बाजार समिती बंद राहिल्याचे निमित्त मात्र...अन् परिणाम झाला भयंकर!

fulenagar.jpg
fulenagar.jpg
Updated on

नाशिक : हिरव्याकंच निसर्गराजीमुळं आरोग्यदायी हवामानाचा टेंभा मिरवणाऱ्या कुंभनगरीमधील रहिवाशांचा कोंडमारा आता सुरू झालाय... कोरानारूपी मायावी राक्षस फुलेनगरच्या कुट्यांमध्ये शिरलाय. खुराड्यात जगणाऱ्या फुलेनगरमधील नव्वद टक्के कष्टकरी शेजारील बाजार समितीतील रोजगारावर पोटाची खळगी भरतात. मध्यंतरी बाजार समिती बंद राहिली अन्‌ झोपडपट्टीत कोरोनाने पाय पसरले...यावरून आरोग्याचे प्रश्‍न जटिल होण्यासाठी किती गंभीर परिस्थिती आहे, हे दिसून येते. 

तीन दिवस समितीचे कामकाज बंद

स्वच्छ भारत अभियानांतर्गत घरटी शौचालय हवी असताना इथल्या 40 हजारांच्या वस्तीसाठी तीनशे शौचालये आहेत. वीस सीटची चौदा सार्वजनिक शौचालये पूर्ण प्रभागात आहेत. यावरून आरोग्याचे प्रश्‍न जटिल होण्यासाठी किती गंभीर परिस्थिती आहे, हे दिसून येते. बाजार समितीतील व्यापाऱ्यांसह हॉटेल व्यावसायिकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने समिती तीन दिवस बंद ठेवण्यात आली. याचकाळात या भागात कोरोनाचा मोठा फैलाव झाल्याचे दिसून येते. तीन दिवस समितीचे कामकाज बंद असल्याने कुटुंबातील सर्व सदस्य दाटीवाटीने घरात राहिले. त्यामुळे फैलाव वाढला. विशेष म्हणजे कडक लॉकडाउनमध्येही घरामध्ये पुरेशी जागा नसल्याने परिसरातील रस्त्यांवर मोठी वर्दळ होती. 

शारीरिक अंतराचा वाजला "बॅंड'

झोपडपट्टी असलेल्या भागातील घरे दाटीवाटीने बांधलेली आहेत. विशेष म्हणजे ज्याला जसे शक्‍य आहे, त्याठिकाणी खोल्या बांधण्यात आल्यात. त्यातील बहुसंख्य अल्पशिक्षित व कष्टकरी कोरोनाच्या भयंकर फैलावानंतरही आपल्याला काही होणार नाही, या भावनेने बिनधास्त होते. श्‍वास घ्यायला उसंत नसलेल्या ठिकाणी शारीरिक अंतराबद्दल विचारही न केलेला बरा. स्वच्छ भारत अभियानाला सुरवात झाल्यापासून घरटी स्वच्छतागृह अपेक्षित आहे. पण फुलेनगरपर्यंत हे अभियान प्रत्यक्षात पोचू शकलेले नाही. कोरोना हॉटस्पॉट ठरण्यासाठी स्वच्छतागृहाची गैरसोय एक कारण ठरलंय. फुलेनगर परिसरात वडारवाडी, भराडवाडी, गोंडवाडी, राहुलनगर, वैशालीनगर, सम्राटनगर, अवधूतवाडी, कालिकानगर, लक्ष्मणनगरचा समावेश होतो. हा भाग प्रभाग चारमध्ये येतो. घरात पाच जण असल्यास, त्यातील चौघे बाजार समितीत कष्ट उपसतात. पेठ रोडच्या पूर्वेकडील पाटापासून सुरू होणारा ते थेट दिंडोरी रोडवरील मायको दवाखान्यापर्यंत विस्तारलेल्या या भागात आरोग्याच्या समस्या नेहमीच आ वासून उभ्या असतात. मात्र, महापालिकेच्या मायको रुग्णालयावर इथल्या प्रत्येकाच्या आरोग्याची भिस्त अवलंबून आहे. नाशिकमध्ये कोरोनाच्या हॉटस्पॉटचे ग्राउंड रिपोर्टिंग करत असताना ही सारी दुरवस्था बघावयास मिळाली. 

