शेतकऱ्यांसाठी स्मार्ट योजना!...काय आहे ही योजना आणि कोण राबविणार? वाचा सविस्तर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जुलै 2020

शेती व्यवसाय बळकट करून शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती साधण्यासाठी केंद्र असो वा राज्य सरकार तसेच विविध सामाजिक संस्था यांच्याकडून वेगवेगळ्या योजना राबविल्या जात आहेत. मात्र त्यांचा फायदा अपेक्षित प्रमाणात शेती आणि शेतकऱ्यांना होताना दिसत नाही. त्यामुळेच शासनाचे कृषी खाते कायम नवनवीन योजना आखते.

नाशिक / सटाणा : शेती व्यवसाय बळकट करून शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती साधण्यासाठी केंद्र असो वा राज्य सरकार तसेच विविध सामाजिक संस्था यांच्याकडून वेगवेगळ्या योजना राबविल्या जात आहेत. मात्र त्यांचा फायदा अपेक्षित प्रमाणात शेती आणि शेतकऱ्यांना होताना दिसत नाही. त्यामुळेच शासनाचे कृषी खाते कायम नवनवीन योजना आखते. आताही शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी एक स्मार्ट योजना येत्या काळात राबविली जाणार आहे. काय आहे ही योजना आणि कोण राबविणार?...वाचा सविस्तर 

पाच वर्षांसाठी योजना 

राज्यात मुबलक प्रमाणात रासायनिक खते उपलब्ध असतानाही खतांबाबत काही साठेबाजांकडून अफवांचे पीक पसरवले जात आहे. शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये म्हणून शासनाने कृषी विभागाकडे बफर स्टॉक केला असून, बागलाण तालुक्‍यासाठी अतिरिक्त 500 टन खते उपलब्ध केली जाणार आहेत. राज्यातील शेतीव्यवसायाला बळकटीसाठी महाविकास आघाडीतर्फे पाच वर्षांसाठी "बाळासाहेब ठाकरे स्मार्ट' योजना राबविणार असल्याची घोषणा राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी रविवारी (ता.12) केली. 

अशी आहेत उद्दिष्ट्ये 

या स्मार्ट योजनेत शेतकऱ्याने पिकवलेला माल साठवण्यासाठी अद्यावत गुदाम, कोल्ड स्टोअरेज, प्रक्रिया उद्योग आणि वाहतूक यंत्रणा उभारण्याचे उद्दिष्ट असून, या योजनेसाठी महिला शेतीगट, फार्मर प्रोड्युसर कंपनी तसेच शेतीगटांना प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच पंतप्रधान सन्मान योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्याला मिळण्यासाठी महसूल यंत्रणेने तत्काळ आढावा घेण्याच्या सूचना श्री. भुसे यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिल्या. 

निर्यात केंद्र उभारा 

पीककर्जाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाधिक शेतकऱ्यांना पीक कर्जाचा लाभ मिळेल, यासाठी लक्षांक वाढविण्याचा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. मेंढ्यांना आपल्या भागात लंगडी नावाच्या आजाराची लागण झाली असून, त्याचा प्रादुर्भाव दूर करण्यासाठी तत्काळ लसीकरण मोहीम सुरू करण्याचे आदेशही त्यांनी पशुधन अधिकाऱ्यांना दिले. तर आमदार दिलीप बोरसे यांनी तालुक्‍यात निर्यात केंद्र उभारण्यासाठी कृषी विभागाने चालना द्यावी, अशी मागणी केली. 

मागेल त्यास शेततळे सुरू करा 

देवळा : येथील कृषीमंत्र्यांच्या बैठकीत आमदार डॉ. राहुल आहेर यांनी "मागेल त्यास शेततळे' ही योजना पुन्हा सुरू करण्याची, तर कांदाचाळीचा लक्ष्यांक वाढवून मिळण्याची मागणी धर्मा देवरे यांनी केली. भुसे यांनी संजीव आहेर व इतर शेतकऱ्यांच्या कांदाचाळींची तसेच कांद्याच्या रोपांची पाहणी करत समस्या जाणून घेतल्या. मटाणे येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला शेतकरी गटाच्या शेतीशाळेस भेट दिली. 

हेही वाचा > भरदुपारी चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला; परिसरात खळबळ

अंबासनला पीकपाहणी 

कृषीमंत्र्यांनी येथे डाळिंबाला पर्याय म्हणून सीताफळाची लागवड केलेल्या जगदीश सावंत यांच्या तसेच शीवबन फाट्यावर 25 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तयार केलेल्या शेतीगटाला भेट दिली. शेतकऱ्यांना तुटवडा निर्माण झालेल्या यूरियाच्या परिस्थितीची विचारणा केली. तसेच मक्‍याच्या शेतात जाऊन पाहणी केली. परिसरात कुठे लष्करी अळीचा प्रादुर्भाव आहे का, अशी विचारणा करतच काकडगाव शिवारातील मक्‍याच्या पिकाची पाहणी केली असता लष्करी अळीने मका पिकावर आक्रमण केल्याचे निदर्शनास आले असता उपस्थित कृषी अधिकाऱ्यांना लष्करी अळीवर तातडीने उपाय योजनांकडे लक्ष देण्याचे आदेश भुसे यांनी दिले.

हेही वाचा > आश्चर्यच! लग्नानंतर दहा वर्षांनी दाम्पत्याला लागली लॉटरी...एक सोडून तिघांची एंन्ट्री!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New Smart Scheme for farmers nashik marathi news