बसस्थानक सुरू झाल्याने सिन्नरला रोजगाराची चाकेही फिरली 

राजेंद्र अंकार
Friday, 20 November 2020

बसस्थानकातून नियमित बस सुरू झाल्याने बसस्थानक परिसरातील रिक्षा, काळीपिवळी जीप, फेरीवाले, किरकोळ दुकाने यांचा कित्येक महिन्यांपासून बंद असलेला व्यवसाय सुरू झाल्याने त्यावर अवलंबून असणाऱ्या अनेक कुटुंबांना आता रोजच्या हक्काची भाकर मिळू लागली आहे

सिन्नर (जि.नाशिक) :कोरोना महामारीत सात महिने एसटीची चाके बंद होती. त्यानंतर शासनाच्या धोरणानुसार ती हळूहळू फिरू लागली आहेत. सिन्नर बसस्थानकातून गेल्या महिन्यातील १७ तारखेपासून नियमित गाड्या सुरू झाल्याने त्यावर अवलंबून असणाऱ्या अनेक व्यवसायांना पुन्हा चालना मिळाली असून, रोजगाराची चाकेही हळूहळू फिरू लागली आहेत. 

रोजगाराची चाकेही हळूहळू फिरू लागली
बसस्थानकातून नियमित बस सुरू झाल्याने बसस्थानक परिसरातील रिक्षा, काळीपिवळी जीप, फेरीवाले, किरकोळ दुकाने यांचा कित्येक महिन्यांपासून बंद असलेला व्यवसाय सुरू झाल्याने त्यावर अवलंबून असणाऱ्या अनेक कुटुंबांना आता रोजच्या हक्काची भाकर मिळू लागली आहे. बससेवा बंद असल्याने अनेक रिक्षाचालकांना प्रपंच कसा चालवायचा याची भ्रांत पडली होती. त्यामुळे औद्योगिक वसाहतीतील मिळेल त्या कंपनीत मिळेल त्या रोजगारात त्यांनी काम स्वीकारले होते. 

हेही वाचा > महाराणीच्या दुर्लक्षित समाधीचा शोध; अंगठीतील हिरा गिळून केला होता देहत्याग

कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त
१७ सप्टेंबरपासून सिन्नर आगाराचा महसूलही वाढला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. येत्या २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू होत असल्याने एसटीच्या उत्पन्नात आणखी जादा भर पडण्याची शक्यता आहे. गेल्या सप्टेंबर २०२० मध्ये सिन्नर आगाराचे उत्पन्न ३७ लाख, तर ऑक्टोबरमध्ये ४२ लाख इतके झाले आहे. सुरू असलेल्या नोव्हेंबरमध्ये ते वाढण्याची शक्यता आहे. 
 

हेही वाचा > संतापजनक! २० वर्षीय दिव्यांग विद्यार्थ्यावर अत्याचार; प्राचार्य विरोधात गुन्हा दाखल

सध्या फक्त लांब पल्ल्याच्या बसच सुरू आहेत. ग्रामीण भागात फारच कमी प्रतिसाद असल्याने सुरवातीला सुरू केलेल्या बस पुन्हा बंद केल्या. शाळा सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागात प्रवासी वाढतील. -भूषण सूर्यवंशी, आगार व्यवस्थापक, सिन्नर 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: opening of the bus stand employment started for Sinnar nashik marathi news