नववर्षाचे स्वागत करा पण रात्री अकराच्या आत घरात! पोलिसांचे फर्मान

विनोद बेदरकर
Thursday, 31 December 2020

मावळत्या वर्षाला निरोप देत, नवीन २०२१ वर्षाचे स्वागत करण्यासाठी पार्टीचे नियोजन केले असेल तर घरात करा. रात्री अकरा ते पहाटे सहादरम्यान रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी पार्टी कराल तर नववर्षात स्वागत पोलिस कारवाईने होऊ शकते​

नाशिक : मावळत्या वर्षाला निरोप देत, नवीन २०२१ वर्षाचे स्वागत करण्यासाठी पार्टीचे नियोजन केले असेल तर घरात करा. रात्री अकरा ते पहाटे सहादरम्यान रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी पार्टी कराल तर नववर्षात स्वागत पोलिस कारवाईने होऊ शकते. म्हणून गुरुवारी (ता. ३१) कुटुंबासोबत रात्री अकराच्या आत घरातच बसा. कारण पोलिसांनी रात्री अकराच्या आत 
घरात राहण्याचे फर्मान काढले आहे. 

पोलिसांचे फर्मान, तीन हजार पोलिस उतरणार रस्त्यावर 
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वाढत असून, राज्यात सगळीकडे अकरापर्यंत उत्सवाला परवानगी आहे. पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनीही नाशिक शहरात कडक अंमलबजावणीचा निर्णय घेतला आहे. रात्री अकरानंतर कुणालाही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून पार्ट्या करण्यास, रस्त्यावर गर्दी करून फटाक्यांची आतषबाजी करण्यास किंवा चौकात, उद्यानात किंवा घरांच्या गच्चीवर एकत्रित जमून पार्ट्या- गोंगाट करण्यास प्रतिबंध केला आहे. आज तशा सूचना जारी केल्या. पोलिस उपायुक्त संग्रामसिंग निशाणदार यांनी पोलिसांच्या आदेशाची माहिती दिली. नागरिकांनी रात्री अकरा ते पहाटे सहापर्यंत बाहेर पडू नका. सार्वजनिक ठिकाणी गर्दी कराल, तर कारवाई होईल. त्यामुळे रात्री अकराच्या आत घरात थांबा, असे आवाहन केले आहे. 

हेही वाचा - जेव्हा पोटच्या गोळ्यांसह मातेचे मृतदेह दिसले पाण्यावर तरंगताना; शेतकऱ्यांना भरला थरकाप

पोलिस कारवाईचे स्वागत 
शहरात तीन हजार पोलिस रस्त्यावर उतरणार आहेत. नाशिक शहरातील प्रमुख ३० ठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे. वाहनांची तपासणी होईल. त्यामुळे दारू पिऊन रस्त्यावर फिरू नका, असाही 
पोलिसांचा सल्ला आहे. एकाचवेळी शहरभर सगळीकडे नाकाबंदी होईल. पण शहरातील उद्यान, चौकात पेट्रोलिंग करणार आहे. पोलिस ठाणे, गुन्हे शाखा, विशेष शाखा, महिला पथक असे सगळे 
कर्मचारी एकाचवेळी रस्त्यावर असतील. रात्री अकरा ते पहाटे सहापर्यंत जमावबंदी, तसेच संचारबंदी असणार आहे. त्यामुळे नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कुणी रस्त्यावर गोंगाट करताना 
दिसल्यास नववर्षाचे स्वागत पोलिस कारवाईने होऊ शकते. 

हेही वाचा - सावधान! आतापर्यंत पक्ष्यांच्या जिवावर बेतणारे प्रकार आता माणसांवरही; महिलेचा बळी
 

पोलिसांच्या सूचना 
- तीन हजारांवर पोलिस रस्त्यावर 
- ३० ठिकाणी रस्त्यावर नाकांबदी 
- रस्त्यावर फटाके वाजविण्यास बंदी 
- गच्च्यावरील पार्ट्यांवर असेल लक्ष 

शहराच्या बाहेर जाऊन अनेक जण नववर्ष स्वागताच्या पार्ट्या करतात. जर चुकून शहराबाहेर गेला असाल तर मध्यरात्री अकरानंतर शहरात फिरकूही नका. बाहेर कुठे असाल तर तिकडेच थांबा. कारण शहरात पोलिस नाकाबंदी करणार आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी केल्यास कारवाई अटळ आहे. 
-संग्रामसिंग निशाणदार (पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा) 

 

फोन दुरुस्त होणार 
आसपास कुणी गोंधळ घालत असल्यास नागरिकांना पोलिसांच्या १००, २३०५२३३, ३४ क्रमांकावर दूरध्वनी करून माहिती देता येणार आहे. सध्या बीएसएनएलचे महिला निर्भया कक्षाचा आणि १०० क्रमांकाचा दूरध्वनी बंद आहे. तो त्वरित दुरुस्तीच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: night curfew on new year celebration nashik marathi news