निफाड तालुक्याचं भाग्य उजळलं! दोन्ही सहकारी साखर कारखाने भाडेतत्त्वावर देण्याचा मार्ग मोकळा; आमदार बनकरांच्या प्रयत्नांना यश 

dilip bankar nifad.jpg
dilip bankar nifad.jpg

नाशिक / निफाड : निफाड तालुक्याचे एके काळचे वैभव असलेले निफाड व रानवड हे सहकारी साखर कारखाने सुरू करण्यासंदर्भात शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार बैठक पार पडली. यामध्ये निफाड तालुक्यातील दोन्ही सहकारी साखर कारखाने भाडेतत्त्वावर देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली, जलसंपदामंत्री जयंत पाटील, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम ,आमदार दिलीप बनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली.

मंत्रालयात झालेल्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय 
नाशिक जिल्हा हा कृषिप्रधान जिल्हा असून या जिल्ह्यातील सहकारी तत्त्वावरील एकमेव कादवा सहकारी साखर कारखाना व इतर दोन खाजगी साखर कारखाने सुरू आहेत. नाशिक जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना इतर जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर अवलंबून राहावे लागते. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात आठ हजार हेक्टर क्षेत्रावर १० ते १२ लाख मे.टन उसाचे उत्पादन घेतले जाते. परंतु तालुक्यातील कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना लि., काकासाहेब नगर (रानवड) व निफाड सहकारी साखर कारखाना लि., पिंपळस हे दोन सहकारी साखर कारखाने व केजीएस शुगर इन्फ्रा प्रायव्हेट लि. हा एक खाजगी साखर कारखाना आर्थिक अडचणींमुळे गेल्या काही वर्षापासून बंद अवस्थेत होते. यातील दोन सहकारी साखर कारखाने भाडेतत्त्वावर देण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

आमदार दिलीप बनकर यांच्या प्रयत्नांना  यश 

दोन्ही साखर कारखाने निफाड तालुक्यातील आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती, पिंपळगाव बसवंत व अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था मर्या., पिंपळगाव बसवंत या शेतकरी सभासद असलेल्या संस्था असून ऊस उत्पादक शेतकरी व या संस्थेचे सभासद हे साधारणत: एकच आहेत. या दृष्टिकोनातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी निफाड तालुक्यातील दोन्ही सहकारी साखर कारखाने कुठल्याही मार्गाने चालू करावे याकरिता सदर संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मागणी केली होती. त्या अनुषंगाने या दोन्ही सहकारी संस्थांना कारखाने कसे भाडेतत्वावर चालविण्यास घेता येतील याकरिता प्रयत्न सुरू होते. या संस्था ज्या कायद्याने स्थापन झालेल्या आहेत. त्या कायद्यात दुरुस्ती करून परवानगी घेणे व दुसरा पर्याय संबंधित अधिकारी वर्गाची चर्चा केल्यानंतर समोर आला. तो या संस्थांना शासनस्तरावरून विशेष बाब म्हणून परवानगी देणे. त्या अनुषंगाने या दोन्ही संस्थांनी प्रस्ताव विहित मार्गाने शासनाकडे दाखल केले होते. त्याला आज यश मिळाले आहे.

दोन्ही सहकारी साखर कारखाने भाडेतत्त्वावर देण्याचा मार्ग मोकळा 
ता. (७ व८) सप्टेंबर २०२० रोजी पावसाळी अधिवेशन संपन्न झाले. या अधिवेशनात उपस्थित राहून कारखाने कसे सुरू करता येतील. यासाठी आमदार बनकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व संबंधित विभागाचे मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी या विषयावर चर्चा करून तातडीने बैठक आयोजित करण्याकरिता विनंती वजा मागणी केली होती. आज हे दोन्ही साखर कारखाने सुरू होण्यासाठी बैठक संपन्न झाली. ज्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची होणारी हेळसांड थांबविणे, त्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेल्या शेतीमालास योग्य बाजारभाव मिळावा हा हेतू डोळ्यासमोर ठेवून निफाड तालुक्यातील हे दोन्ही सहकारी साखर कारखाने सुरू करणे अत्यंत गरजेचे होते. निफाड तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या या दोन्ही संस्था पुढे आलेल्या आहेत. कारखाने शेतकऱ्यांचे असून बाजार समिती ही शेतकऱ्यांची आहे. हे जनहित डोळ्यासमोर ठेवून या बाजार समितीने दाखल केलेल्या प्रस्तावास शासन स्तरावरून तातडीने परवानगी देण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या सुचना

यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला बाजार भाव मिळेलच, त्याचबरोबर कामगारांच्या हाताला काम मिळून कारखान्यावर अवलंबून असणाऱ्या इतर व्यावसायिकांचे व्यवसाय सुरळीत चालू होतील व रोजगारही उपलब्ध होईल. हा व्यापक दृष्टिकोन तसेच शेतकरी व कामगार यांचे हित डोळ्यासमोर ठेवून संस्थेने दाखल केलेल्या प्रस्तावास कागदपत्रांची पूर्तता करून विशेष बाब म्हणून परवानगी द्यावी तसेच या दोन्ही संस्थांना कारखाना भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे अशी सूचना अजित पवार यांनी संबंधित अधिकारी वर्गात केली असल्याची माहिती आमदार दिलीप बनकर यांनी दिली.


यावेळी राज्याचे पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव राजकुमार देवरा, पणन संचालक सतीश सोनी, सहकारी संस्थांचे सहकार आयुक्त व निबंधक अनिल कवडे, साखर विभागाचे उपसचिव संतोष घाडगे, पणन विभागाचे उपसचिव वळवी, सहकार विभागाचे उपसचिव रमेश शिंगटे आदी अधिकारी वर्ग उपस्थित होते.

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com