'नाफेड'तर्फे जिल्ह्यात 'या' सात ठिकाणी कांदा खरेदीचे प्रयत्न सुरु!

onion 1.jpg
onion 1.jpg

नाशिक : "नाफेड'ने लासलगावला चार हजार 600 टन कांद्याची खरेदी केली असून, या सात ठिकाणी कांदा खरेदी सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. बाजार समित्यांचे सचिव आणि सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत या ठिकाणी खरेदीसाठी पूर्वतयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी दिली. 

"नाफेड'च्या अधिकाऱ्यांना पडला प्रश्‍न

लॉकडाउनमध्ये कांद्याची मागणी घटल्याने भाव कोसळत होते. "नाफेड'ची खरेदी सुरू होण्यातून कांद्याचा भाव क्विंटलला किमान शंभर रुपयांहून अधिक वाढू शकतो, असा अंदाज आहे. त्यादृष्टीने सहकार विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. लासलगावला चार हजार 600 टन कांद्याची खरेदी केली असून, पिंपळगाव, चांदवड, कळवण, मालेगाव, सटाणा, येवला, मनमाड येथेही कांदा खरेदी सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. "नाफेड'तर्फे जुलैपर्यंत खरेदी केली जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र, कांदा साठवणुकीसाठी जागेची अडचण जाणवते. त्यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांच्या कांद्याची खरेदी करत तो ठेवण्यासाठी त्याच शेतकऱ्यांच्या चाळी भाड्याने वापरणे शक्‍य असल्याचा पर्याय सहकार विभागाने "नाफेड'पुढे ठेवला आहे. मात्र, चाळीतील कांद्याचे मोजमाप कसे करायचे, असा प्रश्‍न "नाफेड'च्या अधिकाऱ्यांना पडला आहे. त्याचे उत्तर शोधले गेल्यास शेतकऱ्यांचा कांदा थेट खरेदी होईल आणि शेतकऱ्यांना चाळींचे भाडे मिळण्यास मदत होईल. 

प्रशासकीय खर्चाचा प्रश्‍न

"नाफेड'साठी कांद्याची खरेदी खरेदी-विक्री संघातर्फे केल्यास क्विंटलला चार रुपये दिले जातात. फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीने खरेदी केल्यास दहा रुपये क्विंटल असा प्रशासकीय खर्च मिळतो. मात्र, विविध कार्यकारी सहकारी संस्थेने खरेदी केल्यास प्रशासकीय खर्च 2 टक्के दिला जातो. प्रशासकीय खर्चाच्या परताव्याचा गोंधळ कायम राहिल्याने पिंपळगावमध्ये खरेदीची सुरवात झालेली नाही. त्यावर मार्ग म्हणून केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार करण्याचा निर्णय घेतला आहे. याच प्रश्‍नाच्या पार्श्‍वभूमीवर फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी, शेतकरी संघ, सहकारी संस्थांच्या माध्यमातून खरेदी करण्याच्या सूचना सहकारच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

जिल्ह्यातून सर्व खरेदीचा आग्रह 

"नाफेड'तर्फे 40 हजार टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट निश्‍चित केले होते. त्यात आणखी दहा हजार टनांची भर पडली असून, "नाफेड' आता 50 हजार टन कांद्याची खरेदी करणार आहे. हा कोटा विभागाऐवजी नाशिकमध्ये वापरला जावा, अशी विनंती "नाफेड'च्या अधिकाऱ्यांना केली आहे.  


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com