त्र्यंबकेश्‍वरला मंदिर उघडण्याची प्रतीक्षा; मंदिरावर आधारित अर्थकारण पडलंय ठप्प 

People are waiting for the opening of the temple at Trimbakeshwar
People are waiting for the opening of the temple at Trimbakeshwar

नाशिक/त्र्यंबकेश्‍वर :  बारा ज्योतिर्लिंगांपैकी त्र्यंबकेश्‍वर एक प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहे. दक्षिण भारताची गंगा गोदावरीचे उगमस्थान, आणि वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू निवृत्तिनाथांची उपासनाभूमी अशा नानाविध कारणामुळे जगभर लौकिक असलेल्या त्र्यंबकेश्‍वरचे अर्थकारण येथील मंदिरावर अवलंबून आहे. लॉकडाउनमुळे काही महिन्यांपासून मंदिरच बंद असल्याने शहारचे अर्थकारण ठप्प पडले आहे. 

त्र्यंबकेश्‍वरच्या लोकसंख्येइतके लोक एरवी रोज येथे दर्शनाला येतात. कुशार्वतावर स्नानाला गर्दी होते. त्र्यंबकराजाचे दर्शन, भाविक पुरोहितांकडून अभिषेक पूजा करून घेतात. यानिमित्ताने साहित्य व प्रसाद, दुकाने, हॉटेलला व्यवसाय मिळतो. त्र्यंबकराजाच्या दर्शनाशिवाय येथील नारायण नागबली, त्रिपिंडी विधी देशभर प्रसिद्ध असून, देशभरातील लोक येथे येतात. काही एक दिवस, तर काही तीन दिवस मुक्कामी असतात. त्यासाठी हॉटेल, लॉजिंग, काही घरगुती निवास व्यवस्था येथे उपलब्ध आहे. दोनशे रुपयांपासून चार हजार रुपये एक दिवस अशा विविध स्वरूपात निवास व्यवस्था आहे. मागील कुंभमेळ्यापासून त्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. नाशिक-त्र्यंबकेश्‍वर रस्त्यावर दुतर्फा धाबे व हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात बहरला आहे. 

पालिकेच्या महसुलावर परिणाम 

त्र्यंबकेश्वरला कर्जे काढून ज्यांनी ज्यांनी व्यवसाय उभे केले, ते कर्जातच डुबून संपण्याची वेळ आली आहे. त्र्यंबकेश्‍वर मंदिर हेच ज्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. त्यांना त्र्यंबकेश्‍वरला पोट भरणे अवघड झाले आहे. देवस्थान, पुजारी, स्थानिक नागरिक, फूल विक्रेते, हॉटेल विक्रेते असे सगळेच अडचणीत आल्याने पालिकेच्या महसुलावरही त्याचा परिणाम झाला आहे. पुरोहितांना बेगमी पूजेतून मिळणारे उत्पन्न सगळेच संपल्याने हातावर हात ठेवून बसून राहण्याची वेळ आली आहे. सहा महिने होऊनही येथील सर्व बंदमुळे येथील अर्थव्यवस्था संपलेल्या अवस्थेत असून, व्यवसाय उघडण्यास परवानगी असली तरीही ग्राहक कोठे आहे. बाहेरून भाविक अथवा पर्यटक आल्यास चालतात, पण सध्या मंदिरच बंद असल्याने व्यवसाय सुरू होऊन उपयोग नाही. 

राजकारण्यांचे पितळ उघडं 

मंदिरे उघडून पूजापाठ सुरू करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या बैठकाचे इव्हेंट झाले. मात्र ते पितळ उघड पडलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे उंबरठे झिजवूनही मंदिर सुरू झालेले नाही. लपूनछपून कुणी पूजाविधी केलाच तर त्याला भीती दाखवून व पैसे उकळण्याचा नवा धंदा या महामारीत दिसला. याच काळात स्थानिक कायम रहिवासी व बाहेरील पुरोहित (पांथस्‍त) यांच्यातील वादही विकोपाला गेल्याने पूजाविधी बंदच आहे. १० ते १२ हजार लोकवस्तीच्या छोट्या त्र्यंबकेश्‍वर शहराची अर्थव्यवस्था ज्या भोलेनाथ श्री त्र्यंबकराजावरच अवलंबून आहे. तोच कुलूपबंद असल्याने शहराच्या अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर येण्याची अजिबात शक्यता नाही. हेच या गावाचं दुखणं आहे.  

संपादन - रोहित कणसे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com