मेडिकल टुरिझममध्ये जागतिक नकाशावर 'नाशिक'! किफायतशीर उपचारामुळे मिळतेय पसंती 

अरुण मलाणी
Friday, 1 January 2021

गेल्‍या काही वर्षांपासून नाशिकमधील वैद्यकीय व्‍यवस्‍था बळकट होत चालली असून, आता केवळ शहर-जिल्ह्यातील रुग्णांसोबत राज्‍यभरातील तसेच देश-विदेशातील रुग्ण उपचारासाठी नाशिकला दाखल होतायत. अनुकूल वातावरण, अद्ययावत सुविधांसह अन्‍य ठिकाणांच्‍या तुलनेत किफायतशीर उपचारामुळे रुग्ण उपचारासाठी नाशिकची निवड करत आहेत. जगाच्‍या नकाशावर मेडिकल टुरिझमच्‍या क्षेत्रात नाशिकचे नाव अग्रक्रमाने घेतले जाऊ लागले आहे. 

नाशिक : धकाधकीच्‍या जीवनशैलीत नवनवीन व्‍याधी उद्भवू लागल्‍या आहेत. त्‍यातच कोविडच्‍या प्रादुर्भावामुळे आरोग्‍य व्‍यवस्‍थेचे महत्त्व अधिकच वाढले आहे. परंतु गेल्‍या काही वर्षांपासून आरोग्‍याच्‍या क्षेत्रात नाशिकचा नावलौकिक वाढत चालला आहे. याचे कारण म्‍हणजे अत्‍यंत गुंतागुंतीच्‍या, क्‍लिष्ट अशा शस्त्रक्रिया नाशिकला होऊ लागल्‍या आहेत. नाशिकच्‍या क्षमतांना हेरून बहुराष्ट्रीय रुग्णालयांची उभारणी नाशिकला झालेली आहे. यात एचसीजी, अपोलो हॉस्‍पिटल, सह्याद्री हॉस्‍पिटल, वोक्‍हार्टसह अशोका मेडिकव्‍हर, रामालय अशी प्रशस्त रुग्‍णालये नाशिकमध्ये कार्यान्‍वित झाली आहेत.

अनुकूल वातावरण, अद्ययावत सुविधांसह किफायतशीर उपचारामुळे मिळतेय पसंती 

समवेत विस्तारणाऱ्या या शहरात प्रत्‍येक उपनगरीय भागामध्ये सुसज्‍ज वैद्यकीय सुविधायुक्‍त रुग्‍णालये चालविली जात आहेत. याचा परिणाम म्‍हणजे दर दिवशी कुठल्‍या न कुठल्‍या रुग्णालयात गुंतागुंतीच्‍या रुग्णावर यशस्‍वी शस्त्रक्रिया, उपचार केल्‍याच्‍या यशोगाथा ऐकण्यास मिळू लागल्या आहेत. अशा शस्त्रक्रियांची माहिती त्‍या-त्‍या वैद्यकीय शाखांच्‍या आंतरराष्ट्रीय जर्नल्‍समध्ये प्रसिद्ध होत असल्‍याने या माध्यमातूनही नाशिकचे नाव जागतिक स्‍तरावर पोचत आहे. साधारणतः वर्षाला पन्नासहून अधिक रुग्ण परदेशातून नाशिकला उपचारासाठी दाखल होऊ लागले असून, ही संख्या वाढतच चालली आहे. 

हेही वाचा - ह्रदयद्रावक! केवळ लेकरासाठीच मातेचे कष्ट अन् धडपड; नियतीचा घाला आला आणि सहा वर्षाचं लेकरू झालं पोरकं

