आमदार पवारांची सभेत बदनामी; माजी आमदार पुत्रावर कारवाईची राष्ट्रवादीची मागणी 

रतन चौधरी
Monday, 9 November 2020

गावित यांनी खोटे आरोप करून अतिशय खालच्या पातळीवर जाऊन बदनामी केल्याची चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी केली. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसेच आमदार नितीन पवार यांच्या जाहीर सभेत अत्यंत खालची भाषा वापरून बदनामी केल्याप्रकरणी माजी आमदारपुत्र व पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती इंद्रजित गावित यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने निवेदनाद्वारे पोलिस निरीक्षकांकडे केली आहे. 

जनआंदोलनाचा इशारा

निवेदनात म्हटले आहे की, २ नोव्हेंबरला होळी चौक येथील मोर्चात कुठलाही ठोस पुरावा नसताना गावित यांनी खोटे आरोप करून अतिशय खालच्या पातळीवर जाऊन बदनामी केल्याची चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी केली. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. गुन्हा दाखल न झाल्यास तालुक्यात बंद ठेवत घटनेच्या निषेधार्थ जनआंदोलनाचा इशारा निवेदनात दिला आहे. 

हेही वाचा > शेडनेट पंजाच्या सहाय्याने फाडून आत शिरण्यात बिबट्या अयशस्वी; तरीही डाव साधलाच

निवेदनावर तालुकाध्यक्ष राजेंद्र पवार, ज्येष्ठ नेते गोपाळ धूम, नवसू गायकवाड, पंडित घाटाळ, आनंदा झिरवाळ, चंदर राऊत, सखाराम सहारे, वसंत कामडी, योगेश ठाकरे, नरेंद्र दळवी, युवराज लोखंडे, नारायण महाले, कृष्णा भोये, 
काळू बागूल, कृष्णा चौधरी, विजय देशमुख, आत्माराम भोये, पुंडलिक गावित, एकनाथ महाले, नितीन ब्राह्मणे, पंकज पवार, भास्कर बिरारी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

हेही वाचा > समाजकंटकाचेच षड्यंत्र! वाळलेले कांदारोप बघून शेतकऱ्याला धक्काच; अखेर संशय खरा ठरला

 

सभेतील भाषणात कोणत्याही आमदाराचा नामोल्लेख केलेला नाही. केवळ आमदार या पदाचाच उल्लेख केला आहे. त्यामुळे विधानसभा किंवा विधान परिषदेचे कोणतेही आमदार असू शकतात. भाषणाचा विपर्यास करून कोणीही गैरसमज करू नये. 
- इंद्रजित गावित, उपसभापती 

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कोविड प्रतिबंधक नियमाचे उल्लंघन केल्यामुळे राष्ट्रीय आपती व्यवस्थापनांतर्गत त्याच सभेच्या दिवशी तत्काळ गुन्हा दाखल झाला आहे. बदनामी केल्याच्या आरोपावरून अदखलपात्राची नोंद झाली आहे. 
- दिवानसिंग वसावे, पोलिस निरीक्षक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP demands action against former MLAs son nashik marathi news