‘सिडको‘ला जमीन देण्यास पांजरपोळ संस्थेचा विरोध; प्रशासनाला पत्र पाठवून दर्शविला नकार 

प्रमोद दंडगव्हाळ 
Wednesday, 7 October 2020

संस्थेने सिडको प्रशासनाला पाठविलेल्या पत्रानुसार, ही संस्था सुमारे १४२ वर्ष जुनी नोंदणीकृत धर्मदाय संस्था असून येथे गोसंवर्धन, गोरक्षण, पर्यावरण संवर्धन तसेच सामाजोपयोगी कार्ये करते.

नाशिक/सिडको : सिडकोच्या गृहनिर्माण प्रकल्पाला सुमारे बाराशे एकर जागा देण्यास पांजरापोळ संस्थेने स्पष्ट नकार देत विरोध दर्शविला आहे. यासंदर्भाचे खरमरीत पत्र सिडको प्रशासनाला दिले असून, त्यावर सात दिवसाच्या आत उत्तर मागितले आहे. 

संस्थेने सिडको प्रशासनाला पाठविलेल्या पत्रानुसार, ही संस्था सुमारे १४२ वर्ष जुनी नोंदणीकृत धर्मदाय संस्था असून येथे गोसंवर्धन, गोरक्षण, पर्यावरण संवर्धन तसेच सामाजोपयोगी कार्ये करते. संस्थेच्या नाशिकमध्ये ३ गोशाळा असून सुमारे १३०० गायी आहेत. एक हजार गायी वयस्कर व दुध न देणा-या आहेत. संस्था त्यांचा आजीवन स्वखर्चाने सांभाळ करते. ‘सकाळ'मधील बातमीनुसार सदर जागेवर सिडकोच्या गृहनिर्माण प्रकल्पासाठी शासनाला प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे समजले. त्यानुसार संस्थेद्वारे त्यास स्पष्टपणे नकार व तीव्र विरोध करण्यात येत आहे. संस्था कोणालाही कोणत्याही कारणांसाठी संस्थेच्या मालकीची कोणतीही जागा देऊ शकत नाही, असे म्हटले आहे. 

हेही वाचा >  भावनिक मेसेज वाचून मदत करायला जात असाल तर सावधान! बातमी तुमच्यासाठी

संस्थेचा भूसंपादन प्रस्तावास तीव्र विरोध

या सर्व जमिनी संस्थद्वारे खरेदी करण्यात आल्या असून शासनाने किंवा इतर कोणाही दिलेल्या नाहीत. त्या स्वमालकीच्या व कायदेशीर आहेत. या जमिनींवर लाखोंच्या संख्येने विविध प्रजातींचे वृक्ष, रेनवॉटर हार्वेस्टिंग, १४ तळे, अनेक विहिरी, बोअरवेल्स, जैव विविधतेने संपन्न आहे. संस्थेच्या सुमारे तेराशे गायींसाठी प्रमाणित सेंद्रिय पशुधारा याच क्षेत्रात उत्पादन केला जातो. जो बाहेर कोठेही, कोणतीही किंमत देऊन उपलब्ध होत नाही. पाण्याच्या व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचन, रेनगन असून मोठ्या क्षमतेचे गांडूळखत प्रकल्प आहेत. तेथे हायटेन्शन वीजजोडणी असून ट्रान्सफॉर्मर्स आहेत. तसेच ४५० किलोवॉट क्षमतेचा सौर विद्युत निर्मिती प्रकल्प आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन संस्थेची भूसंपादन प्रस्तावास संमती नाही, तर तीव्र विरोध आहे. 

हेही वाचा > चेष्टामस्करीने गेला तरुणाचा जीव! काँप्रेसरने भरली गुदद्वारात हवा; नऊ दिवसांनंतर घटनेचा खुलासा

या जमिनीवर आम्ही नंदनवन फुलविले आहे. लाखो झाडांचे व गायींचे संगोपन होते. नाशिकचे वातावरण शुद्ध ठेवण्यासाठी मदत होते. त्यामुळे येथे एखादा प्रकल्प सुरू करून निसर्गाची हानी होण्यासारखे आहे. यावर विचार होणे जरुरीचे आहे. 
- हितेश जव्हेरी, विश्वस्त, पांजरापोळ संस्था, नाशिक 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Panjarpol Institute Oppose to allotment of land to cidco nashik news