'भाजपसोबत जिंकल्यानंतरही कुस्तीला तयार!' - गुलाबराव पाटील

सकाळ वृत्तसेवा
Friday, 31 January 2020

मराठवाड्या प्रश्‍नी माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या आंदोलनावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणी रोखाल, तर यादा राखा, असा इशारा दिला होता. हा इशारा नाशिकसोबत नगरसाठीही होता, याकडे कसे पाहता, या पत्रकारांच्या प्रश्‍नाला उत्तर देताना..

नाशिक : भारतीय जनता पक्षासोबत कुस्ती करून आम्ही जिंकलो आहोत. अजूनही कुस्ती करायला तयार आहोत, असे आव्हान जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गुरुवारी (ता. 30) येथे दिले. तसेच, जामनेरमधील सगळे प्रश्‍न सुटले असल्याने कदाचित माजी मंत्री गिरीश महाजन बैठकीसाठी आले नसावेत, असे टीकास्त्रही त्यांनी सोडले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विभागीय बैठकीसाठी श्री. पाटील नाशिकमध्ये आले होते. 

30 वर्षांपासून शिवसेना या शक्तीचा वापर भाजपने केला 

माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावर बोलताना त्यांनी 30 वर्षांपासून शिवसेना या शक्तीचा वापर भाजपने केला असल्याने त्यांना आरोप करण्याचा अधिकार नाही, असा टोला लगावला. भाजपसोबत जावे की नाही याचा सर्वस्वी निर्णय हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याबाबत मात्र श्री. पाटील यांनी मौन पाळले. 

दबावाखाली किती काम करायचे हा मुख्यमंत्र्यांचा प्रश्‍न - विखे 

शिवसेना हा भाजपचा नैसर्गिक मित्र आहे, या सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्‍त्यव्यात चुकीचे काय आहे? अनेक वर्षे दोन्ही पक्ष एकत्र राहिले आहेत, असे सांगून माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत किती दबावाखाली काम करायचे, हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रश्‍न असल्याची टीका केली.

हेही वाचा > "हा बाबा सकाळी लवकर शपथ घेत असतो" नाशिकच्या थंडीत अजित पवारांची तुफान फटकेबाजी!

मराठवाड्याचे पाणी अडवले तरच तो विषय

मराठवाड्या प्रश्‍नी माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या आंदोलनावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणी रोखाल, तर यादा राखा, असा इशारा दिला होता. हा इशारा नाशिकसोबत नगरसाठीही होता, याकडे कसे पाहता, या पत्रकारांच्या प्रश्‍नाला उत्तर देताना श्री. विखे यांनी मराठवाड्याचे पाणी अडवले तरच तो विषय आहे, अशी प्रतिक्रिया नोंदवली. नाशिक अथवा नगरच्या पाण्याबाबत तो विषय नाही. मराठवाड्याच्या पाण्याच्या अनुषंगाने श्री. फडणवीस बोलले असणार, अशी बाजू त्यांनी सावरली. नगर जिल्ह्याच्या निर्मितीविषयी खूप चर्चा झाली आहे, असे सांगून त्यांनी हा विषयही टाळला.  

हेही वाचा > मुंबई-पुणे-नाशिक विकासाच्या सुवर्णत्रिकोणाला प्राधान्य : उद्धव ठाकरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ready to wrestle even after winning with BJP-gulabrao patil's statement nashik marathi news