शिवजयंती मिरवणुकीत नवीन मंडळांना ‘नो एन्ट्री’ - छगन भुजबळ

युनूस शेख
Tuesday, 26 January 2021

मिरवणुकीमध्ये नवीन मंडळास सहभागी होता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

नाशिक : जिल्ह्यासह शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला, तरी कोरोना अजून संपलेला नाही. पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढू नये, यासाठी कोरोनासंदर्भात सरकारच्या नियमांचे पालन करत शिवजन्मोत्सव साजरा करावा, अशा सूचना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या. शिवाय मिरवणुकीमध्ये नवीन मंडळास सहभागी होता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

छगन भुजबळ : शिवजन्मोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक 
शिवजयंती १९ फेब्रुवारीस साजरी होणार आहे. कोरोना प्रादुर्भावास सर्व कार्यक्रम आणि उत्सवास बंदी होती. काही दिवसांपासून शहरात प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. शिवजन्मोत्सव साजरा करता यावा, तसेच मिरवणुकीस परवानगी मिळावी, या मागणीचे निवेदन शहरातील मंडळांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांना दिले होते. त्याची दखल घेत श्री. भुजबळ यांनी भुजबळ फार्म येथील कार्यालयात जिल्हाधिकारी सूरज मांढरे आणि पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्या उपस्थितीत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.

हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या

नियमांचे पालन करणे सर्व मंडळांना बंधनकारक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा नवीन मंडळांना परवानगी मिळणार नाही. शासनाने दिलेल्या नियमावलीनुसार शिवजन्मोत्सवास परवानगी देण्यात येईल. त्यानुसार सर्व नियमांचे पालन करणे सर्व मंडळांना बंधनकारक असणार आहे. मिरवणुका काढताना त्या वेळेत काढण्यात याव्यात आणि वेळेत संपविण्यात याव्यात. त्यात जास्त गर्दी होणार नाही, याची काळजी सर्व मंडळांनी घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना करण्यात आले. 

हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच
माजी खासदार समीर भुजबळ, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, छत्रपती सेनेचे चेतन शेलार, नीलेश शेलार, पंचवटी शिवजन्मोत्सव समिती, नवीन नाशिक शिवजन्मोत्सव समिती, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान, भोई समाज मित्रमंडळ, शिवसाई फ्रेंड सर्कल, लष्कर-ए-शिवबा, अशोक स्तंभ साईबाबा मित्रमंडळ, गजानन मित्रमंडळ, जुने नाशिक फ्रेंड सर्कल, शिवसेनाप्रणीत अर्जुन क्रीडा मंडळ, आत्मविश्वास व्यायामशाळा, गर्जना युवा प्रतिष्ठान, हिंदुसम्राट मित्रमंडळ, धर्मवीर ग्रुप, सिडको, मराठा मित्रमंडळ, सातपूर, शिवमुद्रा प्रतिष्ठान, शिवजन्मोत्सव समिती, नाशिक रोड, शिवजन्मोत्सव समिती, सातपूर, अखंड शिवजन्मोत्सव समिती, पाथर्डी गाव शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No entry for new mandal in Shiv Jayanti procession nashik marathi news