राष्ट्रीय हरित लवादचे आदेश; अधिकाऱ्यांची धावपळ...

malegav.jpg
malegav.jpg

नाशिक : मालेगाव शहरातील प्लॅस्टिक व सायजिंग प्रदूषणाची राष्ट्रीय हरित लवादाने गंभीर दखल घेत 185 प्लॅस्टिक गिट्टी कारखाने व 28 सायजिंगला क्‍लोजर नोटीस बजावली होती. महापालिका व स्थानिक प्रशासनाने कागदोपत्री कारवाई केल्याचा अहवाल लवादाला सादर केला. मात्र, लवादाने स्थानिक प्रशासनावर गंभीरपणे ताशेरे ओढत कारवाईचे आदेश दिले. यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. या पार्श्‍वभूमीवर बुधवारी (ता. 5) येथील सुसंवाद हॉलमध्ये प्लॅस्टिक असोसिएशन व सायजिंग ओनर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना लवादाने दिलेल्या उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. धूळ, धूर, जल, मलप्रदूषण रोखण्यासंदर्भात उपाययोजना केल्या, की नाही यांसह कारवाईची पाहणी करण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. 

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी घेतली अधिकाऱ्यांची बैठक...
जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मंगळवारी येथील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्यानंतर प्रशासन सतर्क झाले. बुधवारी अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. अपर जिल्हाधिकारी, अपर पोलिस अधीक्षक, महापालिका आयुक्त, महावितरणचे कार्यकारी अभियंता व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी अशी पाच सदस्यीय समिती सायजिंग व गिट्टी कारखान्यांची प्रत्यक्ष पाहणी करून लवादाला अहवाल सादर करणार आहे. निवासी वस्तीतील सायजिंग व गिट्टी कारखाने बंद आहेत.

संबंधितांविरुद्ध कारवाई होईल , अधिकाऱ्यांनी दिला इशारा...

सांडपाणी प्रक्रिया करा, प्रदूषणविरोधी उपाययोजना करा. सायजिंग, बॉयलरची उंची निर्धारित उंचीएवढी असावी. कामगारांना सर्व प्राथमिक सुविधा द्याव्यात, अशा सूचना संबंधितांना दिल्या. लवादाच्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी उद्योजकांनी सहकार्य करावे अन्यथा प्रशासन संबंधितांविरुद्ध कारवाई करेल, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला. राष्ट्रीय हरित लवादाच्या खंडपीठाने स्थानिक प्रशासकीय यंत्रणेवर 21 जानेवारीला झालेल्या सुनावणीत ताशेरे ओढले होते.

प्लॅस्टिक कारखाना मालकांनी मांडल्या व्यथा... 
राष्ट्रीय हरित लवादासमोर 24 फेब्रुवारीला होणाऱ्या सुनावणीत संबंधित पाचही अधिकाऱ्यांनी स्वत: उपस्थित राहण्याचे आदेश लवादाने दिले आहेत. बैठकीत सायजिंगधारक व गिट्टी कारखाना, तसेच प्लॅस्टिक कारखाना मालकांनी व्यथा व अडचणी मांडल्या. सायजिंगमध्ये प्लॅस्टिक कचरा जाळणाऱ्यांवर कठोर कारवाई करा. आम्ही प्रशासनाच्या पाठीशी राहू, असे संबंधितांनी सांगितले. अपर पोलिस अधीक्षक संदीप घुगे, उपायुक्त नितीन कापडणीस, उपअधीक्षक रत्नाकर नवले, सायजिंग ओनर्सतर्फे युसूफ इलियास, प्लॅस्टिक असोसिएशनचे मुकेश झुनझुनवाला, रविश मारू, संबंधित अधिकारी, सायजिंगमालक व गिट्टी कारखानदार उपस्थित होते.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com