शिष्यवृत्तीसह अन्‍य परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर; गुणपडताळणीसाठी २० पर्यंत मुदत

अरुण मलाणी
Saturday, 10 October 2020

हे अर्ज ऑनलाइन व्‍यतिरिक्‍त अन्‍य कोणत्‍याही पद्धतीने पाठविल्‍यास स्‍वीकारले जाणार नाहीत. तसेच मुदतीनंतर प्राप्त झालेल्‍या अर्जांचा विचार केला जाणार नसल्‍याचेही स्‍पष्ट केले आहे.

नाशिक : महाराष्ट्र राज्‍य परीक्षा परीषदेमार्फत १६ फेब्रुवारीला घेण्यात आलेल्‍या शिष्यवृत्तीसह अन्‍य परीक्षांचा अंतरिम निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करून घेण्यासाठी २० ऑक्‍टोबरपर्यंत मुदत असून, ऑनलाइन स्‍वरूपात अर्ज करण्याची संधी उपलब्‍ध असणार आहे. 

गुणपडताळणीसाठी २० पर्यंत मुदत

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्‍त जाती व भटक्‍या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) या परीक्षांचा अंतरिम (तात्‍पुरता) निकाल काल (ता. ९) सायंकाळी सहाला जाहीर केला आहे. शाळांना आपल्‍या विद्यार्थ्यांचा निकाल त्‍यांच्‍या लॉगीनमधून तसेच पालकांना आपल्‍या पाल्‍यांना निकाल संकेतस्‍थळावर पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करून घ्यायची असल्‍यास संबंधित शाळाच्‍या लॉगीनमध्ये २० ऑक्‍टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज उपलब्‍ध करून दिले आहेत. गुणांच्‍या पडताळणीसाठी प्रत्‍येक पेपरकरीता पन्नास रूपये शुल्‍काची रक्‍कम ऑनलाइन पेमेंटद्वारे भरावे लागेल. 

हेही वाचा > पाकिस्तानला खबरी देणाऱ्या दीपक शिरसाठचा उद्योग HAL ला पडणार महागात! सुरक्षेला मोठे आव्हान

ऑनलाइन अर्जाची संधी 

विद्यार्थ्यांचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, शहरी किंवा ग्रामीण, अभ्यासक्रम आदींमध्ये दुरूस्‍तीसाठीदेखील या मुदतीत शाळेच्‍या लॉगीनमध्ये ऑनलाइन अर्जाद्वारे करता येईल. हे अर्ज ऑनलाइन व्‍यतिरिक्‍त अन्‍य कोणत्‍याही पद्धतीने पाठविल्‍यास स्‍वीकारले जाणार नाहीत. तसेच मुदतीनंतर प्राप्त झालेल्‍या अर्जांचा विचार केला जाणार नसल्‍याचेही स्‍पष्ट केले आहे. मुदतीत आवश्‍यक शुल्‍कासह ऑनलाइन प्राप्त झालेल्‍या अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्‍या लॉगीनमध्ये अर्ज प्राप्त झाल्‍याच्‍या तीन दिवसांपर्यंत कळविण्यात येईल. ऑनलाइन आलेले गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्‍यानंतर अंतीम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार असल्‍याचे महाराष्ट्र राज्‍य परीक्षा परिषदेतर्फे स्‍पष्ट केले आहे.  

हेही वाचा > दुर्दैवी : सलग चार वर्षे द्राक्षाचे उत्पन्नच नाही; बेपत्ता शेतकऱ्याच्या आत्महत्येचा खुलासा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Other examinations including scholarships Interim results announced nashik marathi news