उपशिक्षणाधिकारी लाच प्रकरण : शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे संशयाची सुई 

सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 11 जुलै 2020

शिक्षण उपसंचालक कार्यालयातच हा प्रकार उजेडात आला. त्यामुळे शिक्षण उपसंचालक कार्यालय आणि तेथील सगळा कारभारच पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 

नाशिक : ज्यांच्या नियुक्तीवरून भ्रष्टाचाराचा विषय पुन्हा ऐरणीवर येऊन जिल्ह्यात आंदोलनं सुरू आहेत, अशा उत्तर महाराष्ट्रातील शिक्षण विभागाच्या उपसंचालकांच्या कार्यालयात शुक्रवारी (ता. १०) आणखी एक लाचखोरीचा प्रकार उजेडात आला. जिल्ह्यातील माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी भाऊसाहेब ऊर्फ बी. टी. चव्हाण यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कारवाईबाबत चौकशी सुरू होती. 

सगळा कारभारच पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात
दरम्यान, या घटनेने उत्तर महाराष्ट्रातील शिक्षण विभागाच्या उपसंचालक कार्यालयातील भष्ट्राचाराची लक्तरे पुन्हा चव्हाट्यावर आली आहेत. माध्यमिक शिक्षणाधिकारी चव्हाण यांच्यावर सायंकाळपासून ही कारवाई सुरू होती. रात्री उशिरापर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक तळ ठोकून होते. सध्या शिक्षण उपसंचालकपदाची प्रभारी सूत्रे प्रवीण पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली असून, पाटील यांच्या नियुक्तीवरून जिल्ह्यात असंतोष आहे. पाटील यांच्याविरुद्ध धुळ्यात कारवाई झाली असतानाही आणि त्यांच्याकडे नाशिकधील निरंतर शिक्षणाधिकारीपद असताना त्यांच्याकडेच जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारीपद सोपवण्यात आल्याने जिल्ह्यात आंदोलनाचे रान पेटले आहे. अशा पार्श्‍वभूमीवर पाटील यांच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयातच हा प्रकार उजेडात आला. त्यामुळे शिक्षण उपसंचालक कार्यालय आणि तेथील सगळा कारभारच पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 

हेही वाचा >ह्रदयद्रावक! पुत्रवियोगाचा धक्का..अवघ्या अर्ध्या तासातच मातेचाही जगाचा निरोप.. गावात हळहळ 

कारवाई सुरू असल्याने मौन
दरम्यान, शिक्षण विभागातील आणखी एक बडा मासा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला असून, रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मात्र याबाबत कारवाई सुरू असल्याने मौन पाळण्यात आले होते. 

हेही पाहा > VIDEO : जेव्हा सुनीता ताईंकडून नकळत झाले कोरोनाबाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार...पाहा थरारक आपबिती.. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about Deputy Education Officer Bribery Case nashik marathi news