ही तर क्रूर चेष्टाच! नुकसान 22 लाखांचे, मदत फक्त पाच हजारांची! तुम्हालाच ठेवा...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 14 July 2020

गेल्या 3 जूनला निसर्ग चक्रीवादळाचा असा काही तडाखा बसला, की अंदरसूल येथील एका तरुण शेतकऱ्याने जिद्दीने उभी केलेले पोल्ट्री फार्म पूर्णत: भुईसपाट झाले. या वादळात तब्बल 21 लाख 31 हजारांच्या नुकसानीचा पंचनामाही झाला. त्यामुळे कर्जबाजारी असलेल्या या शेतकऱ्याला शासनाकडून या आपत्तीत मदतीची अपेक्षाही होती. त्यानुसार मदतही आली; पण... 

नाशिक / येवला : गेल्या 3 जूनला निसर्ग चक्रीवादळाचा असा काही तडाखा बसला, की अंदरसूल येथील एका तरुण शेतकऱ्याने जिद्दीने उभी केलेले पोल्ट्री फार्म पूर्णत: भुईसपाट झाले. या वादळात तब्बल 21 लाख 31 हजारांच्या नुकसानीचा पंचनामाही झाला. त्यामुळे कर्जबाजारी असलेल्या या शेतकऱ्याला शासनाकडून या आपत्तीत मदतीची अपेक्षाही होती. त्यानुसार मदतही आली; पण... 

ही तर क्रूर चेष्टाच..मंत्र्यांसमोर हसावे की रडावे शेतकऱ्याची अवस्था  
अंदरसूल येथील गजानन देशमुख यांनी लाखो रुपये गुंतवून अंदरसूल शिवारात पोल्ट्री फार्म उभा केला. मात्र निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार फटका बसल्याने होत्याचे नव्हते झाले. या वादळात पोल्ट्री फार्मची पूर्ण इमारत, सुमारे 180 पत्रे, कामगार निवासाचे घर व त्याचे पत्रे, पाण्याच्या टाक्‍या, पिलांसाठी असलेले अन्नधान्य पूर्णत: मातीमोल झालेच; पण सुमारे दीड हजार कोंबड्यांची पिल्लेही मृत होऊन 30 ते 35 लाखांचे नुकसान झाले. या नुकसानीचा 21 लाख 31 हजारांचा पंचनामा झाला. विशेष म्हणजे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पाहणीही केली. मात्र प्रत्यक्षात मदतीचा धनादेश जेव्हा हातात पडला, तेव्हा ती रक्कम पाहून ही तर आपली क्रूर चेष्टाच असल्याचे म्हणत शेतकऱ्याने सोमवारी (ता.13) मदतीचा धनादेश तहसीलदारांकडे परत केला. 

हेही वाचा > नाशिक दत्तक घेणारे कुठे गेले?...शिवसेनेचा सवाल

धनादेश तहसीलदारांकडे परत 
डोक्‍यावर लाखो रुपयांच्या कर्जाचा बोजा असल्याने किमान अर्धीअधिक तरी मदत शासनाकडून मिळेल, अशी अपेक्षा घेऊन देशमुख मदतीची वाट बघत होते. रविवारी पालकमंत्री भुजबळ दौऱ्यावर आले, तेव्हा त्यांना तहसील कार्यालयातून धनादेश घेण्यासाठी बोलाविण्यात आले. मात्र हातात पडलेला धनादेश बघून देशमुख यांना काय बोलावे हेच सुचेना. लाखो रुपयांच्या कर्जाची चिंता असलेल्या देशमुख यांनी वैतागून सोमवारी हा धनादेश येथील तहसीलदार रोहिदास वारुळे यांच्याकडे परत दिला. 

हेही वाचा > रात्रीची वेळ..भयानक अंधार..शिक्षक चेकपोस्टवर ड्युटीवर असतानाच निघाला ६ फुटी कोब्रा!

संपूर्ण नुकसानभरपाई द्यावी 
कोरोना आल्यापासून पोल्ट्री व्यवसायाचे तीन तेरा वाजले. ती आपत्ती झेलत असतानाच वादळाने माझ्या पोल्ट्रीची वाताहत केली. लाखो रुपयांचे कर्ज असल्याने शासनाकडून मदतीची अपेक्षा असताना पाच हजार रुपये मदत देऊन माझी चेष्टा केल्याने संतापून धनादेश परत केला. माझ्यावर मोठी आपत्ती आल्याने शासनाने कर्ज माफ करावे किंवा संपूर्ण नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीच नुकसानग्रस्त शेतकरी गजानन देशमुख यांनी केली आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news of farmers Loss and help nashik yeola marathi news