शेतकरी राजाच्या व्यथा पोहचणार थेट मोदींच्या हाती! 'ते' एक लाख पत्र मांडणार दु:ख..

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक लाख पोस्ट कार्डे पाठवून आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली. 

नाशिक : (देवगाव) कांदा बाजारभावाची घसरण झाल्यामुळे कांदा उत्पादकांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत असताना सरकार मात्र काहीच हालचाल करताना दिसत नाही. त्यामुळे बाजारभावाची घसरण थांबविण्यासाठी महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक लाख पोस्ट कार्डे पाठवून आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली. 

कांदा घसरण काही थांबेना

राज्यात कधी नव्हे इतका कांद्याच्या बाजारभावाचा पेच निर्माण झाला असून, आज कांद्याचे सरासरी दर अगदी चार रुपये किलो इतक्‍या खाली आल्याने कांदा उत्पादकांना नफा तर दूरच उत्पादन खर्चही भरून निघणे मुश्‍कील झाले आहे. केंद्र सरकारने कांद्याला नुकतेच जीवनावश्‍यक वस्तूंच्या सूचीतून बाहेर काढले आहे; परंतु कांद्याच्या दरातील घसरण थांबण्यास तयार नाही. आधी अतिवृष्टी, नंतर निर्यातबंदी व आता कोरोना महामारीमुळे एकामागून एक लॉकडाउनमुळे कांद्याचे भाव सतत घसरत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. 

हेही वाचा > रात्री ड्युटीवरून महिला घरी जाताना..वाटेत तिघांनी अडविले..अन् मग....

राज्यभरातून लेखी पत्रे पाठविणार

पावसाळा सुरू होण्याच्या उंबरठ्यावर असतानाही विक्रीअभावी शेतात लाखो टन कांदा काढून पडलेला आहे. सरकार मात्र कांदा प्रश्‍नावर काहीही उपाययोजना करताना दिसत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने 20 रुपये प्रतिकिलो या भावाने थेट शेतकऱ्यांच्या कांद्याची खरेदी करावी व कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा या मागणीसाठी राज्यभरातून सुमारे एक लाख लेखी पत्रे पाठविणार आहेत. 22 ते 28 मे या आठ दिवसांत ही एक लाख पत्रे पाठवून आंदोलन केले जाणार आहे. या पत्रात लिहिला जाणारा मजकूर गुरुवारी राज्यभरातील शेतकऱ्यांना व्हॉट्‌सऍप व फेसबुक मेसेजच्या माध्यमातून दिला जाणार आहे.  

हेही वाचा > लॉकडाउनचा येवला बस आगाराला फटका; तब्बल 'इतक्या' कोटींचा तोटा!

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion Growers Association One lakh letters will be written to the Prime Minister nashik marathi news