आयुर्वेद उपचारासाठी नाशिकलाच पसंती 
मेडिकल टुरिझम क्षेत्रात आपली छाप सोडत असताना नाशिकमध्ये विविध वैद्यकीय शाखांच्‍या उपचारपद्धती रुग्णांकरिता प्रभावी ठरत आहेत. १९२४ मध्ये नगरमध्ये स्‍थापन झालेले व स्‍वातंत्र्यपूर्व काळात १९४५ मध्ये नाशिकला स्थलांतरित झालेल्‍या आयुर्वेद सेवा संघात आयुर्वेदशास्‍त्राच्‍या शिक्षणासाठी देशभरातून विद्यार्थी दाखल होत असतात. सोबत संस्‍थेच्‍या प्रांगणात औषधी भवन, रुग्णालय आहे. संस्‍थेसोबत अन्‍य विविध कंपन्‍या आयुर्वेदिक औषधांची नाशिकला निर्मिती करत असतात, तर येथील नामांकित वैद्य टेली-मेडिसिनद्वारे जगभरातील रुग्णांवर उपचार करतायत. होमिओपॅथीसंदर्भातही मोठे संशोधनकार्य नाशिकला होते आहे. युनानी शाखेचा प्रभावी वापर मालेगाव परिसरात होतो आहे. कोरोनाच्‍या काळात तर युनानी शाखेतील काढ्याने जगभराचे लक्ष वेधले होते. 

हेही वाचा - सरपंचपद भोगल्यानंतर भयाण वास्तवाचा सामना! माजी सरपंचांवर आज मजुरीची वेळ 

कर्करोगाच्‍या क्षेत्रातही उमटविलाय ठसा 
नाशिकमध्ये एचसीजी मानवता कॅन्‍सर हॉस्‍पिटलच्‍या माध्यमातून प्रशस्‍त रुग्णालय कार्यान्वित असून, आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे रुग्णांवर शस्त्रक्रिया करत जीवदान दिले जात आहे. जागतिक स्‍तरावर झालेल्‍या सुमारे एक हजार रोबोटिक्‍स शस्त्रक्रियांपैकी ३२४ शस्त्रक्रिया या रुग्णालयात झाल्या असून, यामुळे नाशिकचे नाव उंचावले गेले आहे. नामको चॅरिटेबल ट्रस्‍टचे रुग्‍णालयदेखील कर्करोगग्रस्‍तांच्‍या दुःखावर फुंकर घालत उपचार करत आहे. 

पायाभूत सुविधा चांगल्‍या, पण विमानसेवा सुरळीत व्‍हावी 

मेडिकल टुरिझममध्ये नाशिकची ओळख निर्माण होण्यात येथील तज्‍ज्ञ डॉक्‍टरांचा सिंहाचा वाटा आहे. सोबत रुग्णालयांपर्यंत पोचण्यासाठी चांगल्‍या पायाभूत सुविधांचेही महत्त्व अधोरेखित होते. रस्‍त्‍यांचे चांगले जाळे असल्‍याने रुग्ण जलदगतीने नाशिकला पोचू शकतात. औरंगाबादसह अन्‍य काही रस्‍त्‍यांचा दर्जा सुधरविण्याची आवश्‍यकता आहे. सोबत विमानसेवा सुरळीत होणेही तितकेच गरजेचे आहे. 

मेडिकल टुरिझमला यामुळे मिळतेय बळ 
-चांगल्या, पौष्टिक वातावरणामुळे उपचारास मिळतोय प्रतिसाद. 
-इगतपुरीला आंतरराष्ट्रीय दर्जाचे विपश्‍यना केंद्र. 
-वैद्यकीय शिक्षण देणारे महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय आहे. 
-नामांकित फार्मास्‍युटिकल कंपन्‍यांकडून औषधनिर्मिती होते. 
-योग विद्या धाम व अन्‍य संस्‍थांकडून योगाचे प्रशिक्षण दिले जातेय. 

सुमारे दहा वर्षांपूर्वी मुंबई, पुण्यात अत्‍याधुनिक तंत्रज्ञान उपलब्‍ध असल्‍याने येथील रुग्‍णदेखील तेथे उपचारासाठी पसंती देत. परंतु आता नाशिकमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान व आरोग्‍य सुविधा उपलब्‍ध झाल्‍या आहेत. रोबोटिक्‍स शस्त्रक्रियांसारखे तंत्रज्ञान नाशिकला एक पाऊल पुढे नेते. महत्त्वाचे म्‍हणजे नाशिकमध्ये मिळणारी आपुलकी, रुग्णांच्या नातेवाइकांची वास्‍तव्‍याची चांगली व्‍यवस्‍था यामुळे मेडिकल टुरिझम क्षेत्रात नाशिकचे महत्त्व वाढत आहे. -डॉ. राज नगरकर, प्रमुख, एचसीजी मानवता कॅन्‍सर हॉस्‍पिटल  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik on world map in medical tourism nashik marathi news