जिल्ह्यात ऊस लागवडीसाठी 'हा' तालुका अव्वल; राज्यासह संपूर्ण देशात होते ऊस निर्यात!

sugarcane
sugarcane

नाशिक : (निफाड) जिल्ह्यातील सर्व महत्त्वाचे साखर कारखाने बंद असले तरी निफाड तालुक्‍यातील उसाचा गोडवा संपूर्ण देशभर पसरल्याने यंदादेखील जिल्ह्यात निफाड तालुका पुन्हा एकदा ऊस लागवडीत अव्वल ठरला आहे. तालुक्‍यात यावर्षी पाच हजार 702 हेक्‍टर क्षेत्रावर शेतकऱ्यांकडून उसाचे पीक घेण्यात आले. त्यामुळे "जरी असली साखर कारखान्यांची बंद धुराडी', ऊस लागवडीत मात्र निफाडची आघाडी' असे म्हटले जात आहे.

जिल्ह्यात पाच हजार 702 हेक्‍टरवर लागवड

नांदूरमध्यमेश्‍वर धरण आणि गोदा, कादवा, बाणगंगा या नद्यांचे सुपीक खोरे यामुळे निफाड तालुक्‍यात उसाचे क्षेत्र मोठे आहे. निफाड सहकारी साखर कारखाना आणि रानवड सहकारी साखर कारखाना ही तालुक्‍याची मानबिंदू असणारी कारखाने बंद पडली आणि तालुक्‍याची अर्थिक घडी विस्कटल्याने पन्नास हजारांवर सभासद, दोन हजारांवर कामगार आणि दीड लाखाहून या कारखान्यांवर अवलंबून असणाऱ्या नागरिकांना मोठा फटका बसला. कारखाने बंद पडल्याने अनेकांनी अन्य पिकांकडे आपला मोर्चा वळविला. त्यामुळे पंधरा लाख टन गाळप असलेले क्षेत्र आता तीन लाख टनांवर आले आहे. अशी परिस्थिती असतानाही आजही ऊस हे शाश्‍वत उत्पन्न देणारे पीक असल्याने अनेक जण उसाचीच शेती करत असल्याने यंदा जिल्ह्यात सर्वाधिक पाच हजार 702 हेक्‍टरवर लागवड झाली आहे.

चाऱ्याला मराठवाड्यातून चांगली मागणी

निफाड येथील कारखाने जरी बंद असले तरी तालुक्‍याच्या उसाला असलेली गोडी संपूर्ण देशभरात गेल्याने हरियाना, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेशासह अन्य राज्यांतूनही मोठ्या प्रमाणात रसवंतीसाठी या उसाला विशेष मागणी असते. याशिवाय चाऱ्याला स्थानिकांसह खानदेश, मराठवाड्यातून चांगली मागणी असते. त्यामुळे जरी कारखाने बंद असले तरी येथील ऊस उत्पादकांना खात्रीशीर अशी बाजारपेठ इतर राज्यांमध्ये उपलब्ध आहे.

यंदा ऊस उत्पादकांना तोटा

चालू वर्षी कोरोनाच्या महामारीने रसवंती बंद राहिल्याने ऊस विक्रीस गेला नाही. जो ऊस तीन- चार हजार रुपये टनाने जायचा, तो ऊस हजार- बाराशेला खरेदी करत नसल्याने या वर्षी ऊस दीड वर्षापासून शेतात तसाच उभा आहे. त्यामुळे तालुक्‍यात अतिरिक्त उसाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील चांगले व्यवस्थापन असणारा कादवा आणि द्वारकाधीश कारखाना वगळता सर्वच कारखाने बंद असल्यामुळे नगर जिल्ह्यातील कारखान्यांवर ऊसतोडीसाठी अवलंबून राहावे लागत आहे.

निसाका, रासाका सुरू व्हायला हवा. कारण तो ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या जीवन- मरणाचा प्रश्‍न आहे. याविषयावर अनेकदा आंदोलन केले आहे. कारखान जो कोणी सुरू करेल, त्याला आम्ही सहकार्यच करणार. - हंसराज वडघुले, शेतकरी संघर्ष संघटना

साखर कारखाना आपले आई- बाप आहे. या आई-बापाचे व तिच्या लेकरांचे हाल पाहावत नाही. आता निफाड तालुक्‍याचे गतवैभव पुन्हा आणायचे असेल, तर सर्वांनी एकत्र येत फक्त "कारखाना एके कारखाना' हेच धोरण स्वीकारायला हवे. - शिवाजी ढेपले, निफाड

गेल्या काही वर्षांपासून ऊस उत्पादकांना आपले कारखाने बंद असल्याने बाहेरच्या कारखान्यांना ऊसतोडीसाठी चपला झिजव्या लागतात. प्रसंगी पैसे देऊन तोड करून घ्यावी लागते. आज उत्पादक तोडीसाठी काहीही करण्यास तयार असल्याने नेत्यांनी आता सहकार्य करावे. - बाबूराव सानप, ऊस उत्पादक शेतकरी

जिल्ह्यातील ऊस लागवड क्षेत्र
तालुका                                 क्षेत्र (हेक्‍टरमध्ये)

मालेगाव                                    355.38
सटाणा                                       2056
नांदगाव                                     1156.87
कळवण                                     1003.35
देवळा                                         96.00
दिंडोरी                                        2391.83
सुरगाणा                                     00
नाशिक                                     1014.38

त्र्यंबकेश्‍वर                                 45.57
पेठ                                           68.50
इगतपुरी                                    263.00
निफाड                                       5702.79
सिन्नर                                      2027
येवला                                       1284.20
चांदवड                                      223.00
एकूण क्षेत्र                                 17688.21

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com