नाशिकमध्ये आता घरोघरी कोरोना चाचण्या; ‘माझे कुटुंब-माझी जबादारी’ अंतर्गत मोहीम 

विक्रांत मते
Monday, 21 September 2020

मध्यंतरी केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन फक्त फीव्हर क्लिनिक व रुग्णालयांमध्येच रॅपिड टेस्ट करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याचा आधार घेत सार्वजनिक ठिकाणी चाचण्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

नाशिक :  कोरोना संसर्गाला अटकाव करण्यासाठी महापालिकेतर्फे सुरू करण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टिजेन टेस्टची व्याप्ती वाढविण्यात आली असून, फीव्हर क्लिनिक, कोविड सेंटर व महापालिकेच्या रुग्णालयांबरोबरच शासनाच्या ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत महापालिकेचे पथक घरोघरी तपासणी करणार आहे. 

शहरात मेअखेरपासून कोरोनाचा संसर्ग वाढण्यास सुरवात झाली. जून ते २० सप्टेंबरपर्यंत कोरोनाने पूर्वीचे विक्रम मोडीत काढले. कोरोनाला अटकाव करण्यासाठी महापालिकेने खरेदी केलेल्या एक लाख ॲन्टिजेन किटच्या माध्यमातून नगरसेवक व भारतीय जैन संघटनेतर्फे शहरात तपासणी मोहीम राबविली. त्याअंतर्गत सुमारे ८६ हजार ४६५ टेस्ट करण्यात आल्या. त्यात १२ हजार ५०७ बाधित आढळले. चाचण्यांच्या माध्यमातून बाधितांचे प्रमाण १४ टक्क्यांनी कमी करण्यात यश मिळाले.

हेही वाचा > थरारक दृश्य! नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO

चाचण्या वाढविल्या जाणार ​

मध्यंतरी केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन फक्त फीव्हर क्लिनिक व रुग्णालयांमध्येच रॅपिड टेस्ट करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याचा आधार घेत सार्वजनिक ठिकाणी चाचण्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नगरसेवकांची मागणी लक्षात घेऊन महापालिकेने चाचण्या सुरूच ठेवल्या. आता फीव्हर क्लिनिक, कोविड सेंटर व महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये चाचण्या वाढविल्या जाणार आहेत. डॉ. झाकिर हुसेन, नाशिक रोड येथील नवीन बिटको रुग्णालय, समाजकल्याण वसतिगृह, मेरी कोविड सेंटर, महात्मा फुले कलादालन व १२ फीव्हर क्लिनिकमध्ये रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट केल्या जाणार आहेत. त्याचबरोबर शासनाच्या ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत घरोघरी जाऊन तपासण्या केल्या जाणार आहेत. 

हेही वाचा >  मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ

महापालिका हद्दीत रॅपिड टेस्ट मोहीम पूर्ण क्षमतेने राबविली जात असून, आता शासनाच्या ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेतून कर्मचारी व नगरसेवकांच्या स्वयंपथकाच्या माध्यमातून तपासणी केली जाणार आहे. टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांना फीव्हर क्लिनिकमध्ये पाठविले जाणार आहे. 
-डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक, महापालिका  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: my family my responsibility campaign in nashik marathi news