प्रयोगशील शेतकऱ्याची प्रेरणादायी गाथा! प्रचंड मेहनत अन् सुक्ष्म निरिक्षणातून मिळवलं थक्क करणारं यश

घनश्याम अहिरे 
Tuesday, 12 January 2021

पारंपरिक शेतीत जीव रमेना अन् अपत्यांना स्वयंपूर्ण बनवण्याचे स्वप्न स्वस्थ बसू देईना, अशा मनःस्थितीत हिमतीनं शेतीत नवी वाट शोधण्याचा ध्यास विजय देवरे आणि पत्नी लताबाई देवरे या दांपत्यानं तीस वर्षांपूर्वी घेतला. प्रचंड मेहनत, प्रयोगांचं सूक्ष्म निरीक्षण यातून देवरे दांपत्याला मिळालेलं यश थक्क करून जातं.

मालेगाव (नाशिक) : पारंपरिक शेतीत जीव रमेना अन् अपत्यांना स्वयंपूर्ण बनवण्याचे स्वप्न स्वस्थ बसू देईना, अशा मनःस्थितीत हिमतीनं शेतीत नवी वाट शोधण्याचा ध्यास विजय देवरे आणि पत्नी लताबाई देवरे या दांपत्यानं तीस वर्षांपूर्वी घेतला. प्रचंड मेहनत, प्रयोगांचं सूक्ष्म निरीक्षण यातून देवरे दांपत्याला मिळालेलं यश थक्क करून जातं.

स्वप्नाला सत्यात उतरविण्याची किमया साधलेले दाभाडी येथील प्रयोगशील शेतकरी विजय मोतीराम देवरे यांच्या एकसष्टीनिमित्त कार्यगौरव सोहळा होत आहे. यानिमित्त त्यांच्या फळबाग शेतीच्या प्रयोगाची प्रेरणादायी ‘विजय’गाथा... देवरे यांनी फळबाग शेतीचे आद्य पुरस्कर्ते वसंतराव निकम यांच्या मार्गदर्शनाखाली डाळिंब लागवडीचा निर्णय त्यांनी घेतला. मुलांना शिक्षणासाठी मालेगावी हलविले. दाभाडी सी. सेक्शनजवळील शेतमळ्यात आठ एकरांत सुरू झालेला प्रयोगशील शेतीचा त्यांचा ध्यास आज ३२ एकरांत पसरला आहे.

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

नव्या जातीच्या डाळिंब लागवडीचा बहुमान 

डाळिंबाच्या गणेश जातीच्या रोपांची पहिली लागवड करण्याचा मान त्यांनी मिळवला. भगवा या डाळिंबाच्या लागवडीचे प्रयोगकर्तासुद्धा देवरे परिवारच आहे. पाण्याचे दुर्भिक्ष, बदलते तापमान, बाजारपेठेतील संदिग्धता, कुशल मजुरांचा अभाव व अनुभव या प्रतिकूलतेत फळबाग लागवडीचे प्रयोग करणे  तसे धाडस ठरले असते. मात्र पाणी उपलब्धतेसाठी तब्बल १२ किलोमीटरची पाइपलाइन खोदून आणण्यामागेही प्रयोगांना खंड पडू नये याची काळजी त्यांनी घेतली.  

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा 

प्रयोगशीलता जपली

डाळिंबांना मर रोगाची चाहूल लागताच देवरे परिवाराने आपला मोर्चा पेरूच्या लागवडीकडे वळवला. सतत विविध कृषी प्रदर्शनांसह विद्यापीठ, फळबागांना भेटीच्या छंदातून रायपूर (छत्तीसगड) येथून व्हीएनआर या पेरूची रोपं १९९७ लागवडीसाठी गवसली. या फळबागेला जास्तीचं तापमान मोठा अडथळा असल्यानं संपूर्ण सात एकराला जाळी बसवून बाग लहान मुलागत जपली. आता प्रत्येक फळाला लवचीक पिशव्यांचा पेहराव घालून संगोपणाचा नवा प्रयोग तोही पूर्णतः सेंद्रिय पद्धतीने होत आहे ‘तब्बल दोन किलोचे एक पेरू’, अशा भव्य यशाला गवसणी घातली. दिल्ली, कोलकाता बाजारपेठेत पेरूने दबदबा निर्माण केला. बारा एकरांतील शेवग्याची अडीच फूट लांब शेंग प्रयोगांची साक्ष देते. सध्या सात एकरांत गोल्डन सुपर एनएमके-वन जातीच्या सीताफळाची स्वतंत्र लागवड करून त्यात टरबूज व पपईची अंतरपिके घेण्यात आली. एकाच क्षेत्रात तीन फळबागांचे उत्पादन घेण्याचा अनोखा प्रयोग यशस्वी झाला आहे. राज्यासह परदेशी शेतीप्रेमींच्या भेटी विजय देवरेंच्या प्रयोगांची उंची अधोरेखित करून जातात. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about farmer achieved great success through various experiments in agriculture nashik marathi news