नांदूरमध्यमेश्‍वरच्या गाळपेऱ्यामध्ये किलबिलाट! थंडी नसल्याने पाणपक्षी कमी; पक्षीगणनेत माजी आमदारांचाही सहभाग

आनंद बोरा 
Friday, 30 October 2020

नांदूरमध्यमेश्‍वर अभयारण्यात हिवाळ्यामध्ये देशी-विदेशी पाहुण्यांचे आगमन होते. २४० पेक्षा अधिक जातीचे पक्षी इथे पाहायला मिळतात, तसेच २४ जातीचे मासे आणि ४०० पेक्षा अधिक वनस्पती अभयारण्यात आहेत.

नाशिक : थंडी अजूनही म्हणावी तितकी वाढली नसल्याने पक्षीतीर्थ नांदूरमध्यमेश्‍वर पक्षी अभयारण्यात गवतात राहणाऱ्या पक्ष्यांची संख्या वाढली असली, तरीही पाणपक्ष्यांची संख्या कमीच आहे. वन विभागाने शुक्रवारी (ता. ३०) केलेल्या पक्षीगणनेत हे वास्तव आढळून आले. निवडक पक्षीमित्रांसमवेत माजी आमदार अनिल कदम यांनीही यात सहभाग घेतला. 

अभयारण्यात झाली पक्षीगणना

नांदूरमध्यमेश्‍वर अभयारण्यात हिवाळ्यामध्ये देशी-विदेशी पाहुण्यांचे आगमन होते. २४० पेक्षा अधिक जातीचे पक्षी इथे पाहायला मिळतात, तसेच २४ जातीचे मासे आणि ४०० पेक्षा अधिक वनस्पती अभयारण्यात आहेत. शुक्रवारी सकाळी सात ते दहा या वेळेत अभयारण्याच्या अकरा पक्षी निरीक्षण मचाणांवरून पक्षीगणना झाली. त्यात ५६ प्रजातीचे आठ हजार ९६० पक्ष्यांची नोंद करण्यात आली. चमचा, वारकरी, उघड्या चोचीचा करकोचा, राखी बगळा, गडवाल, युरिशियान विजन, कॉमन टील, जांभळी पाणकोंबडी, पोचार्ड, रंगीत करकोचा, सूर्यपक्षी, दयाळ, लार्क, कोतवाल, गप्पीदास, वेडा राघू, मुनिया, डव, हुदहुद, पीपीट, बुलबुल, नीलकंठ, दयाळ, नाचण आदी पक्ष्यांबरोबर मार्श हेरीअर हा शिकारी पक्षी आढळून आला. शिवाय भिंगरी पक्ष्यांची संख्या वाढल्याचे दिसून आले.

हेही वाचा > विवाह समारंभाला आलेल्या कुटुंबियांना बनविला निशाणा! दहा लाखांहून अधिक ऐवज लंपास

पक्षीगणनेच्या सुरवातीला पक्षी अभ्यासक डॉ. विनय ठकार, उल्हास राणे, वनाधिपती विनायकदादा पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रभारी पक्षी वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक काळे, पक्षीमित्र दत्ता उगावकर, अनिल माळी, किरण बेलेकर, राहुल वडघुले, दर्शन घुगे, अनंत सरोदे, चंद्रिका खिरानी, नुरी मर्चंट, डॉ. सीमा पाटील, माजी सरपंच खंडू बोडके, एन. आर. तांबे, श्री. कडाळे, गंगाधर अघाव, डी. डी. फापाळे, सुनील जाधव, प्रमोद मोगल, एकनाथ साळवे, संजीव गायकवाड, गाइड अमोल दराडे, अमोल डोंगरे, शंकर लोखंडे, पंकज चव्हाण, रोशन पोटे, रमेश दराडे, विकास गारे आदी पक्षीगणनेत सहभागी झाले होते. पुढील आठवड्यात पक्षीसंवर्धनासाठी वन, सिंचन आणि महसूल विभागाची एकत्रित बैठक घेतली जाईल आणि त्यातून कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे कदम यांनी सांगितले. 

हेही वाचा > सिनेस्टाईल थरार! पोलिसांची चाहूल लागताच रिक्षाचालकाने ठोकली धूम; अखेर संशय खरा ठरला

थंडी कमी असल्याने पाणपक्ष्यांची संख्या कमी दिसली. वर्षभर पाण्याची पातळी सारखी राहावी यासाठी आम्ही आता प्रयत्न करणार आहोत. - अशोक काळे, प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी, नाशिका 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: number of birds living in the increased at grass Nandurmadhyameshwar bird sanctuary nashik marathi news