डायलिसिस सेंटर प्रकरणी लपवाछपवी!...शेकडो रुग्णांच्या भोवती मृत्यूचा फास

संतोष सूर्यवंशी : सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 फेब्रुवारी 2020

उच्च रक्‍तदाब, मधुमेह आदींमुळे मूत्रपिंड विकारांची रुग्णसंख्या वाढली आहे. किडनी निकामी झाल्याने शरीरातील रक्‍त शुद्धीकरण प्रक्रिया बंद होते. त्यामुळे यावर उपचार म्हणून रुग्णांना किडनी बदलने किंवा डायलिसिसद्वारे रक्‍तशुद्धीकरण करणे आवश्‍यक असते. किडनी बदलण्यासाठी एकाच वेळी बराच खर्च लागत असल्याने अनेक रुग्ण डायलिसिसचा पर्याय निवडतात.

नाशिक : राज्यभरातील मूत्रपिंड विकाराचे रुग्ण सध्या डायलिसिस सेंटरअभावी मृत्यू च्या दाढेत ओढले जात आहेत. मागील राज्य सरकारची प्रत्येक जिल्ह्यात डायलिसिस सेंटरची घोषणा हवेतच विरल्याने पुन्हा रुग्णांच्या भोवती मृत्यूचा फास आवळला जात आहे. उत्तर महाराष्ट्राचा विचार करता विभागात केवळ जिल्हा शासकीय रुग्णालयांत डायलिसिस सेंटर असून, त्यातही शेकडोच्या संख्येने डायलिसिससाठी रुग्ण प्रतीक्षा यादीत आहेत. महाराष्ट्रात केवळ 24 जिल्हा रुग्णालयांमध्ये डायलिसिस सेंटर आहेत. उत्तर महाराष्ट्रातील धुळ्यात एकही डायलिसिस सेंटर नसल्याने रुग्णांना इतरत्र जावे लागत आहे. 

डायलिसिसचा खर्च एक हजार 500 ते दोन हजार रुपयांपर्यंत

उच्च रक्‍तदाब, मधुमेह आदींमुळे मूत्रपिंड विकारांची रुग्णसंख्या वाढली आहे. किडनी निकामी झाल्याने शरीरातील रक्‍त शुद्धीकरण प्रक्रिया बंद होते. त्यामुळे यावर उपचार म्हणून रुग्णांना किडनी बदलने किंवा डायलिसिसद्वारे रक्‍त शुद्धीकरण करणे आवश्‍यक असते. किडनी बदलण्यासाठी एकाच वेळी बराच खर्च लागत असल्याने अनेक रुग्ण डायलिसिसचा पर्याय निवडतात. एका रुग्णाला आठवड्याला दोन वेळा डायलिसिस करणे आवश्‍यक असते. खासगी रुग्णालयात एकवेळच्या डायलिसिसचा खर्च एक हजार 500 ते दोन हजार रुपयांपर्यंत असतो. महिन्याला आठ डायलिसिस करायचे म्हटल्यास एका रुग्णासाठी महिन्याला कमीत कमी 12 हजार रुपये खर्च करावे लागत असतात. 

प्रतीक्षायादी मोठी असल्याने नवीन रुग्णांचा नंबर कधी लागणार?

डायलिसिसची प्रक्रिया वर्षानुवर्षे चालत असल्याने साहजिकच हे परवडणारे नसते. हेच डायलिसिस शासकीय रुग्णालयांमध्ये नाममात्र खर्चात होत असते. त्यामुळे मूत्रपिंड विकारांच्या रुग्णांचा सर्वाधिक ओढा हा शासकीय रुग्णालयांकडे असणे साहजिकच असते. अनेक रुग्णालयांमध्ये विविध योजनांखाली लाभार्थी रुग्णांना पैशांमध्ये सूट दिली जाते. बहुतांश रुग्ण कुठल्याच योजनेला पात्र नसतात. शासकीय रुग्णालयात आधीच्याच रुग्णांची प्रतीक्षायादी मोठी असल्याने नवीन रुग्णांचा नंबर कधी लागणार, अशी स्थिती आहे. प्रतीक्षायादीमुळे अनेक नव्या रुग्णांना डायलिसिसचा लाभ घेता येत नसल्याने दिवसेंदिवस याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत असतो. 

हेही वाचा > अटल आरोग्य वाहिनी योजनेमुळे कळवणमधील 'या' विद्यार्थिनीचा पुनर्जन्म!

रुग्णालयांची नावे उपचारार्थ रुग्णांची संख्या डायलिसिस यंत्रांची संख्या

विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, नाशिक 36, 11 
सामान्य रुग्णालय, मालेगाव 127, 6 
ग्रामीण रुग्णालय, देवळा 13, 2 
जिल्हा रुग्णालय, नगर 18, 6 
जिल्हा रुग्णालय, जळगाव 100, 6 
जिल्हा रुग्णालय, नंदुरबार 25, 5 

हेही वाचा > रंगाचा झाला भंग!...जेव्हा वाटेत दिसला 'तो'...अन् मग 

नामुष्की टाळण्यासाठी सर्वकाही 

नाशिक येथील आरोग्यसेवा विभाग उपसंचालक कार्यालयाकडून आपल्यावरील नामुष्की टाळण्यासाठी प्रतीक्षायादीत असलेल्या रुग्णांची संख्या दडविण्यात आली आहे. नाशिक शहरात 15 ते 20 रुग्ण प्रतीक्षायादीत असताना उपसंचालक कार्यालयाने मात्र रुग्णांची संख्या निरंक दाखविली आहे. नंदुरबारमध्येही 30 रुग्ण प्रतीक्षायादीत असतांना उपसंचालक कार्यालयाकडून केवळ तीन रुग्णसंख्या दाखविण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या दडवून आरोग्य उपसंचालक विभागाला नेमके साध्य काय करायचे आहे? असा प्रश्‍न निर्माण होत आहे. धुळे जिल्ह्यात डायलिसिस सेंटरच नसल्याने अनेक रुग्णांना उपचारासाठी इतरत्र जावे लागत असल्याचे वास्तव आहे.  

हेही वाचा > ...अन् चक्क पाच टन द्राक्षे फेकावी लागणार?...द्राक्ष हंगामापुढे पेच


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Patients wanting a dialysis center nashik marathi news