थकबाकीमुळे ५७ गावांमध्ये पाणीबाणी! नांदगाव, मालेगाव तालुक्यात २० टक्केच वसुली

संजीव निकम
Thursday, 21 January 2021

पिण्याच्या पाण्याचा पुरवठा खंडित झाला असला तरी ग्रामपंचायत निवडणुकीच्या धामधुमीत पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रकाराकडे सगळ्याच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मात्र दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले. आता नव्या कारभाऱ्यांकडे सूत्रे सोपविली गेली नसल्याने याबाबत कसा तोडगा काढायचा, हा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

नांदगाव (नाशिक) : लाखो रुपयांची पाणीपट्टी थकविण्यात आल्यामुळे गिरणा धरणातून नांदगाव शहरासह योजनेवर विसंबून असलेल्या मालेगाव तालुक्यातील ३९, तर नांदगाव तालुक्यातील १८ खेड्यांचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. योजनेच्या पाणीपट्टीत अवघी २० टक्के वसुली झाल्यामुळे हा पाणीपुरवठा जिल्हा परिषदेने खंडित केला आहे. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा खंडित झाला असला तरी ग्रामपंचायत निवडणुकीच्या धामधुमीत पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रकाराकडे सगळ्याच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मात्र दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले. आता नव्या कारभाऱ्यांकडे सूत्रे सोपविली गेली नसल्याने याबाबत कसा तोडगा काढायचा, हा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

नांदगाव, मालेगाव तालुक्यात २० टक्केच वसुली 

गिरणा धरणातून होणारा पाणीपुरवठा खंडित होण्यामागे पालिका व ग्रामपंचायतीकडे लाखो रुपयांची थकबाकी हे प्रमुख कारण असून, आता थकबाकी भरण्याचे आव्हान नव्या कारभाऱ्यांपुढे आहे. २०२०-२१ वर्षात केवळ २० टक्के वसुली झाल्याने जिल्हा परिषदेच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कार्यकारी अभियंत्यांनी ही कारवाई केली आहे. कोरोनाकाळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या करवसुलीची टक्केवारी घसरल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यात पिण्याचे पाणीच बंद झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गिरणा धरण पाणीपुरवठा योजना जिल्हा परिषदेचा तांत्रिक विभाग चालवितो. त्यात नांदगाव शहर व ५६ खेडी व सुमारे ७५ वस्त्यांना पाणीपुरवठा केला जातो. 

दोन कोटींची थकबकी 

नांदगाव नगर परिषदेकडे एक कोटी ७२ लाख रुपये थकबाकी असून, त्यांपैकी १२ लाख रुपये भरले आहेत. मालेगाव तालुक्यातील ३९ गावांकडे २७ लाख रुपये बाकी असून, त्यांनी केवळ एक लाख ४० हजार रुपयांचा भरणा केला आहे. नांदगाव तालुक्यातील १८ गावांकडे १४ लाख रुपये बाकी असून, फक्त एक लाख २० हजार रुपयांचा भरणा केला आहे. जिल्हा परिषदेने आधी थकबाकी भरा, मगच पाणीपुरवठा सुरू करू, अशी भूमिका घेतल्याने १ जानेवारी २०२१ पासून गिरणा धरणाच्या उद्‍भवातले पंप बंद झाले असून, नागरिक हवालदिल झाले आहेत. 

हेही वाचा > मध्यरात्री जेव्हा चोर लागतो नागरिकांच्या हाती; प्लॅन तर फसलाच अन् नंतर फक्त दे दणा दण

या योजनेतून दररोज दहा दशलक्ष घनफूट (एमएलडी) पाणी सुमारे दोन लाख लोकांपर्यंत पोचविले जाते. त्यामुळे थकबाकी भरण्याची गरज आहे. गिरणा योजना बंद ठेवल्याने नांदगावकरांचे सात दिवसांनी येणारे आवर्तन लांबण्याची शक्यता आहे. - प्रकाश बोरसे, जिल्हा परिषद शाखा अभियंता 

नगर परिषदेच्या प्रतिनिधींनी केलेल्या ठरावानुसार ३.४० रुपये प्रतिहजार लिटर याप्रमाणे रक्कम भरली आहे. जिल्हा परिषदेची मागणी ७.४० रुपये याप्रमाणे आहे. त्याप्रमाणे रक्कम भरण्यासाठी नगर परिषदेच्या ठरावाची गरज आहे. - पंकज गोसावी, मुख्याधिकारी 

हेही वाचा > खासगी सावकारी वादातून अपहरणानंतर अमानुष कृत्य; नाशिकमधील धक्कादायक प्रकार

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Nandgaon, Malegaon taluka only 20 percent water bill was recovered nashik marathi news