कसारा घाटाच्या पायथ्याशी वसणार नवे 'नगर'!

विक्रांत मते : सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

मुंबई, ठाणे व नाशिक शहरांवरील नागरीकरणाचा भार हलका करण्याच्या उद्देशाने समृद्धी महामार्गालगत निर्माण केल्या जाणाऱ्या अठरा नवनगरांमध्ये कसारा घाटाच्या पायथ्याशी असलेल्या फुगाळे गावाचा समावेश करण्यात आला आहे. या भागात कृषीप्रक्रिया तसेच पर्यावरण विभागाच्या सूचीत समाविष्ट असलेल्या उद्योगांची उभारणी केली जाणार असून, रहिवासी विभाग, शाळा, रुग्णालयांसाठी व्यवस्था केली जाणार आहे. 

नाशिक : मुंबई, ठाणे व नाशिक शहरांवरील नागरीकरणाचा भार हलका करण्याच्या उद्देशाने समृद्धी महामार्गालगत निर्माण केल्या जाणाऱ्या अठरा नवनगरांमध्ये कसारा घाटाच्या पायथ्याशी असलेल्या फुगाळे गावाचा समावेश करण्यात आला आहे. या भागात कृषीप्रक्रिया तसेच पर्यावरण विभागाच्या सूचीत समाविष्ट असलेल्या उद्योगांची उभारणी केली जाणार असून, रहिवासी विभाग, शाळा, रुग्णालयांसाठी व्यवस्था केली जाणार आहे. 

महामार्गासाठी 55 हजार 335 कोटी रुपये खर्च केला जाणार

समृद्धी महामार्ग तयार करण्याची जबाबदारी असलेल्या रस्ते विकास महामंडळामार्फत नवनगर निर्माण करण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नागपूर-मुंबई या दोन महानगरांना जोडणारा 701 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाचे काम सध्या सुरू आहे. सहापदरी महामार्गावर ताशी 120 ते 150 किलोमीटर वेगाने वाहने धावणार असून, संपूर्ण कॉंक्रिटच्या या महामार्गासाठी 55 हजार 335 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. 

काम महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या देखरेखीखाली सुरू 

महामार्गावर 26 इंटरचेंजेस असल्याने त्या भागात बिझनेस सेंटर उभे राहणार आहेत.
रस्त्यांच्या पारंपरिक पद्धतीला छेद देत नव्या पद्धतीच्या या महामार्गाला लागून अठरा नवनगरे वसविली जाणार आहेत. मोठ्या शहरांवर भविष्यात पडणारा ताण लक्षात घेता ही नवनगरे महत्त्वाची ठरणार आहेत. समृद्धी महामार्गाचे काम महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या देखरेखीखाली सुरू असल्याने महामंडळाच्या माध्यमातूनच नवनगरांच्या निर्मितीचे नियोजन करण्यात आले आहे. 

हेही वाचा > 'जो आपल्याशी नडला त्याला आपण फोडला!'...'इथं' गुंडच देताय पोलिसांना आव्हान 

नाशिकला अधिक फायदेशीर 

नाशिकपासून फुगाळे गावाचे अंतर 65 किलोमीटर आहे. त्यातही कृषीप्रक्रिया उद्योगांसह प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषात बसणाऱ्या उद्योगांसाठी या भागात भूसंपादन होणार आहे. औद्योगिक, निवासी, शाळा, हॉस्पिटल तसेच, अन्य पायाभूत सुविधांसाठी भूसंपादन केले जाणार आहे. नाशिकमध्ये कृषी संबंधित उत्पादने मोठ्या प्रमाणात असल्याने भविष्यात कृषीप्रक्रिया उद्योगांची उभारणी झाल्यास कृषी क्षेत्राला अधिक चालना मिळेल.

आमणे, हिव व रास या गावांमध्येही नवनगरे निर्माण करण्याचे नियोजन

मुंबईसह देशभरातील बाजारपेठांमध्ये रस्ते मार्गाने तयार माल पोचविण्याची जलद व्यवस्था समृद्धी महामार्गाच्या निमित्ताने उपलब्ध होणार आहे. त्या अनुषंगाने नवनगराची निर्मिती केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. फुगाळेसह याच भागातील आमणे, हिव व रास या गावांमध्येही नवनगरे निर्माण करण्याचे नियोजन रस्ते विकास महामंडळाचे असल्याचे सांगण्यात आले.  

हेही वाचा > 'भाजपसोबत जिंकल्यानंतरही कुस्तीला तयार!' - गुलाबराव पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Navnagar' at fugale Shivar at the base of Kasara Ghat nashik marathi news