरोना रुग्ण शोधून उपचार करण्याचा समावेश आहे. 

मुंबई, पुणे, नागपूर व औरंगाबादनंतर नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळत आहेत. कोरोनाला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने ट्रेस, ट्रॅक व ट्रीट या त्रिसूत्रीचा वापर करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी म्हणून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेंतर्गत शहरात प्रत्येक घरात भेटी देऊन तपासणी केली जाणार आहे. अतिजोखमीचे आजार असलेल्या रुग्णांची माहिती ॲपमध्ये भरून त्याद्वारे उपचारपद्धती अवलंबिली जाणार आहे. मास्क लावणे, गरज असेल तरच घराबाहेर पडावे, दर दोन तासांनी हात स्वच्छ धुवावे, कपडे स्वतंत्रपणे धुवावे इत्यादीबाबत जनजागृती केली जाणार आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, किडनी आजार असल्यास त्यांचे समुपदेशन करून काळजीबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी

मोहिमेंतर्गत होणार उपाययोजना 

- गृहभेटी देण्यासाठी आरोग्य पथकांची नियुक्ती 
- पथकामध्ये एक आरोग्य कर्मचारी, दोन स्थानिक लोकप्रतिनिधींचे स्वयंसेवक 
- पथक दररोज पन्नास घरांना भेटी देणार 
- घरांमध्ये कोमॉर्बिड रुग्णांची तपासणी होणार 
- कोविडसदृश आजार असलेल्या व्यक्तींना फिवर क्लिनिकमध्ये दाखल करणार 
- कोमॉर्बिड रुग्णांचे नियमित उपचार तपासणार 
- फिव्हर ट्रीटमेंट केंद्राचे कोविड सेंटरमध्ये रुपांतर 
- प्रत्येक आरोग्य केंद्रामागे एक ॲम्ब्युलन्स नियुक्त करणार 
- अतिजोखमीच्या (कोमॉर्बिड) रुग्णांसाठी आरोग्य शिक्षण 
- महापालिकेच्या ॲपमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या आजाराची माहिती भरणार  

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ

 

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: My family is my responsibility campaign against corona in nashik marathi newws