लष्कर भरतीच्या नावाखाली चौघांना लाखोंचा चुना; पोलिसांकडून एकास अटक

fraud.jpg
fraud.jpg

नाशिक : (देवळाली कॅम्प) मिलिट्री इंजिनियरिंगमध्ये नोकरी लावून देतो असे सांगत चौघा तरुणांची १५ लाख २५ हजार रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मिलिट्री इंटेलिजंसने पोलिसांच्या मदतीने एकाच्या मुसक्या आवळल्या. लष्कर भरतीच्या नावाखाली चौघांना पंधरा लाखांचा गंडा लावल्याने खळबळ उडाली आहे.

अशी आहे घटना

आर्मी इंटलीजन्सने पोलीस आयुक्तांच्या हा प्रकार लक्षात आणून दिल्यानंतर देवळाली कॅम्प पोलिसांत गुन्हा दाखल झाला. अभिषेक राजेश खोब्रागडे हा युवक सध्या नागपूर येथे शिक्षण घेतो. त्याला वडिलांच्या परिचयातील दीपक मोपीडवाल यांनी, पुणे येथील मिलिटरी इंजिनियर सर्व्हिसेस येथे हेल्परची नोकरी लावून देतो असे सांगून ७ लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर गेल्या ४ ऑक्टोबरला नागपूर येथील अर्णव रवींद्र यादव याने ५ लाख ५० हजार, सैफउल्ला शफीउल्ला खान याने चार लाख पन्नास हजार, तर बॉबी ओमकार याने ४ लाख रूपये मोपीडवाल यांच्या सांगण्यावरून सचिन पंडित यांच्या नावे स्टेट बँक ऑफ इंडियातील खात्यात (क्रं. ३८१७६०३२३१६) जमा केले. या व्यतिरिक्त बॉबी ओंकार याने रोख ७५ हजार रूपये त्यांच्याकडे सुपूर्द केली. 

फसवणूक झाल्याचे उघड

या चौघांनाही सलग आठ दिवस पुणे येथे सदर्न कमांडच्या गेटवरून विविध कारणे देत रूमवर पाठवले गेले. त्यानंतर पुणे येथे काम होत नसल्याने तुम्हाला देवळाली कॅम्प येथे जावे लागेल, असे सांगण्यात आले. चौघांनी २० ऑक्टोबरपासून देवळालीत मोपीडवाल यांची प्रतिक्षा केली. तेव्हा २२ ऑक्टोबरला मोपडीवाल यांनी खंडेराव टेकडी परिसरातील लष्करी गेटजवळ दत्ता सुर्वे यांना भेटण्यास सांगितले. त्याने सगळ्यांना रिक्षात बसवून कागदपत्रांची झेरॉक्स प्रत घेतली व कागदपत्रांचे व्हेरिफिकेशन करून येतो, असे सांगून पळून गेला. त्यामुळे चौघांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. 

पोलिसात गुन्हा दाखल

चौघांनी लष्कराच्या इंटेलिन्जन्सला याबाबत माहिती देत पाठपुरावा केला. इंटेलिजन्सकडून पोलिस आयुक्तांना कळविण्यात आल्यानंतर देवळाली कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली असून, लवकरच गुन्ह्यातील आरोपी पकडण्यात येईल अशी माहीती पोलिसांनी दिली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com