esakal | अख्खं आभाळच फाटलं; सांधणार कुठवर! अवकाळीने शिवडीच्या शेतकऱ्याचा हुंदका अनावर, पाहा VIDEO 
sakal

बोलून बातमी शोधा

One and a half acre vineyards were destroyed by the storm Niphad Marathi News

गेल्या वर्षीचा द्राक्षहंगाम कोरोना महामारीने गेला. यंदा निश्‍चित चांगले उत्पादन मिळेल आणि डोक्यावरचे कर्ज फिटेल, चार पैसे दिमतीला येतील, अशी भाबडी आशा असतानाच अख्खं आभाळ फाटलं...

अख्खं आभाळच फाटलं; सांधणार कुठवर! अवकाळीने शिवडीच्या शेतकऱ्याचा हुंदका अनावर, पाहा VIDEO 

sakal_logo
By
माणिक देसाई

निफाड (जि. नाशिक) : गेल्या वर्षीचा द्राक्षहंगाम कोरोना महामारीने गेला. यंदा निश्‍चित चांगले उत्पादन मिळेल आणि डोक्यावरचे कर्ज फिटेल, चार पैसे दिमतीला येतील, अशी भाबडी आशा असतानाच अख्खं आभाळ फाटलं... सोसाट्याचा वारा आणि अवकाळीच्या दणक्याने शिवडीचे शेतकरी भास्कर खापरे यांची दीड एकर द्राक्षबाग डोळ्यादेखत भुईसपाट झाली आणि हिरव्या स्वप्नांचा काही क्षणात चुराडा झाला. 

लगडलेल्या द्राक्षांचा जमीनीवर थर

निफाड शहरापासून दोन-तीन किलोमीटरवर द्राक्षपंढरीतील शिवडी गाव देशभरात निर्यातक्षम द्राक्ष पिकविण्यात अग्रेसर आहे. परंतु, गेल्या काही वर्षांत येथील द्राक्ष शेतीला बदलत्या वातावरणाचा फटका बसला आहे. चार-पाच वर्षांपासून आधी दुष्काळ, नंतर पावसाळा आणि कोरोनाच्या संकटातून सावरत नाही तोच आता अवकाळीचा दणका द्राक्ष उत्पादकांच्या वर्मावर घाव करून गेला. शिवडी येथील भास्कर खापरे हे शेतकरी स्वतः पत्नी, मुलगा आणि सून असा कुटुंबकबिला घेऊन द्राक्ष शेती करतात. चार- पाच वर्षांपासून अस्मानी - सुलतानी संकटात त्यांची शेती सापडली आहे. गेल्या वर्षी कोरोना महामारीने संपूर्ण द्राक्ष हंगाम वाया गेला. तरीही न डगमगता मोठ्या हिमतीने उभे राहत द्राक्षबाग उभी केली. यंदा चांगले उत्पादन हाती येईल, लोकांची देणी देऊन चार पैसे दिमतीला येतील, असे स्वप्न उराशी बाळगत असतानाच गुरुवारी (ता.१८) सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने खापरे यांची दीड एकरची द्राक्षबाग भुईसपाट झाली. बागेवर लगडलेल्या द्राक्षांचा थर अक्षरशः शेतात पडलेला होता. या संकटातून सावरायचे कसे, हा प्रश्‍न खापरे कुटुंबासमोर आहे. 

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ

इतके नुकसान आहे की ते पाहवत नाही. काय करावे सुचत नाही. मागचा हंगाम कोरोनामुळे वाया गेला. तर, यंदा अवकाळीने हंगाम मातीत गेला. बँकांचे कर्ज काढून द्राक्षबाग उभी केली. आता हे कर्ज कसे फेडायचे कसे, सरकारने तातडीने पंचनामे करून मदत करावी. 
- भगीरथ मापारी, नुकसानग्रस्त द्राक्ष उत्पादक 

हेही  वाचा - थरारक! सिटबेल्टमुळे पेटलेल्या गाडीत अडकला चालक; नातेवाईकांना घातपाताचा संशय