विभागांना उशिरा आली जाग; त्या 'बायोडिझेल पंप' चालकांना बजावल्या नोटीसा

प्रमोद सावंत
Tuesday, 18 August 2020

बायोडिझेलच्या काळा बाजाराचे वृत्त ‘सकाळ’ मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर काळा बाजार करणाऱ्या पंप मालकांपाठोपाठ संबंधित पंपांच्या परवानगी व तत्ससंबंधित विविध शासकीय अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले आहे.

नाशिक/मालेगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ विभागाने धुळे ते गुजरात सिमेपर्यंत असलेल्या महामार्गावरील अनाधिकृत बायोडिझेल पंप चालकांना नोटीस बजावल्याची माहिती धुळे महामार्ग कार्यालयातील सुत्रांनी दिली.

बायोडिझेलच्या काळा बाजाराचे वृत्त ‘सकाळ’ मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर काळा बाजार करणाऱ्या पंप मालकांपाठोपाठ संबंधित पंपांच्या परवानगी व तत्ससंबंधित विविध शासकीय अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले आहे. गेली अनेक महिने या गोरख धंद्याकडे दुर्लक्ष करणारे विविध विभाग उशिरा जागे झाले आहे. रातोरात गाशा गुंडाळलेल्या पंपांचा वजनमापे विभागाने पंचनामा केल्यानंतर धुळे जिल्ह्यात पंप तपासणीचे आदेश यापुर्वीच निघाले. 

पंपांनी रातोरात गाशा गुंडाळला

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर प्रामुख्याने गुजरातला लागून असलेल्या नवापूर, दहिवेल, शहादा, शिरपूर, पिंपळनेर या परिसरात सुमारे १४ पंप होते. यातील काही पंपांनी गाशा गुंडाळला आहे. पंप बेपत्ता झाल्याने बायोडिझेल, फ्युएल व डिझेल आदींचे मिश्रण करुन भेसळयुक्त इंधन विक्री होत असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे. काहींनी विक्री बंद केली तर काही पंप आहे तो साठा विक्री करण्यासाठी धावपळ करीत आहेत. बहुसंख्य पंपांनी रातोरात गाशा गुंडाळल्याने या पंपांनी अवैधरित्या किती भेसळयुक्त इंधनाची विक्री केली याचा शोध घेणे अवघड झाले आहे. विशेष म्हणजे यातील काही पंपांना वजनमापे विभागाने जिल्हाधिकाऱ्यांचे ना हरकत प्रमाणपत्र नसताना तसेच पंपाचीदेखील परवानगी नसताना स्टॅम्पींग करुन दिल्याचे निदर्शनास आले आहे. पंपावरील युनिट नियमानुसार आहेत की नाहीत याची तपासणी वजनमापन विभागाकडून करण्यात येते. 

हेही वाचा > "कृष्णाचा जन्म जेलमध्ये झाला तेव्हा तुला जेलबाहेर पडायचंय?" सरन्यायाधीश बोबडेंचा आरोपीला प्रश्न; कोर्टात मजेशीर वातावरण

निफाड परिसरातही होते पंप

मालेगाव तालुक्यातील दोन्ही पंप यापुर्वीच बंद झाले आहेत. निफाड परिसरात पंप असल्याची चर्चा सुरू झाली आहे. वजनमापे विभागापाठोपाठ जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनीही यात लक्ष केंद्रीत केले आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी लक्ष घातल्यानंतर नागपूर येथे धडक कारवाई झाली. बायोडिझेलच्या गोरख धंद्यामुळे राज्य शासनाचा मोठ्या प्रमाणावर कर बुडला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न काही लोकप्रतिनिधी व फामपेडाचे पदाधिकारी करीत आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील अवैध पंपचालकांना नोटीस दिल्याच्या वृत्तास संबंधित कार्यालयाने दुजोरा दिला असला तरी या मार्गावरील पंपांची संख्या नेमकी किती? याबाबत मात्र कानावर हात ठेवले आहेत. 

हेही वाचा > क्रूर नियती! "बाबा..तुमच्या दशक्रियेला नाही येऊ शकले..म्हणून तुमच्याकडेच आले" वडिलांमागे लेकीचीही अंत्ययात्रा

 
संपादन- रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: notices to illegal biodiesel pump nashik marathi news