प्रभाग समित्यांवर वर्चस्वासाठी महाविकास आघाडी सरसावली! १५ ऑक्टोबरला प्रथमच ऑनलाइन निवडणुका 

विक्रांत मते
Thursday, 8 October 2020

लॉकडाउनमुळे सहा महिन्यांपासून रखडलेल्या सहा प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीला मुहूर्त सापडला असून, १५ ऑक्टोबरला व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सभापतिपदाची निवड होणार आहे. या निमित्ताने भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी महाविकास आघाडी सरसावली असून, शहरातील राजकारण पुन्हा ढवळून निघणार आहे. 

नाशिक : लॉकडाउनमुळे सहा महिन्यांपासून रखडलेल्या सहा प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीला मुहूर्त सापडला असून, १५ ऑक्टोबरला व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सभापतिपदाची निवड होणार आहे. या निमित्ताने भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी महाविकास आघाडी सरसावली असून, शहरातील राजकारण पुन्हा ढवळून निघणार आहे. 

१५ ऑक्टोबरला प्रथमच ऑनलाइन निवडणुका 
पंचवटी, सातपूर, सिडको, पूर्व, पश्चिम व नाशिक रोड या सहा प्रभागांमधील सभापतिपदाची मुदत मार्चमध्ये संपुष्टात आली होती. परंतु कोरोनामुळे सर्व निवडणुका राज्य शासनाने पुढे ढकलल्या होत्या. ऑगस्टमध्ये शासनाने निवडणुकांवरील बंदी हटविल्यानंतर नगरविकास विभागाचे सचिव राजू कुटे यांनी निवडणुकांचा प्रस्ताव विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे पाठविला. आयुक्त गमे यांनी निवडणुकांचा कार्यक्रम घोषित करताना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रभाग सभापतिपदांसाठी निवडणुका घेण्याच्या सूचना केल्या. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच व्हीसीद्वारे निवडणुका होतील. निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. १३) सकाळी ११ ते दुपारी दोन, या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. उमेदवारी अर्ज दाखल करताना गर्दी न करता उमेदवाराने नामनिर्देशनपत्रावर सूचक व अनुमोदकांची स्वाक्षरी घेऊन प्रत्यक्ष अर्ज दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

प्रभागनिहाय निवडणूक अशी 
पंचवटी प्रभाग समिती सभापतिपदासाठी सकाळी ११ ते दुपारी १२, पूर्व विभाग दुपारी १२ ते एक, सिडको दुपारी दोन ते तीन, नाशिक रोड विभाग दुपारी तीन ते चार, पश्‍चिम विभाग दुपारी चार ते सायंकाळी पाच व सातपूर विभागात सायंकाळी पाच ते सहा यावेळेत निवडणूक होईल. 

हेही वाचा > चेष्टामस्करीने गेला तरुणाचा जीव! काँप्रेसरने भरली गुदद्वारात हवा; नऊ दिवसांनंतर घटनेचा खुलासा

पंचवटी, पूर्वमध्ये भाजप निर्विवाद 
पंचवटीत भाजपचे २३ पैकी अठरा सदस्य असल्याने येथे भाजपचाच सभापती होईल. पूर्व प्रभाग समितीत २४ पैकी बारा सदस्य भाजपचे असल्याने या समितीवरही भाजपचाच झेंडा फडकेल. सिडकोत २४ पैकी शिवसेनेचे चौदा सदस्य असल्याने येथे शिवसेनेचा भगवा फडकेल. नाशिक रोड प्रभाग समितीत शिवसेनेचे प्रत्येकी अकरा नगरसेवक असल्याने येथे चुरशीची लढत होईल. राष्ट्रवादीने शिवसेनेला साथ दिल्यास शिवसेनेचा सभापती होण्याचा मार्ग मोकळा होईल. 

हेही वाचा >  भावनिक मेसेज वाचून मदत करायला जात असाल तर सावधान! बातमी तुमच्यासाठी

पश्‍चिममध्ये महाविकास आघाडीचा फॉर्म्युला 
पश्‍चिम प्रभाग समितीत काँग्रेसचे सर्वाधिक पाच सदस्य असून, त्याखालोखाल शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेचा प्रत्येकी एक सदस्य आहे. आतापर्यंत आलपटून पालटून महविकास आघाडीची सत्ता येथे राहिली. यंदाही तोच फॉर्म्युला अमलात येणार आहे. सातपूरमध्ये भाजपचे सर्वाधिक नऊ सदस्य आहेत. शिवसेनेला मनसे व रिपाइं आठवले गटाची साथ मिळाल्यास येथेही परिवर्तन दिसण्याची शक्यता आहे.  

संपादन - ज्योती देवरे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online elections for the first time on October 15 nashik marathi news