पहिली पक्षीगणना! गेल्या वर्षीपेक्षा 'पाहुण्यां'ची संख्या कमी; तर निळ्या शेपटीचा वेडाराघू शेकड्यात

महेंद्र महाजन
Wednesday, 30 September 2020

तर झाडावर आणि गवतात राहणाऱ्या पक्ष्यांची संख्या वाढलेली पाहावयास मिळाली. अभयारण्यात २४० पेक्षा अधिक जातीचे पक्षी, २४ जातींचे मासे आणि ४०० पेक्षा अधिक वनस्पती आढळतात. मंगळवारी सकाळी सात ते दहा या वेळेत अभयारण्याच्या ११ पक्षी निरीक्षण मचाणांवरून पक्ष्यांची नोंद करण्यात आली.

नाशिक : नांदूरमध्यमेश्‍वर पक्षीतीर्थ अभयारण्यात वन विभागातर्फे मंगळवारी (ता. २९) झालेल्या यंदाच्या हंगामातील पहिल्या पक्षीगणनेमध्ये पांढुरका हारीन शिकारी पक्ष्याचे दर्शन घडले. निळ्या शेपटीचा वेडाराघू शेकड्यात आढळला. मात्र गेल्या वर्षीपेक्षा आतापर्यंत ‘पाहुण्यां’ची संख्या कमी आढळली. सततच्या पावसामुळे धरणातील मोठ्या पाणीसाठ्यात खाद्य तयार झाले नसून थंडी पडलेली नाही. ही कारणे पक्ष्यांच्या कमी संख्येमागील असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. 

गेल्या वर्षीपेक्षा 'पाहुण्यां'ची संख्या कमी 

निवडक पक्षीमित्र, गाइड आणि वनकर्मचारी पहिल्या पक्षीगणनेमध्ये शारीरिक अंतर ठेवून सहभागी झाले. चार हजार ६५९ विविध जातींचे पक्षी आढळले. त्यात तीन हजार ३६३ पाण, तर एक हजार २९६ झाडांवरील पक्ष्यांचा समावेश होता. गेल्या वर्षी गणनेत आठ ते दहा हजार पक्षी आढळले होते. अभयारण्यात पाणपक्ष्यांची संख्या कमी दिसून आली, तर झाडावर आणि गवतात राहणाऱ्या पक्ष्यांची संख्या वाढलेली पाहावयास मिळाली. अभयारण्यात २४० पेक्षा अधिक जातीचे पक्षी, २४ जातींचे मासे आणि ४०० पेक्षा अधिक वनस्पती आढळतात. मंगळवारी सकाळी सात ते दहा या वेळेत अभयारण्याच्या ११ पक्षी निरीक्षण मचाणांवरून पक्ष्यांची नोंद करण्यात आली. पाईड मैना, कॉमन क्रेन, रंगीत करकोचा, उघड्या चोचीचा करकोचा, किंगफिशर, मुनिया, सूर्यपक्षी, दयाळ, सुगरण, हुदहुद, कोतवाल, गप्पीदास, वेडाराघू, डव, पीपीट, बुलबुल, नीलकंठ, नाचण आदी पक्ष्यांचा समावेश होता. 

प्रमुख सहभाग

पक्षीगणनेत वन विभागाचे प्रभारी परिक्षेत्र अधिकारी अशोक काळे, उत्तम डेर्ले, किशोर वडनेरे, अनिल माळी, दत्ता उगावकर, डॉ. जयंत फुलकर, नुरी मर्चंट, मेहुल थोरात, अनंत सरोदे, विशाल देसले, अपूर्व नेरकर आदी पक्षीमित्रांसमवेत गाइड अमोल दराडे, अमोल डोंगरे, शंकर लोखंडे, प्रमोद दराडे, पंकज चव्हाण, रोशन पोटे, रमेश दराडे, विकास गारे आदी सहभागी झाले होते. या वेळी वनपरिक्षेत्र अधिकारी भगवान ढाकरे यांची बदली झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. 

पहिल्यांदा हजेरी लावणारे पक्षी 

आशियाई कवडी मैना, पांढुरका हारीन (पलीड हरिअर), निळ्या शेपटीचा वेडाराघू, धनेश, युरेशियन रायन्याक, दलदल ससाणा या पक्ष्यांनी पहिल्यांदा अभयारण्यात हजेरी लावली. पहिल्या गणनेत आढळलेल्या पक्ष्यांची संख्या अशी : उघड्या चोचीचा करकोचा- १४०, गडवाल- ४४५, हळदी-कुंकू- ३३५, गार्गनी- २४०, वारकरी- ७३०, जांभळी पानकोंबडी- १६०, सूरय- २१०, स्पून बिल- ५२, गाय बगळे- ३५४, निळ्या शेपटीचा वेडाराघू- ३५०. 

पक्ष्यांच्या आगमन विलंबाची कारणे 

धरणातील अधिकचा पाणीसाठा 
मुबलक खाद्य तयार उपलब्ध न होणे 
थंडी नसणे आणि रेंगाळलेला पाऊस 

हेही वाचा > विवाहितेच्या मृत्यूनंतर माहेरच्यांकडून जावयाच्या घरासमोरच अंत्यसंस्कार; दिंडोरी तालुक्यातील घटना

निवडक पक्षीमित्रांचा पक्षीगणनेत समावेश करण्यात आला होता. आज गेल्या वर्षीच्या तुलनेत पक्ष्यांची संख्या कमी असल्याचे आढळून आले. - अशोक काळे, वनपाल 

हेही वाचा > मन हेलावणारी घटना! मरणही एकत्रच अनुभवण्याचा मायलेकांचा निर्णय; घटनेने परिसरात खळबळ

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pandhurka Harin bird in Nandurmadhyameshwar nashik marathi news