esakal | नाशिकमध्ये संमेलनाध्यक्षपद ज्येष्ठांना की पराभूतांना; मराठी सारस्वतांमध्ये उत्सुकता
sakal

बोलून बातमी शोधा

Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan

मार्चमध्ये नियोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाचा फैसला शनिवारपासून (ता. २३) शहरात होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या दोन दिवसीय बैठकीत होणार आहे. संमेलनाध्यक्षपद ज्येष्ठांना की पराभूतांना दिले जाणार, याबद्दलची उत्सुकता मराठी सारस्वतांमध्ये आहे.

नाशिकमध्ये संमेलनाध्यक्षपद ज्येष्ठांना की पराभूतांना; मराठी सारस्वतांमध्ये उत्सुकता

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : मार्चमध्ये नियोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाचा फैसला शनिवारपासून (ता. २३) शहरात होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या दोन दिवसीय बैठकीत होणार आहे. संमेलनाध्यक्षपद ज्येष्ठांना की पराभूतांना दिले जाणार, याबद्दलची उत्सुकता मराठी सारस्वतांमध्ये आहे. एवढेच नव्हे, तर संमेलनाचे यजमान लोकहितवादी मंडळाला संमेलनाध्यक्षपदासाठी नाव सूचवता येणार असले, तरीही मतदानाची वेळ आल्यावर मंडळाला मतदान मात्र करता येणार नाही. त्यामुळे यजमानांच्या प्रस्तावाबद्दल विचार होण्याची शक्यता मावळली आहे. 

नाशिकच्या साहित्या क्षेत्राला उत्सुकता

महामंडळाच्या नाशिकमधील बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर सोशल मीडियातून संमेलनाध्यक्षपदासाठी चर्चेत आलेल्या आणि यापूर्वीच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या साहित्यिकाच्या पोस्टची सध्या धूम सुरू आहे. या अनुषंगाने, संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ, आजारी असावेत की सर्वत्र फिरणारे, संवाद साधणारे असावेत? असा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे महामंडळाच्या बैठकीत हा मुद्दा कळीचा ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नाशिकमधील ज्येष्ठ साहित्यिक मनोहर शहाणे यांच्या नावाचा प्रस्ताव संमेलनाध्यक्षपदासाठी देण्यात आला आहे. मात्र महामंडळाच्या कामकाज पद्धतीचा विचार करता शहाणे यांचे नाव मागे पडणार काय? याकडे नाशिकच्या साहित्य क्षेत्राच्या नजरा लागल्या आहेत. टाटा मुलभूत संशोधन संस्थेच्या खगोलशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहिलेले डॉ. जयंत नारळीकर यांच्या नावाचा प्रस्ताव संमेलनाध्यक्षपदासाठी दाखल झालेला आहे. ८३ वर्षे वय असलेले डॉ. नारळीकर यांचे विज्ञानकथा आणि विज्ञानविषयक साहित्य लेखनात योगदान आहे. शिवाय माजी कुलगुरु डॉ. जर्नादन वाघमारे यांच्याही नावाचा प्रस्ताव देण्यात आला आहे. मराठी आणि इंग्रजी भाषेतून लेखन केलेले डॉ. वाघमारे यांचे वय ८७ वर्षांपर्यंत पोचले आहे. 

हेही वाचा > ''माझ्या बायकोला आधी वाचवा हो'', रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नवऱ्याचा आक्रोश; दुर्देवी घटना

मतदानाची वेळ येणार काय?

दुसरीकडे संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेत यापूर्वी पराभूत झालेल्या साहित्यिकांची नावे देखील यंदा संमेलनाध्यक्षपदासाठी चर्चेत आली आहेत. त्यात सुरवातीला डॉ. रवींद्र शोभणे यांचा समावेश राहिला. त्यानंतर भारत सासणे यांचे नाव पुढे आले. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशनचे माजी संचालक तथा विज्ञान कथालेखक डॉ. बाळ फोंडके यांच्या नावाचा प्रस्ताव देण्यात आला आहे. संमेलनाध्यक्षपदासाठीच्या चर्चेत आलेल्या साहित्यिकांची भली मोठी यादी तयार झाली आहे. त्यामध्ये डॉ. अनिल अवचट, यशवंत मनोहर, तारा भवाळकर, प्रेमानंद गज्वी, संत लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे आदींचा समावेश असताना डॉ. गणेश देवींच्या नावाचीही चर्चा सुरु झाली होती. त्यामुळे स्वाभाविकच महामंडळाच्या बैठकीत संमेलनाध्यक्षपद निश्‍चित करताना बैठकीत मतदानाची वेळ येणार काय? याविषयीची उत्कंठा साहित्य विश्‍वात आहे. महामंडळाच्या जोडीला घटक आणि संलग्न संस्थांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. 

हेही वाचा > तो शेवटचा विवाहसोहळा! काही समजण्याच्या आतच विवाहितेची जीवनयात्रा संपली; वाडीचौल्हेर गावात शोककळा


डॉ. नारळीकर, डॉ. वाघमारे की सासणे? 

महामंडळाच्या बैठकीत डॉ. जयंत नारळीकर, डॉ. जनार्दन वाघमारे आणि भारत सासणे यांच्या नावावर विशेष खल होण्याचे संकेत मिळताहेत. नाशिकमधून सुद्धा श्री. सासणे यांच्या नावाचा प्रस्ताव देण्यात आला आहे. त्याचवेळी विदर्भ साहित्य संघाने पारड्यात टाकलेले वजन लक्षवेधी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. महामंडळाच्या बैठकीत संमेलनाच्या कार्यक्रम पत्रिकेवर सुरवातीला विचारविनिमय अपेक्षित आहे. त्यानंतर संमेलनाध्यक्ष निवडीचा फैसला होईल. संमेलनाध्यक्ष जाहीर झाल्यावर स्वागताध्यक्षपदाची स्पष्टता येणार आहे.