तब्‍बल ४४ दिवसांनंतर जिल्ह्यात तीनशेहून अधिक कोरोनाबाधित; तिघांचा मृत्‍यू 

अरुण मलाणी
Friday, 19 February 2021

काही दिवसांपासून जिल्ह्यात रोज दोनशेहून अधिक पॉझिटिव्‍ह रुग्ण आढळण्यास सुरवात झालेली असतानाच शुक्रवारी (ता. १९) नव्‍याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्‍या संख्येने तीनशेचा आकडा ओलांडला आहे.

नाशिक : काही दिवसांपासून जिल्ह्यात रोज दोनशेहून अधिक पॉझिटिव्‍ह रुग्ण आढळण्यास सुरवात झालेली असतानाच शुक्रवारी (ता. १९) नव्‍याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्‍या संख्येने तीनशेचा आकडा ओलांडला आहे. दिवसभरात ३३५ कोरोनाबाधित आढळले असून, तब्बल ४४ दिवसांनंतर एका दिवसात तीनशेहून अधिक बाधित आढळले. दरम्‍यान, १४५ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली असून, उपचार घेणाऱ्या तिघा बाधितांचा मृत्‍यू झाला आहे. 

शुक्रवारी ३३५ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह

यापूर्वी ६ जानेवारीला ३४२ रुग्‍णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्‍ह आले होते. मात्र, जानेवारीत त्‍यानंतरच्‍या कालावधीत रोजचे सरासरी दीडशे बाधित आढळत होते. हे प्रमाण फेब्रुवारीत वाढून काही दिवसांपासून सरासरी दोनशे बाधित रोज आढळू लागले आहेत. त्‍यातच शुक्रवारी जिल्ह्यात ३३५ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. या बाधितांमध्ये नाशिक शहरातील २१५, नाशिक ग्रामीणमधील ९७, मालेगावचे २०, तर जिल्‍हाबाहेरील तीन रुग्‍णांचा समावेश आहे. तर बरे झालेल्‍या रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील ४१, नाशिक ग्रामीणमधील ९६, मालेगाव व जिल्‍हाबाहेरील प्रत्‍येकी चार रुग्‍ण आहेत. तीन मृतांमध्ये दोन शहरातील असून, एक नाशिक ग्रामीण भागातील आहे. 
कोरोना बाधितांप्रमाणे संशयित रुग्‍ण संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. दिवसभरात ८५८ संशयित जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात दाखल केले आहेत. यापैकी ८३० नाशिक महापालिका हद्दीतील असून, तीन जिल्‍हा रुग्‍णालयात, पाच रुग्‍ण डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात दाखल आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत ४८६ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. 

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ

विभागीय आयुक्‍तांना कोरोनाची लागण 

विभागीय आयुक्‍त राधाकृष्ण गमे यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्‍ह आला आहे. गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना महापालिका आयुक्‍त पदाची जबाबदारी सांभाळताना त्‍यांनी रुग्‍णालये व कोविड सेंटरला भेटी देत परिस्थितीचा आढावा घेतला होता. तर विभागीय आयुक्‍तपदाची जबाबदारी स्‍वीकारल्‍यानंतर उत्तर महाराष्ट्रभर दौरे केले होते. दरम्‍यान, दोन दिवसांपूर्वी त्‍यांनी कोरोना प्रतिबंधासाठी लस घेतली होती. त्‍यातच शुक्रवारी त्‍यांचा कोविड-१९ चा अहवाल पॉझिटिव्‍ह आला आहे.  

हेही  वाचा - थरारक! सिटबेल्टमुळे पेटलेल्या गाडीत अडकला चालक; नातेवाईकांना घातपाताचा संशय

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik Corona updates 335 positives during the day Marathi news