दिलासादायक! कोरोनामुक्‍त रुग्‍णांची संख्या प्रथमच दोन हजारांच्या उंबरठ्यावर 

अरुण मलाणी
Monday, 21 September 2020

काही दिवसांपासून नव्‍याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्‍या तुलनेत बऱ्या होणाऱ्या रुग्‍णांचे प्रमाण अधिक राहात असल्‍याने उपचार घेत असलेल्‍या रुग्णांची संख्याही घटली आहे.

नाशिक : काही दिवसांपासून नव्‍याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्‍या तुलनेत बऱ्या होणाऱ्या रुग्‍णांचे प्रमाण अधिक राहात असल्‍याने उपचार घेत असलेल्‍या रुग्णांची संख्याही घटली आहे. रविवारी (ता. २०) दिवसभरात एक हजार ४९५ बाधित आढळून आले असले, तरी पहिल्यांदाच एका दिवसात एक हजार ९४० रुग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, अठरा रुग्‍णांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे. त्यामुळे ॲक्टिव्‍ह रुग्‍णांची संख्या ४६३ ने घटून ती नऊ हजार ६२८वर आली आहे. अनेक दिवसांत प्रथमच हा आकडा दहा हजारांच्‍या आत आला आहे. 

कोरोनामुक्‍त रुग्‍णांची संख्या प्रथमच दोन हजारांच्या उंबरठ्यावर 
रविवारी कोरोनामुक्‍त झालेल्‍यांमध्ये सर्वाधिक एक हजार २८४ रुग्‍ण नाशिक शहरातील, तर नाशिक ग्रामीणचे ६२०, मालेगावचे २२ आणि जिल्‍हाबाह्य चौदा रुग्ण आहेत. नव्‍याने आढळलेल्‍या बाधितांमध्ये नाशिक शहरातील एक हजार ४५, ग्रामीणचे ३९३, मालेगावचे ४०, जिल्‍हाबाह्य १७ रुग्‍णांचा समावेश आहे. अठरा मृत्‍यूंमध्ये नाशिक शहर, नाशिक ग्रामीण आणि मालेगाव महापालिका हद्दीतील प्रत्‍येकी सहा रुग्‍ण आहेत. यातून जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६४ हजार दोन झाली आहे. यापैकी ५३ हजार २०१ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे, तर एक हजार १७३ रुग्‍णांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे. सद्यःस्‍थितीत नऊ हजार ६२८ रुग्‍णांवर उपचार सुरू आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत एक हजार ३८१ अहवाल प्रलंबित होते. यापैकी ८४२ अहवाल नाशिक ग्रामीणचे आहेत. 

जिल्‍हा रुग्‍णालयात सात संशयित
दिवसभरात नाशिक महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात एक हजार ९४३ संशयित, नाशिक ग्रामीण रुग्‍णालये व गृहविलगीकरणात शंभर रुग्‍ण, मालेगाव महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ३५, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात १९, जिल्‍हा रुग्‍णालयात सात संशयित दाखल झाले होते. 

हेही वाचा > मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ

ग्रामीणमधील आणखी एका पोलिसाचा बळी 
आठवडाभरात शहर पोलिस दलात दोन पोलिसांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. त्‍यातच रविवारी आडगाव येथील ग्रामीण पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेले हवालदार बाळू दशरथ शिंदे (वय ५५) यांचा कोरोनामुळे बळी गेला. 

हेही वाचा > थरारक दृश्य! नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO

मालेगावला सात जणांचा मृत्यू 
मालेगाव : शहरात दोन कोरोनाबाधित आणि पाच संशयित अशा एकूण सात जणांचा रविवारी (ता. २०) येथील सहारा कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील कोरोनाबळींची संख्या १४१, तर तालुक्यातील ४४ झाली आहे.  

संपादन -ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Number of corona free patients increased nashik marathi news