शहरात रात्रभर पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन; २० सराईतांकडून कट्ट्यासह ३८ हत्यार जप्त

विनोद बेदरकर
Wednesday, 7 October 2020

पोलिस आयुक्त पांडे यांनी पोलिस कोविड सेंटर सुरू केल्यानंतर आता शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी एकाचवेळी सगळ्या पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. ६) मध्यरात्री बारा ते बुधवारी (ता. ७) पहाटे पाचपर्यंत पोलिसांनी फौजफाटा रस्त्यावर उतरवत कोब्मिंग ऑपरेशन राबविले.

नाशिक : शहर पोलिसांनी मध्यरात्री शहरातील ३५ निरीक्षक, ७५ अधिकारी आणि ५३० पोलिस रस्त्यावर उतरवत कोम्बिंग ऑपरेशन राबविले. पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली एकाचवेळी गुन्हेगारांचा वावर असलेल्या साधारण ३१ ठिकाणी छापे टाकून सराईत, फरारी आणि तडीपारांचा शोध घेताना पोलिसांनी २० संशयितांसह ३८ शस्त्र ताब्यात घेतली. 

पोलिस आयुक्त पांडे यांनी पोलिस कोविड सेंटर सुरू केल्यानंतर आता शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी एकाचवेळी सगळ्या पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. ६) मध्यरात्री बारा ते बुधवारी (ता. ७) पहाटे पाचपर्यंत पोलिसांनी फौजफाटा रस्त्यावर उतरवत कोब्मिंग ऑपरेशन राबविले.

३८ धारदार शस्त्रे जप्त

शहरात रात्रभर राबविलेल्या या मोहिमेत पोलिसांनी २० सराईतांना ताब्यात घेत त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, पाच काडतुसांसह ३८ धारदार शस्त्रे जप्त केले आहेत. रात्रभर सुरू असलेल्या कारवाईत पोलिसांनी सूरज कांतीलाल वर्मा, गणेश बाबूराव धात्रक, सोनल ऊर्फ लाला भडांगे, पप्पू मंगलसिंग भोंड, अविनाश कौलकर, रोहन शिंदे, अजय बिऱ्हाडे, मकरंद देशमुख, सनी ऊर्फ सोन्या पारधी, अनिकेत तिजोरे, कृष्णा वाळके, अक्षय पाटील, नकूल परदेशी, बुरहान पठाण, कुणाल साळवे, यश गरुड, अक्षय ढकोलिया, दीपक डोंगरे, शाहरुख शेख, सोनू अशोक आदी संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाया केल्या. शहरात काही दिवसांत किरकोळ कारणांवरून दोन युवकांचा खून झाला. घरफोडी, जबरी चोरीचे गुन्हे वाढले आहेत. महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या ओरबाडून नेण्याचे प्रकारात लक्षणीय वाढ झाली आहे. 

हेही वाचा > चेष्टामस्करीने गेला तरुणाचा जीव! काँप्रेसरने भरली गुदद्वारात हवा; नऊ दिवसांनंतर घटनेचा खुलासा

कट्ट्यासह ३८ हत्यार जप्त 

मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन राबविले. पोलिस उपायुक्तांसह चार सहाय्यक आयुक्त, १३ पोलिस निरीक्षकांसह इतर अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. शहरातील १३ पोलिस ठाण्यांचे पोलिस रस्त्यावर उतरवत शोधमोहीम राबवली. त्यात परिमंडळ एकमध्ये दहा गुन्हेगारांना पकडून त्यांच्याकडून एक कट्टी, पाच जिवंत काडतुसे, सहा तलवार, १३ कोयते, पाच चॉपर आणि दोन चाकू जप्त केले. तर परिमंडळ दोनमध्ये दहा गुन्हेगारांकडून चार तलवार, सहा कोयते, दोन चॉपर असे शस्त्र जप्त केले आहेत.  

हेही वाचा >  भावनिक मेसेज वाचून मदत करायला जात असाल तर सावधान! बातमी तुमच्यासाठी

 

संपादन - रोहित कणसे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Overnight police combing operation in the city nashik marathi news