जिल्ह्यात कांदा लिलावाचा वांधा कायम; कोट्यावधींची उलाढाल थांबल्याने शेतकरी हवालदिल 

अरुण खांगळ
Tuesday, 27 October 2020

कांद्याची बाजारपेठ लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या दोन दिवसांपासून कांद्याचे लिलाव बंद राहिल्याने पाच कोटींहून अधिकची उलाढाल ठप्प झाली आहे.

नाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या कांदा साठवणुकीवर मर्यादा घातल्याने कांदा व्यापाऱ्यांना व्यापार करणे अडचणीचे होऊन कांदा लिलावात सहभागी होण्यासाठी असमर्थता दर्शविल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून कांद्याचे लिलाव नाशिक जिल्ह्यातील सर्वच प्रमुख बाजार समित्यांमध्ये लिलाव ठप्प झाले आहेत. यामुळे जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील कांदा लिलावाद्वारे होणारी ६० ते ७० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. 

लासलगाव येथे लिलाव ठप्पच 

लासलगाव : कांद्याची बाजारपेठ लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या दोन दिवसांपासून कांद्याचे लिलाव बंद राहिल्याने पाच कोटींहून अधिकची उलाढाल ठप्प झाली आहे. ही अघोषित कांदा लिलावबंदी जास्त दिवस राहिल्यास कांदा उत्पादकांना फटका बसेल आणि देशांतर्गत पुन्हा कांद्याच्या बाजारभावात भडका होण्याची शक्यता आहे. यामुळे कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू होणे गरजेचे असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञ मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी व्यक्त केली, तर गजबजलेल्या बाजार समिती आवारात कांद्याचे लिलाव बंद असल्यामुळे शुकशुकाट आहे. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक; आजोबांना दोन घास दिल्याचे समाधान घेऊनच नात झाली देवाला प्रिय, दसऱ्याच्या दिवशीच हळहळ

बाजारभावात घसरणीची भीती 

यंदाच्या पावसाळी हंगामात जास्त दिवस पाऊस मुक्काम राहिल्याने दमट वातावरणामुळे चाळीत साठविलेला कांदा मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे, तर नवीन लाल कांद्याचे पीक पावसामुळे वाया गेले आहे. केंद्र सरकारच्या विविध निर्बंधांमुळे कांद्याच्या बाजारभावात घसरण होत असताना कांदा उत्पादकांना दिलासा मिळणे अपेक्षित होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून सणासुदीच्या काळात कांद्याचे लिलाव बंद असल्यामुळे कांद्याची प्रतवारी खराब होत आहे. यामुळे बाजारभावात आणखी घसरण होत कांदा उत्पादकांना मिळणाऱ्या बाजारभावानुसार कोट्यवधींचा फटका बसेल. 

हेही वाचा >  पिंपळगावच्या टोमॅटोचा देशभरात डंका! सव्वाचारशे कोटी शेतकऱ्यांच्या पदरात 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion auction closed in the district nashik marathi news