स्वच्छतेचा अभाव 

गरीब व श्रमजीवींची वसाहत असल्याने या भागात घंटागाड्यांसह साफसफाई करणारे फिरकत नसल्याची तक्रार अनेक महिलांनी केली. नियमित साफसफाई नसल्याने जागोजागी कचऱ्याचे ढीग आहेत. साचलेले गटारींचे पाणी आढळून येते. भराडवाडीतील अनेकांकडे मोठ्या प्रमाणात म्हशी आहेत. त्यामुळे याठिकाणी डासांचा गोंगाट अधिक आहे. महापालिका एकीकडे शहरातील गोठेधारकांना गोठे शहराबाहेर हलविण्याचा आदेश देते; परंतु याठिकाणच्या नागरी वस्तीतही अनेकांकडे गोठ्यांनी प्रश्‍न बिकट बनवला आहे. 

एकाच घरातील नऊ पॉझिटिव्ह 

पेठ रोडच्या दोन्ही बाजूंना कष्टकऱ्यांची मोठी संख्या वास्तव्यास आहे. बाजार समितीतील अनेकजण भाजीपाल्याच्या व्यवसायानिमित्त रोज मुंबई-नाशिक अप-डाउन करतात. याशिवाय मध्यंतरी बाजार समितीतील काही व्यापाऱ्यांसह अनेकांना संसर्ग झाल्याने साहजिकच फुलेनगर परिसर हॉटस्पॉट बनला. या भागातील रामनगरमधील एकाच घरातील तब्बल नऊ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे हा भाग बंदिस्त करण्यात आला होता. महापालिकेच्या यंत्रणेला काळजीचा घोर लागलाय, तो म्हणजे कंटेन्मेंट झोन तयार करण्यासाठी बांबू, पत्रे लावल्यास ते रात्रीतून उचकटले जाताहेत. त्यामुळे आता काय करायचे? या प्रश्‍नाने महापालिकेची यंत्रणा डोक्‍याला हात लावून बसली आहे. या भागातील रुग्णांची संख्या पंधराच्यापुढे पोचली आहे. 

फुलेनगर परिसरातील वडारवाडी, भराडवाडी, राहुलवाडी, लक्ष्मणनगर, गोंडवाडीमध्ये कष्टकरी मोठ्या प्रमाणावर राहतात. हातावरचे पोट असलेल्यांचा एकीकडे रोजगार बुडत आहे आणि दुसरीकडे परवडत नसल्याने उपचार घेणे शक्‍य होत नाही. अशा परिस्थितीत मोफत आरोग्य सुविधा मिळायला हव्यात. - लक्ष्मण धोत्रे, माजी नगरसेवक 

येथे नियमित साफसफाई होत नाही. अधूनमधून घंटागाडी येते. परंतु, ती आली तरी घरापासून दूर मुख्य रस्त्यावर उभी राहते. - सविता निकाळे, गृहिणी, फुलेनगर 

विजेसाठी मागणी करूनही या भागात ती मिळत नाही. त्यामुळे अंधारात जीवन कंठावे लागते. - राजकुमार यादव, रहिवासी, फुलेनगर 

नागरी वस्तीतच म्हशीचे गोठे असल्याने डासांचे मोठे साम्राज्य आहे. अपंग असूनही स्वच्छतागृहासाठी दूर जावे लागते. याशिवाय पाण्याची समस्याही मोठी आहे. - रूपाली चव्हाण, विद्यार्थिनी, फुलेनगर  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com