आत्‍मनिर्भर होण्यासाठी उद्योग क्षेत्रातून प्रचंड संधी - संतोष मंडलेचा

अरुण मलाणी
Sunday, 6 September 2020

देशात युवकांचे प्रमाण लक्षणीय असून, या युवाशक्‍तीने आयात होणाऱ्या उत्‍पादनांना पर्याय शोधण्याचा प्रयत्‍न करावा. आत्‍मनिर्भर होण्यासाठी उद्योग क्षेत्रात प्रचंड संधी आहे, असे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी शनिवारी (ता. ५) सांगितले. 

नाशिक : सध्याच्‍या कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत उद्योग क्षेत्र अत्‍यंत प्रभावित झाले आहे. परंतु दुसरीकडे भारतातील प्रत्‍येक नागरिक राष्ट्रप्रेमाने प्रेरित झालेला बघायला मिळत आहे. देशात युवकांचे प्रमाण लक्षणीय असून, या युवाशक्‍तीने आयात होणाऱ्या उत्‍पादनांना पर्याय शोधण्याचा प्रयत्‍न करावा. आत्‍मनिर्भर होण्यासाठी उद्योग क्षेत्रात प्रचंड संधी आहे, असे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी शनिवारी (ता. ५) सांगितले. 

नेस बिझनेस समीटमध्ये तज्‍ज्ञांचे मार्गदर्शन

कॉस्‍मो पीपलतर्फे ऑनलाइन स्‍वरूपात होत असलेल्या 'नेस बिझनेस समीट- २०२०' या पहिल्‍या ऑनलाइन बिझनेस इव्‍हेंटअंतर्गत झालेल्‍या सत्रात ते बोलत होते. दिवसभर झालेल्या सत्रांमध्ये विविध क्षेत्रांतील मान्‍यवरांनी सहभागींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे समन्‍वय रिमय खैरनार यांनी केले. श्री. मंडलेचा म्‍हणाले, की भारत ही मोठी बाजारपेठ असून, विविध उत्‍पादनांसाठी लागणारा कच्चा माल अनेक देशांतून आयात करावा लागत आहे. त्‍यामुळे आयात कमी करून निर्यातीवर जास्‍तीत जास्‍त भर देण्याचे धोरण अवलंबले पाहिजे. या सर्व बाबींमध्ये शासनाची भूमिका महत्त्वाची असल्‍याचेही सांगताना उद्योग क्षेत्र आणि शासन यांच्‍या संयुक्तरीत्या राबविलेल्‍या प्रयत्‍नांतून राष्ट्रीय सकल उत्‍पन्न (जीडीपी) चे ध्येय गाठणे शक्‍य असल्‍याचे त्‍यांनी नमूद केले. 

विविध क्षेत्रातील मान्‍यवरांचे मार्गदर्शन लाभणार 

उद्‌घाटनानंतर झालेल्‍या विविध सत्रांमध्ये डॉ. आवेश पलोड, योगेश खरे, आकाश छाजेड, डॉ. लॅरा शाह, निखिल मुळे, अमित कुलकर्णी, ‘निमा’चे अध्यक्ष शशिकांत जाधव, शिल्‍पी अवस्‍थी, सेलिब्रिटीज्‌मधून श्रीधर लक्ष्मण, वंदना शाह, ट्रॅव्‍हल्‍सविषयी ब्रिजमोहन चौधरी आदींनी मार्गदर्शन केले. रविवारी (ता. ६) समीटच्‍या दुसऱ्या दिवशीही विविध क्षेत्रातील मान्‍यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. 

हेही वाचा > गोणीतून चिमुरड्याचा आवाज येताच ते थबकले...अमानवीय घटनेने नागरिकांत संताप

औषधनिर्माणशास्‍त्र, कृषी क्षेत्रात संधींचा आढावा घ्यावा : माने

कोरोनामुळे उद्योग, व्‍यवसायांचे स्‍वरूप मोठ्या प्रमाणावर बदलणार आहे. त्यामुळे उद्योगांवर होणाऱ्या परिणामांचा अंदाज घ्यायला हवा. विशेषतः कृषी, कृषीप्रक्रिया उद्योग, अन्नप्रक्रिया उद्योग, औषधनिर्माणशास्‍त्र शाखेतील संधी वाढणार असून, या संधींचा आढावा घ्यायला हवा, असे मत ‘सकाळ’च्‍या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने यांनी व्यक्त केले. विशेषतः नाशिकला औषधनिर्मिती कंपन्‍या असल्‍याने या क्षेत्रात विस्‍ताराला वाव असल्‍याचे त्‍यांनी नमूद केले.  

हेही वाचा >  ब्रेकिंग : रस्त्यावर प्रसुती झालेल्या बाळंतीण महिलेवर डॉक्टरचा दबाव; "महिला रुग्ण व डॉक्टर" मधील वादग्रस्त संभाषणाचा VIDEO व्हायरल

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Opportunities from the industry to become self-reliant - Santosh Mandalecha nashik marathi news