येस बॅंकेतील पैशांसाठी महापालिकेची धावाधाव..!   

सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 11 March 2020

मुळात येस बॅंकेवर आर्थिक निर्बंध लागू झाल्यानंतर बॅंक प्रशासनाचा काहीच संबंध राहिला नाही. रिझर्व्ह बॅंकेने त्यांचा प्रतिनिधी प्रशासक म्हणून नियुक्त केला आहे. असे असताना महापालिकेच्या लेखा व वित्त विभागाची रिझर्व्ह बॅंकेऐवजी येस बॅंकेशी पत्रव्यवहार करून बौद्धिक दिवाळखोरी उघड तर केलीच, त्याशिवाय उलट बॅंकेवर आणखी औदार्य दाखवून निर्बंध उठतील त्यावेळी पैसे वर्ग करण्याची आश्‍चर्यचकीत करणारी मागणी केली. 

नाशिक : राज्य शासनाने खासगी बॅंकांऐवजी सरकारी बॅंकांमध्ये निधी ठेवण्याचा सल्ला देऊनही खासगी बॅंकेकडे नागरिकांचा कररूपी पैसा ठेवण्याचा अट्टाहास धरलेल्या महापालिकेने येस बॅंकेवर निर्बंध आल्यानंतर अडकलेले 310 कोटी रुपये मिळविण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. वित्त व लेखा विभागाने येस बॅंकेला पत्र पाठवून महापालिकेचे 134 कोटी व स्मार्टसिटी कंपनीचे 176 कोटींचा परतावा देण्याची मागणी केली आहे. परंतु परताव्याची मागणी करताना लेखा विभागाने निर्बंध उठविल्यानंतर, असा उल्लेख करून पुन्हा अपरिपक्वतेचे दर्शन घडविले आहे. विशेष म्हणजे आता रिझर्व्ह बॅंकेचे प्रतिनिधी बॅंकेचे काम पाहत असताना त्यांच्याकडे पत्रव्यवहार करण्याऐवजी येस बॅंकेच्या प्रशासनाकडे केल्याने या विभागाने आणखी स्वतःचे हसू करून घेतले आहे. 

रिझर्व्ह बॅंकेऐवजी येस बॅंकेकडे पत्रव्यवहार; निर्बंध उठवल्यावर निधी वर्गची मागणी 
अनियमित कर्जवाटप व संचालकांच्या गैरवर्तनामुळे येस बॅंक अडचणीत आल्यानंतर रिझर्व्ह बॅंकेने तातडीने येस बॅंकेच्या व्यवहारांवर निर्बंध आणत प्रशासक नियुक्त केले. येस बॅंकेत महापालिकेचे 134 कोटी, तर स्मार्टसिटी कंपनीचे 176 कोटी रुपये अडकले आहेत. स्मार्टसिटी कंपनीच्या बैठकीत येस बॅंकेत पैसे न ठेवण्याचा सल्ला देण्यात येऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अखेरीस बॅंकेवरील निर्बंधामुळे प्रशासनाचे पितळ उघडे पडले आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ज्या अधिकाऱ्यांनी येस बॅंकेत पैसे ठेवले त्यांची चौकशी करण्याचे जाहीर केले आहे.

महापालिकेकडून अपरिपक्वतेचे दर्शन 

बॅंकेत अडकलेले पैसे मिळविण्यासाठी प्रशासनाकडून काहीतरी हालचाल केल्याचा दिखावा करण्यासाठी लेखा व वित्त विभागातर्फे येस बॅंकेच्या प्रशासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला. बॅंकेवरील निर्बंधामुळे महापालिका व स्मार्टसिटी कंपनीचे व्यवहार अडचणीत आले असून, महापालिकेच्या आरबीआयच्या खात्यामध्ये येस बॅंकेतील निधी वर्ग करण्याची मागणी करण्यात आली. 

लेखा विभागाची दिवाळखोरी 
मुळात येस बॅंकेवर आर्थिक निर्बंध लागू झाल्यानंतर बॅंक प्रशासनाचा काहीच संबंध राहिला नाही. रिझर्व्ह बॅंकेने त्यांचा प्रतिनिधी प्रशासक म्हणून नियुक्त केला आहे. असे असताना महापालिकेच्या लेखा व वित्त विभागाची रिझर्व्ह बॅंकेऐवजी येस बॅंकेशी पत्रव्यवहार करून बौद्धिक दिवाळखोरी उघड तर केलीच, त्याशिवाय उलट बॅंकेवर आणखी औदार्य दाखवून निर्बंध उठतील त्यावेळी पैसे वर्ग करण्याची आश्‍चर्यचकीत करणारी मागणी केली. 

हेही वाचा > लग्न जमण्याच्या आधीच 'दोघांना' भेटणं पडलं चांगलच महागात...! 

"ती' महिला कोण? 
महापालिकेचा सरकारी बॅंकांमधील पैसा ज्यावेळी सरकारी बॅंकांमधून काढून खासगी बॅंकांमध्ये टाकला जात होता त्याबरोबरच सर्व सेवा ऑनलाइन करताना खासगी बॅंकांना अधिक प्राधान्य दिले जात होते. त्या वेळी एका खासगी बॅंकेच्या उच्च पदावर असलेली एक महिला कायम महापालिकेत घिरट्या घालत होती. बदली झालेल्या एका अधिकाऱ्याशी कायम संपर्कात असलेल्या या महिलेच्या माध्यमातूनच खासगी बॅंकांमध्ये पैसे ठेवल्याची चर्चा महापालिकेत सुरू आहे.

हेही वाचा >  भयानक प्रकार! हुंडा दिला नाही म्हणून डोक्यात घातला लाकडी दांडका..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik Municipal corporation demands for money in Yes Bank Nashik Marathi News