मुक्‍त विद्यापीठात राज्‍यातील चार लाख २६ प्रवेश; उर्वरित विद्यार्थ्यांना प्रवेश शक्य

अरुण मलाणी
Thursday, 1 October 2020

विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी डिजिटल संदर्भ साहित्‍य उपलब्‍ध करून दिले जात असल्‍याचे विद्यार्थ्यांचा या विद्यापीठात प्रवेशासाठी कल वाढतो आहे. सध्याची परिस्‍थिती लक्षात घेता, विद्यार्थ्यांना ई-कंटेंट उपलब्‍ध करून देण्याबाबतही विद्यापीठाकडून विचार केला जातो आहे. 

नाशिक : यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठांतर्गत उपलब्‍ध विविध अभ्यासक्रमांकरिता शैक्षणिक वर्ष २०२०-२१ प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. नियमित शुल्‍कासह ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची मुदत बुधवारी (ता. ३०) संपली आहे. याअंतर्गत राज्‍यभरातून चार लाख २६ हजार विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्‍चित केले आहेत. येत्‍या १५ ऑक्‍टोबरपर्यंत विलंब शुल्‍कासह प्रवेशनिश्‍चि‍तीची मुदत असेल. 

चार लाख २६ विद्यार्थ्यांचे प्रवेश 

राज्‍यभर विस्‍तार असलेल्‍या यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठांतर्गत विविध विद्याशाखांचे पदवी, पदविका, पदव्‍युत्तर पदवी, प्रमाणपत्र असे शिक्षणक्रम चालविले जातात. विविध विभागीय केंद्रांमार्फत अध्ययन, परीक्षेसह अन्‍य प्रक्रिया पार पाडली जाते. गेल्‍या काही वर्षांमध्ये विद्यापीठातर्फे डिजिटल प्‍लॅटफॉर्मचा वापर केला जातो आहे. यातून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी डिजिटल संदर्भ साहित्‍य उपलब्‍ध करून दिले जात असल्‍याचे विद्यार्थ्यांचा या विद्यापीठात प्रवेशासाठी कल वाढतो आहे. सध्याची परिस्‍थिती लक्षात घेता, विद्यार्थ्यांना ई-कंटेंट उपलब्‍ध करून देण्याबाबतही विद्यापीठाकडून विचार केला जातो आहे. 

विलंब शुल्‍कासह प्रवेशाची १५ पर्यंत संधी उपलब्‍ध 

कृषी व शिक्षणशास्‍त्र शाखा वगळता अन्‍य अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होती. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी मुबलक काळ मिळावा, यासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत वाढविण्यात आली होती. ही मुदत बुधवारी संपलेली आहे. या मुदतीत चार लाख २६ हजार विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्‍चित केले आहेत. यापुढील टप्प्‍यात १५ ऑक्‍टोबरपर्यंत शंभर रुपये विलंब शुल्‍क भरून विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. 

गेल्या वर्षीपेक्षा अधिक प्रवेशांची शक्‍यता
 
शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये विद्यापीठांतर्गत सहा लाख २७ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. विद्यापीठाकडून अल्प शुल्‍कात व विद्यार्थ्यांना सुलभ पद्धतीने शिक्षणक्रम उपलब्‍ध केले असल्‍याने यंदा गेल्या वर्षीपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित होतील, अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली आहे. 

हेही वाचा > ‘ऍनिमल एम्ब्युलन्सच्या नावाखाली भलताच प्लॅन! नागरिकांची सतर्कता आणि धक्कादायक खुलासा

गेल्‍या काही वर्षांपासून विद्यापीठातर्फे डिजिटायझेशनवर भर दिला आहे. अगदी प्रवेशप्रक्रियेपासून तर अध्ययन प्रणालीपर्यंत तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्‍याने विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा कल वाढतो आहे. गेल्या वर्षीच्‍या तुलनेत यंदा प्रवेशाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. किरकोळ विलंब शुल्‍कासह विद्यार्थ्यांना प्रवेशनिश्‍चितीची संधी आहे. - डॉ. दिनेश बोंडे, कुलसचिव, यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठ 

हेही वाचा > विवाह प्रमाणपत्र काढण्यास पतीचा वारंवार नकार; पत्नीला मारहाण, सहा जणांविरुद्ध गुन्हा

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: in Open University the state Admission of four lakh 26 students nashik marathi news