मुंबई-पुणे कनेक्‍शनमुळे नाशिककरांच्या काळजाचा वाढला ठोका..! 

corona parprantiy.jpg
corona parprantiy.jpg

नाशिक : मालेगावपाठोपाठ उर्वरित जिल्ह्यांत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढतो आहे. मुंबई-पुण्यातून आलेल्यांमुळे निफाड, सिन्नर, नाशिक, बागलाण, येवला तालुक्‍यांत कोरोना रुग्ण वाढले असून, जिल्ह्यात "कम्युनिटी स्प्रेड'चा धोका बळावलाय. बुधवारी (ता. 27) दिवसभरात 52 रुग्ण वाढले असून, त्यात एकट्या मालेगावातील 25 रुग्णांचा समावेश आहे. 

शहर-जिल्हा प्रशासनाकडे "इनकमिंग'ची नाही नोंद 

दरम्यान, शहर-जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्यांच्या नोंदी प्रशासनाकडे आहेत. मात्र इतर भागातून किती जण शहर आणि जिल्ह्यात आले, याच्या नोंदी प्रशासनाकडे नाहीत. ऊसतोड कामगारांना घरी पाठविण्यासाठीच्या व्यवस्थेत जेथून जायचे आहे आणि जिथे जायचे आहे, अशा दोन्ही ठिकाणी नोंदीची दक्षता घेतली गेली. मात्र, तशी व्यवस्था कायम का ठेवण्यात आली नाही, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

या हलगर्जीबद्दल जिल्हावासीयांनी दोष द्यायचा तरी कोणाला?
लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यातही जिल्हाबंदी कायम असली तरी अडकून असलेल्यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलिसांच्या परवानगीने प्रवासास मान्यता दिली गेली. परिणामी गेल्या दोन आठवड्यांमध्ये नाशिक जिल्ह्यात मुंबई-पुण्यातील अनेक जण आपल्या कुटुंबकबिल्यासह दाखल झाले आहेत. त्यामुळे सिन्नर तालुक्‍यातील कणकोरी, दापूर, वावी, निमगाव; बागलाणमधील वरचे टेंभे, अजमीर सौंदाणे, देवळ्यातील मेशी, येवल्यातील मुखेडमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले. जिल्ह्यात आणखीही परजिल्ह्यातून अनेक नागरिक आलेले आहेत; परंतु त्यांची कोणतीही माहिती जिल्हा प्रशासन वा पोलिसांकडे नसल्याची गंभीर बाब यानिमित्ताने समोर आली असून, प्रशासनाच्या या हलगर्जीबद्दल जिल्हावासीयांनी दोष द्यायचा तरी कोणाला, असा सवाल उपस्थित केला जातो आहे. 

दिवसभरात 56 पॉझिटिव्ह 
बुधवारी (ता. 27) दिवसभरात जिल्ह्यात नवीन 56 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. यात मालेगावात तीन रेल्वे पोलिसांसह 25, नाशिक शहरात 13, सिन्नर तालुक्‍यात आठ, येवला तालुक्‍यात सहा, निफाडमध्ये एक, बागलाणमध्ये चार, तर संगमनेर (जि. नगर) येथील दोन आणि नंदुरबारच्या एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा एक हजार 57 झाला आहे. 

असे आहे मुंबई-पुणे कनेक्‍शन 
* सिन्नरच्या दापूरमध्ये मुंबईत वकिली करणारे कुटुंबीयांसह आले. बुधवारी त्या कुटुंबीयांतील सहा महिन्यांच्या चिमुकल्यासह पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आले, तर वावीमध्येही एकजण पॉझिटिव्ह असून, ती व्यक्तीही मुंबईतून आली आहे. सिन्नर निमगाव येथील पॉझिटिव्ह रुग्ण नाशिक रोडचा आहे. 
* येवल्यातील मुलतानपुऱ्यात चौघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून, ते यापूर्वीच्या रुग्णांच्या संपर्कातील आहेत, तर मुखेडमध्ये मुंबईहून आलेल्या महिलेच्या संपर्कातील आणखी दोघे कोरोनाबाधित झाले आहेत. 
* देवळा व बागलाणमध्ये दोन आठवड्यांपूर्वी मुंबईहून आलेली महिला पॉझिटिव्ह आल्यानंतर उपचारादरम्यान तिचा नाशिकमध्ये मृत्यू झाला. या महिलेचा मेशी, वरचे टेंभे, सटाण्यातील नातलगांकडे वावर झाल्याने तिच्या संपर्कातील आतापर्यंत 12 जण पॉझिटिव्ह आले असून, यात बुधवारी पॉझिटिव्ह आलेल्या दोघांचा समावेश आहे, तर अजमीर सौंदाण्यातील दांपत्याचा प्रवास मुंब्रा येथून असल्याने ते बाधित झाल्याचे निष्पन्न झालेले आहे. 
* निफाड तालुक्‍यात पुण्याहून आलेल्या बाधित रुग्णांमुळे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. 

हेही वाचा > ''तिच्या आईवडिलांनी आमच्या लग्नाला परवानगी नाकरली.. म्हणूनच मी तिच्यासोबत.. ''..माथेफिरू युवकाची धक्कादायक जबानी
 
"कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग' 
पंचवटी, रामनगरमधील कोरोनामुळे मृत व्यापाऱ्याच्या संपर्कातील राहुलवाडीतील युवक बाधित, तर पंचवटीतील बाधित हॉटेलचालकाच्या संपर्कातील दोघे पॉझिटिव्ह. दत्तमंदिर, नाशिक रोड परिसरातील दोन महिला मुंबईहून आल्या असून, त्या कोरोनाबाधित. दीपालीनगर, इंदिरानगर येथील रुग्णाचा पीपीई किट विक्रीचा व्यवसाय असून, त्याचे मुंबई-ठाण्यात नियमित जाणे-येणे होते. त्यातून तो रुग्ण कोरोनाबाधित झाला. आयटी पार्क, वडाळा येथील एक रुग्ण, रासबिहारी हायस्कूलजवळील महिला, वडाळा नाका येथील महिला, दिंडोरी नाका परिसरातील 70 वर्षीय पुरुष कोरोनाबाधित असून, ते यापूर्वीच्या बाधितांच्या संपर्कातील आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com