अंत्ययात्रेच्या वाटेतही अडथळ्यांची शर्यत; आठ वर्षांपासून एकही अंतिम संस्कार नाही 

विजय पाटील
Saturday, 5 September 2020

आठ वर्षांपासून स्मशानभूमीत एकही अंतिम संस्कार झाला नाही. आठ वर्षांपूर्वी बांधलेल्या स्मशानभूमीची दयनीय अवस्था झाली असून, शासनाचा लाखोंचा निधी व्यर्थ गेला आहे.

नाशिक / गिलाणे : मालेगाव तालुक्यातील गिलाणे येथील स्मशानभूमी समस्यांच्या विळख्यात असून, आठ वर्षांपासून स्मशानभूमीत एकही अंतिम संस्कार झाला नाही. आठ वर्षांपूर्वी बांधलेल्या स्मशानभूमीची दयनीय अवस्था झाली असून, शासनाचा लाखोंचा निधी व्यर्थ गेला आहे. स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने नागरिकांना रस्त्याच्या कडेलाच अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. माणुसकी शून्य यंत्रणेची डोळेझाक झाल्याने अंत्ययात्रेच्या वाटेतही अडथळ्यांशी शर्यत करण्याची वेळ गिलाणेकरांवर आली आहे. 

गिलाणेतील स्मशानभूमीला रस्ताच नसल्याने वापराविना 
शासनाने गाव तेथे स्मशानभूमी या उद्देशाने बहुतांश गावांत स्मशानभूमीचे बांधकाम केले; परंतु स्मशानभूमीचे बांधकाम करताना भौगोलिक परिस्थिती किंवा जागेची निवड करताना कोणतेच निकष पाळले गेले नाहीत. मिळालेल्या ठिकाणी स्मशानभूमीचे बांधकाम केल्यामुळे अनेक ठिकाणच्या स्मशानभूमी निरर्थक ठरत असून, त्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी व्यर्थ ठरत आहे. गावात गलाठी नदीच्या काठावर स्मशानभूमीचे बांधकाम केले आहे. यात एक शेड चांगल्या स्थितीत असून, दुसरी शेड मरणासन्न अवस्थेत शेवटची घटका मोजत आहे. या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केलेली नाही. परिसरात पूर्णतः काटेरी झुडपे असून, अंत्यसंस्कारांसाठी रस्ता नसल्याने सध्या पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे कुणीही स्मशानभूमीकडे फिरकत नाही. 

हेही वाचा > समाजमन सुन्न! निष्पाप चिमुकल्यांशी असे कोणते वैर; आत्महत्या की घातपात?

मरणयातना भोगाव्या लागत असल्याने नागरिकांत तीव्र संताप
रस्ता नसल्याने सहसा ग्रामस्थ नदीतच अंतिम संस्कार करतात. उन्हाळ्यात रखरखत्या उन्हात नागरिकांना व मृतांच्या आप्तेष्टांनाही त्रास सहन करावा लागतो. सध्या गलाठी नदीला पाणी असल्याने व स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ताच नसल्याने नांदगाव-मळगाव रस्त्याच्या किनाऱ्यालाच अंत्यसंस्कार करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. अंत्यसंस्कारासाठी नागरिकांना मरणयातना भोगाव्या लागत असल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

हेही वाचा >VIDEO : विचित्रच! मुंडकं नसलेला व्यक्ती दिसताच नाशिककरांची भंबेरी उडते तेव्हा;नेमका प्रकार काय?​

अनेक गावांच्या स्मशाभूमीच्या दुरवस्था असून, निवारा शेड व रस्त्याअभावी नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. रस्त्याची अनेक वर्षांची मागणी असून, त्वरित रस्ता झाला पाहिजे. 
-सचिन आहिरे, उपसरपंच, गिलाणे 

नागरिकांची मागणी रास्त असून, होणारी गैरसोय लक्षात घेता ग्रामनिधितून या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात येईल. 
-वैशाली खैरनार, ग्रामसेविका, गिलाणे  

 

संपादन -ृ ज्योती देवरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no use the cemetery in Gilane nashik marathi news