नाशिकच्या वैभवातील एक मानाचे पान! ग्रामदैवत श्रीकालिका माता देवस्थान; VIDEO पाहून घ्या दर्शनाचा लाभ

kalika mata.jpg
kalika mata.jpg

नाशिक : नाशिकच्या जुन्या आग्रारोड नजीक असलेले कालिका मातेचे मंदिर म्हणजे नाशिकच्या वैभवातील एक मानाचे पानचं! नवरात्रीच्या दिवसांत भाविकांची पाऊले दूरून कालिकेच्या मंदिराकडेच जातात. अश्या या जागृत देवस्थानाची महती व इतिहास जाणून घेऊ...

अत्यंत जागृत व नवसाला पावणारे देवस्थान

नाशिक शहरात फार पुरातन काळापासून म्हणजे मराठ्यांच्या राज्यात शहराच्या दक्षिण टोकाला जंगलामध्ये, रस्ताने जातांना वटवृक्षाच्या दुतर्फा रांगा व हिरव्यागार वनराईत निसर्गाच्या सानिध्यांत, रमणीय अशा जागेत लहानसे विटांचे बांधलेले श्री कालिका देवीचे मंदिर होते. ते अत्यंत जागृत व नवसाला पावणारे म्हणुन प्रसिध्द होते. त्याचा अनुभव बर्‍याच सात्विक लोकांनी घेतलेला आहे. इ.स.१७०५ च्या सुमारास श्री कालिका मंदिराचा जीर्णोद्धार श्रीमंत आहिल्याबाई होळकर यांनी केला. पुर्वीचे मंदिर १० बाय १० क्षेत्रफळाचे व १५ फुट उंच असे दगडी स्वरुपाचे होते व त्या ठिकाणी बारवही (विहिर) बांधण्यात आला होता.

मातेचे रुप अतिशय लोभस आणि सात्विक

मंदिरातील गाभाऱ्यात उंच ओट्यावर महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली यांच्या मूर्ती आहेत. पूर्वी या ठिकाणी फक्त कालिकेची शेंदूरचर्चित मूर्ती होती पण तिचे कवच काढून हल्लीची नयनमनोहर मूर्ती तयार करून घेण्यात आली आहे. येथे श्रीकालिका माता कुमारिकेच्या स्वरूपांत आहे. तिचे स्वरूप चंडिकेसारखे उग्र नसून एखाद्या लहान बाल‌िकेसारखे अतिशय लोभस आणि सात्विक आहे. देवीच्या मागे नऊ फण्यांचा शेषनाग दिसतो आहे. तिच्या पायाखाली तीन राक्षसांची मुंडकी आहेत. त्यावर कालिकादेवी उभी आहे. तिच्या उजव्या बाजूंच्या हातांत त्रिशूल व तलवार तर डाव्या बाजूंच्या हातांत डमरू व खडग आहे. तसेच कमंडलू सारखे भांडे देखील आहे.

यात्रेचे दिवसेंदिवस अधिक स्वरुप

स्वातंत्र्यपूर्वकालिन म्हणजे लोकमान्य टिळकांच्या स्वराज्याच्या चळवळीपासून श्री कालिका मंदिर येथे नवरात्र यात्रा भरू लागली व गावातील सर्व मंडळी, भाविक व स्वातंत्रसैनिक एकत्र जमू लागले. स्वातंत्रच्या कल्पनेबरोबर धार्मिक कार्यक्रम मधुन सीमोल्लंघन करण्याकरीता या देवस्थानापर्यंत येऊ लागले. त्यावेळेपासून दरवर्षी यात्रेचे दिवसेंदिवस जास्त स्वरुप येऊ लागले व हजारोंच्या संख्येने लोक यात्रेस व दर्शनास येऊ लागले.

मानवावर धार्मिक व अध्यात्मिक जीवनाचे संस्कार

मानवावर धार्मिक व अध्यात्मिक जीवनाचे संस्कार करणारे साधन म्हणून मंदिराचा धार्मिक पीठासारखा उपयोग व्हावा ही मंदिरे उभारण्या मागील महत्वाची कल्पना आता सर्वमान्य ठरलेली आहे. इतिहासकालीन भारतामध्ये सर्व ठिकाणी मंदिरे बांधण्याची कल्पना झालेली असुन विशेषत; महाराष्ट्रामध्ये मराठे, पेशवे, सरदार, राजे, महाराजे यांनीही त्यांचा पुरस्कार करून ठिकठिकाणी मंदिरे, बारव, वाडे, धर्मशाळा, घाट हजारो लाखो रूपये खर्च करून केलेले आहे व आपली किर्ती अजरामर करून ठेवलेली आहे. परंतु हल्ली आता त्यावेळची मंदिरे व धर्मशाळा, घाट आज जीर्ण झाल्यामुळे जीर्णोध्दारासाठी भाविकांची मनधरणी करु पाहत होती. व त्यामधुनच कालिका देवीच्या मंदिराच्या जर्णोध्दाराचा उगम झाला.

नवरात्रात आणि वर्षभर मंदिर परिसरावर टीव्हीद्वारे नियंत्रण

पूर्वी कालिकेच्या मंदिराचा आतला भाग अतिशय लहान होता. बाहेरचा सभा मंडपही पत्र्याचा व लहान असल्यामुळे यात्रेच्यावेळी भाविकांना दर्शन घेताना अत्यंत अडचण होई. त्यामुळे मंदिराच्या विस्ताराची मागणी पुढे आली. जनतेचे सहकार्य व मदत घेऊन तत्कालीन नगराध्यक्ष डॉ. वसंतराव गुप्ते यांनी २० डिसेंबर १९७४ रोजी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे भूमिपूजन केले. त्यानंतर बरोबर सहा वर्षांनी १९८० साली हल्ली आग्रारोडवर दिमाखात उभे असलेले श्रीकालिका देवीचे कलाकुसरीने नटलेले विशाल मंदिर व सभामंडप तयार झाले. या मंदिराचा गाभारा अठरा बाय अठरा फुटांचा तर शिखर ३० फूट उंच आहे. गाभाऱ्यापुढचा सभामंडप ४० बाय ६० फूट एवढा मोठा आहे. आता तर मंदिराला दोन्ही बाजूंना भव्य प्रवेशदारे आणि संपूर्ण परिसराला फरशी लावण्यात आली आहे. नवरात्रात आणि वर्षभर मंदिर परिसरावर क्लोजसर्किट टीव्हीद्वारे नियंत्रण ठेवले जाते.

जयपूरहून देवींच्या तिन्ही मूर्ती घडविल्या

सुरुवातीला हे फक्त कालिका मातेचे मंदिर होते. कालांतराने तिवारी, मेहेर, वाजे या देवीभक्तांनी महालक्ष्मी व महासरस्वती यांच्या मूर्ती मंदिराला भेट दिल्या. त्यानंतर थेट जयपूरहून देवींच्या तिन्ही मूर्ती तयार करून, त्यांची यथासांग प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. मनाला शांतता मिळवून देणारे मंदिर कसे सुंदर, प्रशस्त, निवांत व स्वच्छ असावे याचे चालते बोलते उदाहरण म्हणजे नाशिकचे श्रीकालिका मंदिर. यात्रोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होणाऱ्या लाखो भाविक भक्तांसाठी सर्व प्रकारचा बंदोबस्त ठेवण्यासाठी प्रशासनाच्या विविध विभागांसोबत ग्रामदैवत श्रीकालिका देवीमंदिर विश्वस्थ मंडळ तत्पर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com