दिल्लीतील शेतकरी आंदोलनास महाराष्ट्राचे बळ; नाशिकहून शेतकरी दिल्लीकडे रवाना; पाहा VIDEO

विनोद बेदरकर
Saturday, 2 January 2021

शेतीसाठी वापरल्या जाणार्‍या विजेवरील अनुदान रद्द करून व दराचे वेगवेगळे टप्पे रद्द करून सर्व ग्राहकांना एकसमान पध्दतीने विज आकारणी करावी. जोपर्यंत हे कायदे रद्द केले जात नाही तोपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. 

नाशिक : शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करावेत, भांडवलदार हिताचे निर्णय घेणाऱ्या मोदी सरकारचा निषेध असो, मोदी सरकार हाय हाय अशा घोषणा देत नाशिकहून किसान संघर्ष यात्रेव्दा्रे शेतकरी शनिवारी (ता.2) दिल्लीकडे रवाना झाले. दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनात हे शेतकरी सहभागी होणार आहे. 

केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी 

अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली आज शनिवारी (ता.2) नाशिकमधील गोल्फ क्लब मैदानावरवरून दुपारी अडीचच्या सुमारास दिल्लीसाठी रवाना झाले. 23 डिसेंबरपासून दिल्लीत शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू असून केंद्र सरकार शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी आंदोलकांना बदनाम करत असल्याचा आरोप करीत, किसान सभेचे कार्याध्यक्ष राजू देसले प्रकाश रेड्डी, किसान सभा जिल्हा अध्यक्ष भास्कर शिंदे, सरचिटणीस देविदास भोपळे, जिल्हा संघटक विजय दराडे, सुकदेव केदारे, अँड. दत्तात्रय गांगुर्डे, नामदेव बोराडे, मधुकर मुठाळ, प्रा. के एन अहिरे, जगन माळी, विठोबा घुले आदीच्या नेतृत्वाखाली शेतकरी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले. 

किसान सभेचे कार्याध्यक्ष राजू देसले म्हणाले...

देशातील कोणत्याही शेतकर्‍याने किंवा शेतकरी संघटनांनी या कायद्याची मागणी केलेली नाही. तरी हे कायदे शेतकर्‍यांच्या माथी मारण्यात आले. या कायद्याने शेतीमालाचा संपुर्ण व्यापार कार्पोरेट कंपन्यांच्या हाती जाणार आहे. या कायद्यामुळे शेतकर्‍यांवर अन्याय होणार आहे. शेतीसाठी वापरल्या जाणार्‍या विजेवरील अनुदान रद्द करून व दराचे वेगवेगळे टप्पे रद्द करून सर्व ग्राहकांना एकसमान पध्दतीने विज आकारणी करावी. जोपर्यंत हे कायदे रद्द केले जात नाही तोपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. 

हेही वाचा - सरपंचपद भोगल्यानंतर भयाण वास्तवाचा सामना! माजी सरपंचांवर आज मजुरीची वेळ 

आंदोलनाचा मार्ग

नाशिकवरुन पिंपळगाव बंसवंत, चांदवड येथे या शेतकरी आंदोलनाचे स्वागत होणार आहे. धुळे येथे जाहीर सभा होऊन रात्रीच आंदोलक मोजरी (जि.अमरावती) येथे मुक्काम करून रविवारी (ता. 3) जानेवारीला दुपारी दोनला नागपूरला पोहचतील. तेथे अखिल भारतीय किसान सभा राष्ट्रीय महासचिव अतुल कुमार अंजान यांची जाहीर सभा होईल.  

हेही वाचा - ह्रदयद्रावक! केवळ लेकरासाठीच मातेचे कष्ट अन् धडपड; नियतीचा घाला आला आणि सहा वर्षाचं लेकरू झालं पोरकं


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashiks farmers will participate in ongoing farmers agitation in Delhi nashik marathi news