अंगाचा थरकाप उडविणारी घटना! सॅनिटायझरने पेटली कार; राष्ट्रवादीच्या नेत्याचा होरपळून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 13 October 2020

कारने पेट घेतल्यावर नागरिकांना ही घटना समजली. त्यांनी आग विझवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर पिंपळगाव बसवंत ग्रामपालिकेचा अग्नीशामक दलाचा बंब देखील घटनास्थळी दाखल झाला. नागरिकांनी काच फोडुन शिंदे यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यांना बाहेर काढले तेव्हा त्यांचा मृत्यू झाला होता​

नाशिक/पिंपळगांव बसवंत : मुंबई आग्रा महामार्गावरील पिंपळगाव बसवंत टोल प्लाझा येथे कारमधील वायरींगचे शॉर्टसर्किटमुळे आग लागली. त्यात सॅनीटायझर पेट घेतला. या आगीने कार लॅाक झाली. त्यामुळे पेटलेल्या कारमध्ये अडकलेले राष्ट्रवादी कॅांग्रेसचे नेते संजय चंद्रभान शिंदे यांचा होरपळून मृत्यू झाला. जगभर द्राक्ष निर्यातीसाठी प्रसिद्ध असलेल्या साकोरे मीग (निफाड) जवळ ही घटना घडली.

शिंदे साकोरे मीग येथील द्राक्ष निर्यातदार होते. साकोरे मीगच्या उपसरपंच निर्मला शिंदे यांचे ते पती होते. दुपारी बाराला हा बर्निंग कारचा थरकाप उडविणारा थरार घडला. कारने पेट घेतल्यावर नागरिकांना ही घटना समजली. त्यांनी आग विझवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर पिंपळगाव बसवंत ग्रामपालिकेचा अग्नीशामक दलाचा बंब देखील घटनास्थळी दाखल झाला. नागरिकांनी काच फोडुन शिंदे यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यांना बाहेर काढले तेव्हा त्यांचा मृत्यू झाला होता.

सॅनिटाझरची बाटलीने पेट घेतला

अग्नीशामक दलाने आग विझविली. शॉर्टसर्किटने उडालेली ठिणगी उडाली. त्यात कारमधील सॅनिटाझरने पेट घेतला. त्यातून कारला आग लागली. त्यात  शिंदे यांचा दुर्दवी मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. द्रक्षांच्या छाटणीनंतर बागेच्या फवारणीसाठी लागणारी किटकनाशके घेण्यासाठी शिंदे साकोरे येथील निवासस्थानातून पिंपळगांवकडे निघाले होते. त्यांची मारूती सियाज कार (एम.एच.15 एफ.एन.4177) साकोरा फाट्यावर महामार्गाला लागताच कादवा नदीच्या पुलाजवळ कारने पेट घेतला. आगीमुळे कारचे दरवाजे बंद झाले. कारमध्ये सॅनिटाझरची बाटली सह डिझेल टाकी व लेदरसिट कव्हर असे ज्वलनशील पदार्थ असल्याने आगीची तीव्रता वाढली. धुराचे लोट बाहेर पडु लागले. दरवाजे उघडण्याचा व काच फोडण्याचा शिंदे यांनी प्रयत्न केला, मात्र त्याचे प्रयत्न तोकडे ठरले.

हेही वाचा > ह्रदयद्रावक! सुनेच्या विरहाने सासूला तीव्र धक्का; एकाच दिवशी निघाल्या दोघींच्या अंत्ययात्रा

पत्नीची दोन महिन्यापुर्वी उपसरपंचपदी निवड

कारमध्ये धुर व आगीच्या ज्वालांनी  शिंदे होरपळले. त्यात त्यांचा गुदमुरून मुत्यु झाला.अजातशत्रु दुर्घटनेत शिंदे यांच्या मुत्युने साकोरे गावावर शोककळा पसरली. समाजकारण, राजकारणात सक्रिय असलेले शिंदे हे अजातशुत्रु होते. राष्ट्रवादीच्या तालुका उपाध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे होती. साकोरे गावच्या उपसरपंचपदी त्यांच्या पत्नी निर्मला शिंदे यांची दोन महिन्यापुर्वी निवड झाली होती. साकोरे गावात विकासकामाचा संकल्प त्यांनी बोलुन दाखविला होता. प्रत्येकाच्या सुखदुखात धावणारे व्यक्तीमत्तव हरपल्याची हळहळ नागरिकांनी व्यक्त केली. त्यांच्या कुटुंबात आई, पत्नी, दोन मुले, सुना असा परिवार आहे.

हेही वाचा > हाऊज द जोश! जीव धोक्यात घालून तरुणांचा चक्क महामार्गावर सराव; युवा वर्गासाठी ठरताएत प्रेरणादायी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader killed in car fire caused by short circuit nashik marathi news