नाशिक रोड रेल्वेस्थानकात हाय अलर्ट! प्रवाशांची २४ तास वैद्यकीय चाचणी 

हर्षवर्धन बोऱ्हाडे
Friday, 27 November 2020

बिटको कोविड सेंटरचे प्रमुख डॉ. जितेंद्र धनेश्‍वर, डॉ. अभय सोनवणे, स्टेशन मास्तर आर. के. कुठार, वरिष्ठ वाणिज्य निरीक्षक कुंदन महापात्रा, आरपीएफचे वरिष्ठ निरीक्षक एन. व्ही. गहिलोत या अधिकाऱ्यांनी रेल्वेस्थानकावर २४ तास पहारा देण्याचे ठरवले असून, विविध पातळ्यांवर जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे.

नाशिक : शहर कोरोनामुक्त ठेवण्यासाठी तसेच, परराज्यातील कोरोनाची संभाव्य लाट रोखण्यासाठी नाशिक रोड रेल्वेस्थानकात २४ तास वैद्यकीय चाचणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. महापालिकेने त्यासाठी तीन पथके नेमली असून, २४ तास हाय अलर्टची घोषणा रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी दिली. कामाशिवाय रेल्वेस्थानकावर येऊ नये व गर्दीही करू नये, असे आवाहन रेल्वे विभागाच्या जनसंपर्क विभागाने केले आहे. 

रेल्वेस्थानकावर २४ तास पहारा

बिटको कोविड सेंटरचे प्रमुख डॉ. जितेंद्र धनेश्‍वर, डॉ. अभय सोनवणे, स्टेशन मास्तर आर. के. कुठार, वरिष्ठ वाणिज्य निरीक्षक कुंदन महापात्रा, आरपीएफचे वरिष्ठ निरीक्षक एन. व्ही. गहिलोत या अधिकाऱ्यांनी रेल्वेस्थानकावर २४ तास पहारा देण्याचे ठरवले असून, विविध पातळ्यांवर जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे. महापालिकेने प्रत्येकी तिघांचा समावेश असलेली तीन वैद्यकीय पथके नेमली आहेत. त्यांना रेल्वे सुरक्षा बल, तिकीट तपासणीस व रेल्वे कर्मचाऱ्यांची मदत मिळत आहे. कोरोनामुळे नेहमीच्या प्रवासी रेल्वे बंद असून, कोविड स्पेशल आणि फेस्टिव्हल स्पेशल गाड्याच सुरु आहेत.

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ

रोज पाच हजार प्रवासी

नाशिक रोड रेल्वे स्थानकातून एरव्ही दिवसाला सरासरी चाळीस हजार प्रवासी प्रवास करतात. मात्र, सध्या रोज पाच हजार प्रवासीच प्रवास करतात. त्यापैकी एक हजार प्रवासी पंचवटी एक्सप्रेसमधून प्रवास करतात. रोज ९० प्रवासी गाड्या धावत असत, सध्या ही संख्या ४५ वर आलेली आहे. रेल्वेस्थानकात गेल्या चार महिन्यांपासून प्रत्येक प्रवाशाची तापमान नोंद ठेवली जात आहे. 

अशी घेतली जाते काळजी 

करोना रुग्ण आढळल्यास त्याला बिटको रूग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. स्थानकात येण्या-जाण्यासाठी एकच प्रवेशद्वार व तेथे स्वतंत्र कक्ष सुरु आहे. स्थानकाची स्वच्छता व निर्जंतुकीकरण केले जात आहे. प्रवाशांचे प्रथम स्क्रिनिंग केले जाते. संशयित आढळला तरच कोरोना टेस्ट घेतली जाते. पहिल्याच दिवशी सायंकाळपर्यंत ६८० प्रवाशांचे स्क्रिनींग करण्यात आले. त्यापैकी २१ संशयित रुग्ण आढळले. रॅपिड अॅन्टिनजेन चाचणीत ते निगेटिव्ह आढळले. दिल्ली, गुजरात, गोवा आणि राजस्थानमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे नाशिक रोडला दिल्लीहून येणारी मंगला आणि हरिद्वार एक्सप्रेस व उत्तर भारतातील गाड्यांमधील प्रवाशांवर प्रशासनाचे लक्ष आहे. प्रवाशांकडे आरटीपीसीआर चाचणी सर्टिफिकेट असेल तर, त्यांना त्वरित जाऊ दिले जाते. नसल्यास स्क्रिनिंग व अन्य चाचण्या घेतल्या जातात. 

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Passengers are being checked at railway station to stop spread of corona nashik marathi news