तुटवड्याच्या तक्रारींनंतर 'येथे' ऑक्सिजन टाकीचे काम युद्धपातळीवर; रुग्णांची समस्या सुटणार

युनूस शेख
Thursday, 17 September 2020

शहरासह जिल्ह्यातील रुग्णांवर येथे उपचार केले जात आहेत. वाढती संख्या लक्षात घेता रुग्णालयात एकही बेड शिल्लक नाही. बहुतांश रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यानुसार ही पावले उचलण्यात येत आहेत

नाशिक : रुग्णालयात कोरोनाच्या बहुतांश रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्याच्या तक्रारी येत होत्या. कोविड रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्याच्या पार्श्वभूमीवर डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात दहा हजार किलो क्षमतेची आणि बिटको रुग्णालयात २० हजार किलो क्षमतेची अतिरिक्त ऑक्सिजनची टाकी बसविण्यास सुरवात झाली आहे. यामुळे दोन्ही रुग्णालयांतील उपचार घेत असलेल्या रुग्णांची समस्या काही अंशी सुटणार आहे. 

डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय महापालिकेचे मुख्य कोविड सेंटर आहे. शहरासह जिल्ह्यातील रुग्णांवर येथे उपचार केले जात आहेत. वाढती संख्या लक्षात घेता रुग्णालयात एकही बेड शिल्लक नाही. बहुतांश रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यानुसार महापालिकेकडून डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात दहा हजार किलो क्षमतेचे अतिरिक्त टाकी बसविण्याचे काम सुरू केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानास लागून असलेल्या रुग्णालयाच्या जागेत टॅंक बसविण्याची व्यवस्था केली जात आहे. टॅंकसाठी असलेल्या जागेची जेसीबीच्या सहाय्याने स्वच्छता करत सपाटीकरण केले जात आहे. येत्या १० ते १२ दिवसांमध्ये ऑक्सिजन टॅंक बसविण्याचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. ऑक्सिजनची गरज भासणाऱ्या रुग्णांना योग्य प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा करणे शक्य होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 
बिटको रुग्णालयातही कोरोनाबाधितांवर उपचार केले जात आहेत. या ठिकाणी २० हजार किलो क्षमतेचे टॅंक बसविण्यात येत आहे. सध्या बहुतांश रुग्णांना ऑक्सिजनची आवश्‍यकता भासत आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 

बिटकोत व्यवस्था 

बिटकोमध्ये सध्या ४६७ रुग्ण उपचार घेत असून, यातील १३७ रुग्णांना ऑक्सिजन दिला जात आहे. या रुग्णालयाची क्षमता एक हजार करण्यात येत असून, तळघरात ४०० खाटांचे ऑक्सिजन युनिट सुरू करण्यात येणार आहे. लिफ्ट दुरुस्त करण्यात आली असून, वयोवृद्धांना दुसरा-तिसरा मजला चढण्यासाठी पायपीट करावी लागणार नाही. नाशिक रोडच्या विविध भागांत रॅपिड टेस्टची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे मत बिटकोमधील डॉक्टरांनी व्यक्त केले. 
रुग्णांच्या उपचारादरम्यान ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये, यासाठी डॉ. झाकिर हुसेन रुग्‍णालय आणि बिटको रुग्णालयात अतिरिक्त क्षमता असलेले टॅंक बसविण्यात येत आहेत. १० ते १२ दिवसांत काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. 
-डॉ. आवेश पलोड, नोडल अधिकारी 

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

बिटकोची क्षमता वाढविण्यात येत आहे. एक हजार रुग्ण उपचार घेऊ शकतील इतकी क्षमता काही दिवसांत कार्यान्वित होणार असून, ऑक्सिजनचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. 
-डॉ. जितेंद्र धनेश्वर, वैद्यकीय अधिकारी, बिटको हॉस्पिटल  

 

संपादन - रोहित कणसे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: oxygen tank installed in hospital nashik marathi news