एमआयएमच्या आमदारासह १६४ जणांना तीन वर्षे महानगरपालिका निवडणूक लढण्यास बंदी...नाशिक विभागीय आयुक्तांची कारवाई

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

धुळे महानगर पालिकेची डिसेंबर २०१८ मध्ये निवडणूक झाली. यासाठी ३५६ उमेदवार रिंगणात होते. निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल केल्यापासून दैनंदिन खर्चाचा तपशील निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एक महिन्यात सादर करायचा होता. त्यानुसार १६७ उमेदवारांनी खर्चाचा तपशील सादर केला नाही. या उमेदवारांना नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे नोटीस बजावून खुलासा सादर करण्याची मुदत दिली होती. त्यासाठी वेळोवेळी सुनावणी घेण्यात आली.

नाशिक : धुळे महानगरपालिकेच्या २०१८ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत खर्चाचा तपशील वेळेत सादर न केल्यामुळे १६४ उमेदवारांना पुढील तीन वर्षे महानगरपालिकेची निवडणूक लढवण्यास अपात्र अर्थात अनर्हतेची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई नाशिक विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी केली आहे.

सार्वत्रिक निवडणुकीत खर्चाचा तपशील वेळेत सादर न केल्यामुळे..
धुळे महानगर पालिकेची डिसेंबर २०१८ मध्ये निवडणूक झाली. यासाठी ३५६ उमेदवार रिंगणात होते. निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल केल्यापासून दैनंदिन खर्चाचा तपशील निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एक महिन्यात सादर करायचा होता. त्यानुसार १६७ उमेदवारांनी खर्चाचा तपशील सादर केला नाही. या उमेदवारांना नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे नोटीस बजावून खुलासा सादर करण्याची मुदत दिली होती. त्यासाठी वेळोवेळी सुनावणी घेण्यात आली. यात १६४ जणांनी सादर केलेला खुलासा समाधानकारक नसल्याचे आढळून आले. त्यामुळे विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी मनपा कलम 10 (1 ई) अन्वये 164 जणांवर अनर्हतेची (अपात्र ) कारवाई केली आहे. या कारवाईत संबंधितांना सदस्य म्हणून निवडणुकीस उभे राहण्यास तीन वर्षासाठी अनर्ह (अपात्र ) केले आहे.

अध्यादेश जारी

त्यात धुळे शहराचे एमआयएमचे विद्यमान आमदार फारुख शहा व तसेच भाजपाचे स्वीकृत नगरसेवक सोनल शिंदे यांसह काही माजी नगरसेवकांचा देखील समावेश आहे. ही अपात्रता आदेशाच्या दिनांकापासून म्हणजेच ६ फेब्रुवारी २०२० पासून लागू करण्यात आली आहे.  यासाठी अध्यादेश जारी करण्यात आला आहे.

हेही वाचा > PHOTOS : "तूच का पेटवून घेते, मीच पेटवून घेतो' असे म्हणून तिच्या हातातील बाटली ओढली...पण...

धुळ्यात राजकीय गोटात खळबळ
धुळे महानगरपालिका निवडणुकीत विद्यमान आमदार फारुख शहा यांनी प्रभाग क्रमांक 13 अ मधून उमेदवारी केली होती. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तर भाजपाचे सोनल शिंदे हे सध्या स्वीकृत नगरसेवक म्हणून आहे. अनर्हतेची कारवाई झालेल्यांमध्ये तत्कालीन महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती माधुरी अजळकर, माजी सभागृह नेता अरशद शेख, माजी नगरसेवक रमेश बोरसे यांच्यासह इतरांचा यात समावेश आहे. नाशिक विभागीय आयुक्तांनी केलेल्या या कारवाईमुळे धुळ्यात राजकीय गोटात खळबळ माजली आहे. 

हेही वाचा > "माझ्यासोबत गाडीवर चल" असे सांगून तिला घरी घेऊन गेला..अन्..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one sixty four included MIM MLAs, are banned from contesting municipal elections for three years Nashik Marathi News