राज ठाकरेंची नाशिकवरील नाराजी कायम? कारण...

raj thakre.jpg
raj thakre.jpg

नाशिक : राज्याच्या राजकारणात शिवसेनेची पोकळी भरून काढण्यासाठी नव्या दमाने उतरलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनाचे निमित्त साधून सरकारच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी शॅडो कॅबिनेटची घोषणा केली खरी; परंतु यातून नाशिकच्या अनुभवी नेत्यांना डावलण्यात आल्याने ठाकरे यांची नाशिकवरची नाराजी कायम असल्याचा सूर कार्यकर्त्यांमधून उमटला आहे. 


मुंबईचीच छाप असलेल्या "शॅडो कॅबिनेट'मध्ये गौण स्थान 
चौदावा वर्धापन दिन साजरा करताना मनसेने आतापर्यंतच्या सत्तेचा लेखाजोखा मांडला. त्यात नाशिकचा उल्लेख आवर्जून आला. नाशिकने मनसेला 2007 मध्ये महापालिकेत 12 नगरसेवक, 2009 मध्ये तीन आमदार, तर 2012 मध्ये महापालिकेत सत्ता मिळवून दिली. त्या वेळी मनसेच्या विजयाचा वारू ग्रामीण भागातदेखील उधळताना पंचायत समित्या, जिल्हा परिषदेत सदस्य, तर ग्रामपंचायतीमध्ये विजय मिळविला होता. त्यानंतर मनसेला लागलेली घरघर अद्यापही कायम आहे. 2017 च्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी नाशिककरांसमोर विकासाचा मुद्दा मांडला होता. नाही म्हटले तरी सध्याची सत्ताधारी भाजप व त्या वेळच्या मनसेच्या सत्तेचा विचार करता आता नाशिककर मनसेचे कामकाज चांगले असल्याची कबुली देत आहेत. 2017 च्या निवडणुकीत मनसेला विजयाची खात्री होती; परंतु नाशिककर पुन्हा भाजपच्या लाटेवर स्वार होताना मनसेला नाकारले. अवघे पाच सदस्य निवडून आल्याने राज ठाकरे यांनी नाशिकपासून अंतर राखले. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत नाशिकच्या जाहीर सभेतदेखील त्यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली खरी; परंतु झाले ते सोडून द्या, असादेखील विश्‍वास त्यांनी नाशिककरांना दिला होता. मात्र सोमवारी जाहीर केलेल्या शॅडो कॅबिनेटवर मुंबईची छाप अधिक पडल्याचे दिसून आले. वास्तविक प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रदीप पवार, माजी महापौर अशोक मुर्तडक, सलीम शेख, जिल्हाप्रमुख अनंता सूर्यवंशी, नवनियुक्त जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर यांसारखे अनुभवी नेते मनसेकडे असताना त्यांचा शॅडो कॅबिनेटमध्ये समावेश न केल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. 
 

मनसेच्या शॅडो कॅबिनेटमध्ये शिंत्रे, जाचक 
राज्य सरकारच्या कारभारावर नजर ठेवण्यासाठी मनसे पदाधिकाऱ्यांची शॅडो कॅबिनेटची घोषणा केली. शॅडो कॅबिनेटमध्ये नाशिकमधील मनसेचे सचिव पराग शिंत्रे व पक्ष प्रवक्ता किशोर जाचक यांचा समावेश करण्यात आला आहे. शिंत्रे यांच्याकडे मंत्री परिषदेतील वित्त व नियोजन, गृहनिर्माण आणि उद्योग, तर जाचक यांच्याकडे आदिवासी विकास खात्याचे मंत्रिपद देण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com