esakal | पहाटेचा थरार! रक्तबंबाळ अवस्थेत निपचित पडलेले कुटुंब; हत्येचे कारण अद्यापही गुलदस्त्यातच 
sakal

बोलून बातमी शोधा

nandgaon murder 123.jpg

घराच्या ओसरीवर संपूर्ण कुटुंब रक्तबंबाळ अवस्थेत निपचित पडलेले होते. हे पाहून सांगळे हे  लगेच जेऊरला परतले व त्यांनी सरपंच  राजूभाऊ बोडके  यांना याबाबत माहिती दिली. त्यानुसार  बोडके यांनी वाखारीच्या पोलिसपाटलांचे पती राकेश चव्हाण यांना कळविले . त्यानंतर सर्व जण पुन्हा घटनास्थळी आल्यावर नांदगाव आणि मालेगाव पोलिसांना याबाबत कळविण्यात आले.

पहाटेचा थरार! रक्तबंबाळ अवस्थेत निपचित पडलेले कुटुंब; हत्येचे कारण अद्यापही गुलदस्त्यातच 

sakal_logo
By
संजीव निकम

नाशिक  / नांदगाव : नांदगाव तालुक्यातील वाखारी  ते  जेऊर  शिवारात शुक्रवारी (ता. ७) पहाटे एकाच कुटुंबातील चौघांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आल्याने नांदगाव व मालेगाव तालुके हादरले आहेत. मृतांमध्ये पती-पत्नी व दोन चिमुरड्यांचा समावेश असल्याने हळहळ व्यक्त होत आहे. 

समोरचे  दृश्य बघून ते प्रचंड घाबरले.

वाखारी येथील रिक्षाचालक समाधान चव्हाण (वय ३८), त्यांची पत्नी भारतीबाई  (३०) आणि गणेश (६) व आरोही  (४) हे नेहमीप्रमाणे जेऊर रस्त्यावर मळ्यातील  वस्तीवरील निवासस्थानी झोपलेले होते. समाधानने गुरुवारी (ता. ६) जेऊर येथील मधुकर सांगळे यांच्याकडे कांदे भरण्यासाठी आपली मालवाहू  रिक्षा नेली होती. त्यातील काही कांदे भरून झाले व ते घरी आले. त्यानंतर शुक्रवारी त्यांना उर्वरित काम पूर्ण करायचे होते. त्यामुळे सांगळे हे समाधानला पहाटे पाचपासूनच मालवाहतूक करायची म्हणून फोन करीत होते. मात्र, समाधान फोन उचलत नसल्याने सांगळे सकाळीच समाधानला शोधण्यासाठी वस्तीवरच्या घरी आले. मात्र, समोरचे  दृश्य बघून ते प्रचंड घाबरले.

संपूर्ण कुटुंब रक्तबंबाळ अवस्थेत निपचित

घराच्या ओसरीवर संपूर्ण कुटुंब रक्तबंबाळ अवस्थेत निपचित पडलेले होते. हे पाहून सांगळे हे  लगेच जेऊरला परतले व त्यांनी सरपंच  राजूभाऊ बोडके  यांना याबाबत माहिती दिली. त्यानुसार  बोडके यांनी वाखारीच्या पोलिसपाटलांचे पती राकेश चव्हाण यांना कळविले . त्यानंतर सर्व जण पुन्हा घटनास्थळी आल्यावर नांदगाव आणि मालेगाव पोलिसांना याबाबत कळविण्यात आले. माहिती मिळताच  नांदगावचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे व त्यांचे सहकारी आणि मालेगावचे अपर पोलिस अधीक्षक संदीप घुगे आदी तातडीने तेथे पोचले. परिसरात पाहणीनंतर त्यांनी तपासाच्या सूचना दिल्या. तोपर्यंत नाशिकहून श्‍वानपथकही दाखल झाले. छोट्याशा वस्तीवर एकाच कुटुंबातील  चौघांची निर्घृण हत्या झाल्याचे समजताच वाखारी , जेऊर , साकोरी , पाथर्डे आदी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी तेथे धाव घेतली. 

हत्येचे कारण गुलदस्त्यात 
हत्या झालेल्या चव्हाण कुटुंबीयांची परिस्थिती सर्वसाधारण आहे. त्यांच्या घरातील कपाटांची उचकापाचक करण्यात आल्याचे दिसून आले आहे. तसेच हत्येपूर्वी मृत  महिलेवर अत्याचार झाल्याचा संशय ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. आरती सिंह, मालेगावचे अपर पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, दुपारी चौघांचेही मृतदेह मालेगावच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. पोलिसांनी तपासाची दिशा निश्‍चित केली असून, अधिक तपशील सध्या देणे संयुक्तिक ठरणार नसल्याचे डॉ. सिंह यांनी सांगितले. या भागातील सरपंच व शिक्षकनेते संजय चव्हाण यांनी आपल्या गावातील निरपराध तरुण कुटुंबाची अशा रीतीने भीषण हत्या व्हावी याबद्दल दुःख व्यक्त करीत मारेकरी सापडतील, असा विश्‍वास व्यक्त केला .  

हेही वाचा >नांदगाव हादरले...एकाच कुटुंबातील सर्वांची निघृण हत्या; मोठी खळबळ

तपासाची सूत्रे मालेगावच्या पोलिसांच्या हाती
हत्याकांडाच्या तपासाची सूत्रे मालेगावच्या पोलिसांनी हाती घेतली असून, श्‍वानाने घराच्या मागील बाजूस असलेल्या पिकापर्यंत माग दाखविला व एका ठिकाणी कुऱ्हाडीच्या तुटलेल्या दांडक्याजवळ हे श्‍वान घुटमळले.  फॉरेन्सिक वैद्यकीय पथकानेदेखील रक्ताचे व अन्य नमुने, मृतांचे मोबाईल संच आदी ताब्यात घेतले असून, संशयित दुचाकीवरून  किंवा अन्य वाहनाने, कोठून व कसे आले असावेत या दृष्टीने  माहिती संकलित करण्याचे काम सुरू होते. आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळविण्यासाठीही पोलिसांनी या भागात चौकशी केल्याचे समजते. 

हेही वाचा : दुर्दैवी! खर्च करूनही हाती काहीच नाही; विवंचनेने ग्रासलेल्या शेतकऱ्याची अखेर हिम्मत सुटलीच

संपादन - ज्योती देवरे