दोनच कर्मचारी ओढतात ८० गावांच्या कारभाराचा गाडा; ग्राहकांमध्ये प्रचंड असंतोष

किरण सूर्यवंशी
Tuesday, 27 October 2020

सतत तीन-चार दिवस चकरा मारूनही काम होत नसल्याने ग्राहकांची प्रचंड कुचंबणा होत आहे. किमान सहा कर्मचाऱ्यांची गरज असताना केवळ एक शाखा व्यवस्थापक व एक सहाय्यक यांनाच परिसरातील ७० ते ८० गावांच्या कारभाराचा गाडा ओढावा लागत आहे. 

अभोणा (जि.नाशिक) : येथील स्टेट बँक शाखेत पुरेसे कर्मचारी नसल्याने ग्राहकांना त्यांचे कोणतेही व्यवहार वेळेवर करता येत नाहीत. सतत तीन-चार दिवस चकरा मारूनही काम होत नसल्याने ग्राहकांची प्रचंड कुचंबणा होत आहे. किमान सहा कर्मचाऱ्यांची गरज असताना केवळ एक शाखा व्यवस्थापक व एक सहाय्यक यांनाच परिसरातील ७० ते ८० गावांच्या कारभाराचा गाडा ओढावा लागत आहे. 

ग्राहकांमध्ये प्रचंड असंतोष
कळवण तालुका पश्चिम पट्ट्यात गुजरात सीमेपर्यंत अभोणा येथे एकमेव स्टेट बँकेची शाखा, शिवाय सुरगाणा तालुक्यातील काही गावे याच शाखेला जोडल्याने कामाचा अतिरिक्त ताण वाढला आहे. दूर अंतरावरून ग्राहकांना पैसे काढण्यासाठी किंवा बँक व्यवहारासाठी अनेकदा चकरा माराव्या लागतात. त्यामुळे ग्राहकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. तीन वर्षांपासून कृषी विभागासाठी स्वतंत्र अधिकारीच नसल्याने कृषी क्षेत्रासाठी शासनाच्या कोणत्याही योजना राबविल्या जात नाहीत. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांवर सतत अन्याय होत आहे. याबाबत लोकप्रतिनिधी, तहसीलदार यांनी वारंवार सूचना देऊनही विभागीय व्यवस्थापकांकडून नवीन कर्मचाऱ्यांची नेमणूक झालेली नाही. 

कर्मचाऱ्यांची तत्काळ नेमणूक करावी
अभोणा व्यापारी बाजारपेठ असल्याने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी, कांदा उत्पादक शेतकरी, विविध व्यावसायिक यांनाही बँकिंग व्यवहार करताना तिष्ठत रहावे लागते. शाखा व्यवस्थापकांना व्यक्तिगत कर्ज प्रकरण पडताळणीसाठी बाहेर पडता येत नाही. तसेच बँकिंग व्यवहारासंबंधी ग्राहकांच्या समस्या जाणून घेता येत नाहीत. विभागीय व्यवस्थापकांनी विशेष लक्ष घालून, पुरेशा कर्मचाऱ्यांची तत्काळ नेमणूक करावी, अशी मागणी होत आहे. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक; आजोबांना दोन घास दिल्याचे समाधान घेऊनच नात झाली देवाला प्रिय, दसऱ्याच्या दिवशीच हळहळ

संपूर्ण बाजारपेठेवर याचा विपरीत परिणाम
येथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीचे अनेक कांदा व्यापारी व कांदा उत्पादक शेतकरी यांना अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे बँकिंग व्यवहार करताना खूप अडचणी येत आहेत. वेळेवर आर्थिक व्यवहार न झाल्याने संपूर्ण बाजारपेठेवर याचा विपरीत परिणाम होत आहे. -मनोहर पवार, अध्यक्ष, कांदा व्यापारी असोसिएशन, अभोणा 

हेही वाचा > पतीनेच चोरीचा बनाव करत गरोदर पत्नीला संपविले; सासऱ्याची जावयाविरुध्द तक्रार

संपादन - ज्योती देवरे

 
फक्त दोनच कर्मचारी असल्याने, संपूर्ण व्यवहार सांभाळताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. आम्ही चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करतोय; पण कामाचा व्याप जास्त आहे. वरिष्ठ कार्यालयाकडे कर्मचारी संख्या वाढविण्यासाठी विनंती केली आहे. ग्राहकांना तिष्ठत ठेवणे आम्हालाही क्लेशदायक वाटते. -संदीप पाटील, शाखा व्यवस्थापक, स्टेट बँक ऑफ इंडिया, अभोणा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Not enough staff in State Bank branch abhona nashik marathi news