समाजातील गरजू घटकांना अल्पदरात वैद्यकीय सुविधा मिळणार - रामदास आठवले

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 18 October 2020

कोरोनासारख्या कठीण काळात अनेक सामाजिक संस्थांनी फार मोठा हातभार लावला आहे. याच धर्तीवर सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून  सेवा प्राय: बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने धर्मार्थ दवाखाना गरजू लोकांसाठी सुरु केला आहे.

नाशिक : कोरोनासारख्या कठीण काळात अनेक सामाजिक संस्थांनी फार मोठा हातभार लावला आहे. याच धर्तीवर सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून  सेवा प्राय: बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने धर्मार्थ दवाखाना गरजू लोकांसाठी सुरु केला आहे. या दवाखान्याच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांना अल्पदरात वैद्यकिय सुविधा मिळणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय व सबलीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. 

नाशिक रोड येथील इंदिरा गांधी चौक, नारायण बापू नगरात सेवा प्राय: बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या धर्मार्थ दवाखान्याचे उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय व सबलीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास ब्रह्मकुमारी शक्तीदेवी, नगरसेवक प्रशांत दिवे, नगरसेवक दिनकर आढाव, नगरसेविका मंगला आढाव, सेवा प्राय: संस्थेचे अध्यक्ष पंकज कुलकर्णी, प्रकाश लोंढे आदी उपस्थित होते.

हेही वाचा > दारूची नशा भोवली : अगोदरच मद्यधुंद असूनही आणखी दारूची हौस; नशेत केले कांड, चौघे थेट तुरुंगात!

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री आठवले म्हणाले, सेवा प्राय: दवाखाना सेवा भावनेतून लोकांसाठी सुरु करण्यात आलेला असून या दवाखान्याच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला होमिओपॅथीक, आयुर्वेदीक, रक्ताच्या तपासण्या आणि इतर वैद्यकिय सुविधांचा लाभ मिळणार आहे. तसेच कोरोनासारख्या काळात सर्वात महत्वाची भुमिका आरोग्य विभागाने पार पाडली आहे. या काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून अनेकांना जीवनदान देणाऱ्या सर्व डॉक्टरांचे यावेळी आठवले यांनी कौतुक करुन आभार मानले. समाजातील वंचित घटकातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपल्या आयुष्यातील काही भाग खर्च करणे आवश्यक असून जनसामान्याच्या कल्याणासाठी काम करण्याचा विचार समाजातील प्रत्येक घटकाने करणे आवश्यक असल्याचेही यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

हेही वाचा > दुर्देवी! मुसळधार पावसात घेतला झाडाचा आसरा; मात्र नियतीने केला घात

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दवाखान्याचे उद्घाटन करुन संपुर्ण दवाखान्याची पाहणी केली व त्यातील सेवा सुविधांची माहिती करुन घेतली. यावेळी प्रकाश लोंढे, नगरसेवक प्रशांत दिवे, नगरसेवक दिनकर आढाव आणि सेवा प्राय: संस्थेचे अध्यक्ष पंकज कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: needy sections of the society will get medical facilities at low cost nashik marathi news